Latest

सोलापूर : मिनी मंत्रालयातील अर्थमंत्र्यांच्या सुटकेसमध्ये दडलंय काय?

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : मिनी मंत्रालयाचे अर्थमंत्री म्हणून ओळखले जाणारे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे शुक्रवार, दि. 11 मार्च रोजी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करणार आहेत. अर्थमंत्री डोंगरे यांच्या सुटकेसमध्ये 'नेमकं दडलंय तरी काय' याची उत्सुकता जि.प.सदस्यांना आहे, तर सर्वसामान्यांसाठी काय मिळणार हे जाणून घेण्यासाठी बजेटकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेत भाजपपुरस्कृत सत्ता आहे. मागील पाच वर्षांत दोनवेळा अर्थ व बांधकाम समिती सभापती होण्याचा मान विजयराज डोंगरे यांना मिळाला. मात्र, पाच वर्षांत त्यांना केवळ दोनदाच सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. तीनवेळा बजेटच्या काळात आचारसंहिता व कोरोना निर्बंध असल्याने सभागृहात बजेट सादर करण्यात आले नाही. केवळ प्रशासकीय यंत्रणेकडूनच या कालावधीत अंतिम बजेट करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी 20 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची ही शेवटची सभा आहे. या सभेत सदस्यांना सुटकेस भेट देऊन त्यांंच्या निरोपाचा कार्यक्रमच घेण्यात येत आहे.

कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या तिजोरीत खडखडाट दिसून आला. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांच्या योजनांस कात्री लागली. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवून जि.प.च्या योजना आणखीन वाढविण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे. त्यामुळे सभागृहात सर्वसामान्यांच्या हिताच्या कोणत्या नवीन योजना येणार याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना आहे.
जि.प.सदस्यांचा पाच वर्षार्ंचा कालावधी सरल्याने व शेवटची सभा असल्याने या सभेत अर्थसंकल्पापेक्षा पाच वर्षांतील कामगिरीबद्दल सदस्यांकडून भावना व्यक्त होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात मांडण्यात येणार्‍या अर्थसंकल्पातील निधी वापरण्याची संधी जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांना मिळणार नाही. काही सदस्य कदाचित पुन्हा निवडूनही येतील.

मात्र, सध्या सभागृहात असणार्‍या सदस्यांपैकी बहुतांश सदस्य पुन्हा सभेत नसणार आहेत. त्यामुळे या बजेटचा त्यांना काहीच फायदा होणार नसला तरी मागील पाच वर्षार्ंतील अनुभवाच्या बळावर सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणत्या योजनांसाठी निधीची तरतूद होणे आवश्यक आहे यावर सभागृहात सदस्यांकडून घेण्यात येणारी भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.

SCROLL FOR NEXT