Latest

हनुमान जयंती विशेष : प्रेरणादायक हनुमान चरित्र

अमृता चौगुले

रामायणातील 'सुंदरकांड' आणि तुलसीदासांच्या 'हनुमान चालिसा'मध्ये बजरंगबलींचे चरित्र तपशीलवार आणि ठळकपणे मांडले आहे. त्यानुसार हनुमानाचे चरित्र तरुणांसाठी प्रत्येक रूपात प्रेरणादायी आहे.

धर्मग्रंथांत वीररसाचे चार भेद सांगितले आहेत. दान, दया, युद्ध आणि धर्म. काहीजण दानवीर असतात कर काही धर्मवीर. परंतु, ज्याच्यात हे चारही रस आहेत, तो महावीर. रामभक्त हनुमंतांना महावीर म्हटले आहे. बजरंग जसे महापराक्रमी योद्धे आहेत, तसेच ते आज्ञाधारी सेवक आहेत. एकदा माता अंजनी हनुमंतांना म्हणाल्या, 'तुमच्यामध्ये असीम शक्ती आहे, ज्याद्वारे तुम्ही एकटे लंकेचा नाश करू शकता. पण, मग तुम्ही तेच का नाही केले?' हनुमंत म्हणाले की, 'आई, श्रीरामांनी मला हे करण्याची परवानगी दिली नव्हती.' हनुमान हे विवेकाचे सागर आहेत. त्यामुळे त्यांनी आपली शक्ती आणि बुद्धिमत्ता हुशारीने वापरली.

हनुमान हे विद्वान, सद्गुणी आणि अतिशय हुशार आहेत. ते नुसते विद्वान नाहीत, तर सद्गुणीही आहेत. ते उच्च आदर्शांशी केवळ परिचित नाहीत, तर ते आदर्श आत्मसात करणारे आहेत. ते आपल्या शब्दाने, वागण्याने आणि विचारांनी भगवान श्रीरामांच्या आदर्शावर चालतात. समुद्र पार करत असताना जेव्हा मैनाक पर्वताने हनुमानाला विश्रांती घेण्यास सांगितले., तेव्हा हनुमंतांनी त्याची विनंती ना स्वीकारली, ना नाकारली. मैनाक पर्वताचा आदर राखून हात जोडून नमस्कार केला आणि ते पुढे निघाले. वास्तविक, मैनाक हा सोन्याचा पर्वत असून, सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हनुमानाने या वर्तनातून असे सांगितले की, आनंद आणि सुखसोयींच्या सान्निध्यात आले, तरी आपले लक्ष्य विसरता कामा नये. भक्त उद्यमशील असतो. तो विलासी नसतो.

हनुमंतांकडून संवादकौशल्य, नम्रता, आदर्शवाद हे गुण घेण्यासारखे आहेत. रावणाच्या अशोकवनात हनुमान सीतेला पहिल्यांदा भेटले. वानराकडून श्रीरामांची खबर ऐकून सीता घाबरली; परंतु हनुमानाने संवाद कौशल्याने आपण रामरायांचे दूत आहोत, हे पटवून दिले. महासागर पार करत असताना देवांनी त्याची परीक्षा घेण्यासाठी सुरसाला पाठविले. हनुमंताचा मार्ग अडविण्यासाठी सुरसाने शरीराचा विस्तार केला. प्रत्युत्तर म्हणून त्यांनीही आपला आकार दुप्पट केला. त्यानंतर त्यांनी एक सूक्ष्मरूप धारण केले आणि त्यामुळे सुरसाला आनंद झाला. म्हणजेच केवळ ताकदीने विजय मिळत नाही. नम्रतेने कार्य सहज पूर्ण करता येते. लंकेतील रावणाच्या बागेत हनुमान आणि मेघनाद यांच्यातील युद्धात मेघनादाने ब्रह्मास्त्र वापरले. हनुमानही असे अस्त्र काढू शकले असते; परंतु त्यांनी तसे केले नाही. कारण, त्यांना त्या अस्त्राचे महत्त्व कमी करायचे नव्हते. तत्त्वांशी तडजोड करू नये, ही शिकवण यातून त्यांनी दिली.

तुलसीदासांनी 'हनुमान चालिसा'मध्ये लिहिले आहे की, हनुमंतांनी सीतेसमोर स्वतः लघुरूप घेतले. कारण, तेथे ते पुत्राच्या भूूमिकेत होते. परंतु, संहारक म्हणून ते राक्षसांचा कर्दनकाळ बनले. शक्तीचा योग्य ठिकाणीच वापर करणे हनुमंतांकडून शिकावे. सागरात सेतू बांधताना अपेक्षेपेक्षा कमकुवत असलेल्या वानरसेनेकडून कार्य करून घेताना त्यांच्यातील नेतृत्व क्षमतेचे, संघटन कौशल्याचे दर्शन घडते. सुग्रीव आणि वाली यांच्या परस्पर संघर्षाच्या वेळी भगवान श्रीरामांना हनुमंतांनी वालीचा वध करण्यास राजी केले. कारण, सुग्रीव हेच प्रभूरामचंद्रांना रावणाविरुद्धच्या युद्धात मदत करू शकत होते. या ठिकाणी हनुमंतांची मित्राप्रती असलेली निष्ठा आणि आदर्श भक्ती हे दोन्ही गुण वाखाणण्याजोगे आहेत. हनुमंतांनी आठ सिद्धी आणि नऊ निधी प्राप्त केल्या. तुलसीदास हनुमंतांबद्दल लिहितात, 'संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बल बीरा.' आपल्या भक्तांची नेहमीच संकटातून मुक्तता करणारे हनुमान तरुणांचे सर्वांत प्रिय देव असण्याबरोबरच स्किल इंडियाच्या आजच्या युगात जीवनाच्या व्यवस्थापनाचे गुरू ठरतात.

SCROLL FOR NEXT