Latest

‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’साठी सरकार आणणार मार्गदर्शक तत्त्वे; दहा दिवसांत नियम आणणार

Shambhuraj Pachindre

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा; समाजमाध्यमांवर प्रभाव टाकणार्‍या 'सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर'संदर्भात सरकारने आता मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत प्रत्येक समाजमाध्यमांवरील इन्फ्लुएन्सरला त्याची जबाबदारी समजून घ्यावी लागेल आणि निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांच्या नियमांचे पालन करावे लागेल.

येत्या दहा दिवसांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे. समाजमाध्यमांच्या इन्फ्लुएन्सरमध्ये  सेलिब्रिटींचाही समावेश करण्यात येईल. त्यामुळे त्यांनादेखील आता समाजमाध्यमांवरील नियमांचे पालन करावे लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये ब्रॅंड प्रमोशन करताना काय करावे आणि काय करू नये, यासंबंधी सांगितले जाईल.

आयकर विभागाने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे यावर्षी 1 जुलैपासून लागू झाली आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने या नवीन नियमांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्व अधिसूचित करीत लाभार्थ्यांना नवीन कर नियमांनुसार 10 टक्के दराने टीडीएस भरावा लागणार असल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. नवीन नियमानुसार समाजमाध्यमांवर प्रभाव टाकणार्‍यांना कार, मोबाईल, कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी उत्पादनांवर 10 टक्के टीडीएस भरावा लागेल. मात्र, ते उत्पादन वापरल्यानंतर कंपनीला परत केल्यास ते कलम 194 आरअंतर्गत समाविष्ट होणार नाही.

ब्रॅंड प्रमोशनसाठीचा मोबदला जाहीर करावा लागेल

इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर ज्यांचे फॉलोअर्स मोठ्या संख्येत आहेत ते ब्रॅंड कडून पैसे घेऊन त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करतात. आता नव्या नियमांतर्गत इन्फ्लुएन्सरला ब्रॅंडच्या प्रमोशनसाठी मिळालेली रक्‍कम घोषित करावी लागेल. तसे न केल्यास त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. प्रमोशन म्हणजे एकप्रकारची जाहिरात आहे, हेदेखील प्रभावकर्त्यांना सांगावे लागेल. संबंधितांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही, तर कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे समाज माध्यमात वावरताना प्रभावशाली व्यक्‍तींना काळजी घ्यावी लागणार आहे.

दहा ते पन्‍नास लाख रुपये दंडाची तरतूद?

नियमांचे उल्‍लंघन केल्यास 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्याचा मानस सरकारचा आहे. इन्फ्लुएन्सरने वारंवार नियमांचे उल्‍लंघन केल्यास 50 लाख रुपयांचा मोठा दंड भरावा लागू शकतो. कितीही मोठी सेलिबि—टी असली, तरी दंड भरावाच लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • ब्रॅंड प्रमोशन करताना घ्यावी लागणार खबरदारी
  • ग्राहक व्यवहार विभाग ठरवणार मसुदा
  • ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील फेक रिव्ह्युवरही लक्ष ठेवणार
SCROLL FOR NEXT