Latest

सोलापूर : हुंड्यासाठी विवाहितेचा गर्भपात; मुलासह ठार मारण्याची धमकी

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

हुंड्यासाठी परवेझबानो मोहम्मद सिराजोद्दिन सिराज (वय 26, रा. सरवदेनगर, मुळेगाव रोड) या विवाहितेचा गर्भपात करण्यात आला. तसेच तिला मुलासह ठार मारण्याची धमकी देत शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासूसह आठजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पती मोहम्मद सिराजोद्दिन सिराज, सासू सुजानाबेगम, दीर मोहम्मद मोईनोद्दिन ऊर्फ सजिल, नणंद आस्मा जबीन, सलमा परवीन, सलमाचा पती मोईज, नणंद हिना अमरीन, हिनाचा पती मसुद मुन्नवर सर्व (रा. काझीपुरा शालीबंदा, हैदराबाद, तेलंगणा) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत परवेझबानो हिने फिर्यादीत म्हटले आहे, तिचा विवाह 24 मे 2015 रोजी मोहम्मद सिराजोद्दिन याच्या
बरोबर झाला होता. त्यानंतर 26 जुलै 2015 रोजी पासून पतीसह सासरचे लोक आमच्या येथे उशिरा उठण्याची परंपरा नाही असे म्हणून भांडण करू लागले. त्याचबरोबर विवाहात दिलेले सर्व सोन्याचे दागिने सर्वांनी जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर 'तुझ्या माहेरच्या लोकांनी आमचा मानपान केला नाही. उत्तम दर्जाचे जेवण दिले नाही. लग्नात कंगण दिले नाहीत'ं, असे म्हणून तिला वारंवार टोमणे मारत, शिवीगाळ करू लागले. तिने नाईलाजास्तव सर्व सहन केले. दरम्यान तिला एक मुलगा झाला. तरीही सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी छळतच होते.

परवेझबानो ही दुसर्‍यांदा गरोदर राहिली. त्यावेळी पतीसह सासरच्या मंडळींनी गोड बोलून तिला डॉक्टरकडे नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याला नकार दिला. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा त्रास दिला. दरम्यान, घरी आल्यावर तिला गर्भवती असतानाही पालथे पोटावर झोपायला लावून तिचा छळ केला. तिला त्रास होऊ लागल्याने तिच्या आईन व भावाने सोलापुरात आणून तिच्यावर उपचार केले. तेव्हा तिचा गर्भपात झाला होता.

त्यानंतरही सासरच्या लोकांनी तिला माहेरून दोन लाख रूपये घेवून ये. नाहीतर तुला नांदविणार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांना 50 हजार रूपये दिले. त्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी करीत 7 फेब्रुवारी रोजी तिला व तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती माहेरी निघून आली. कोणत्याही परिस्थितीत समजून सासरच्या मंडळींच्या वागण्यात सुधारणा झाली नाही.

त्यामुळे परवेझबानो हिने पती, सासूसह 8 आरोपींविरूध्द फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

SCROLL FOR NEXT