सोलापूर , वेणुगोपाळ गाडी : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती पर्यावरणास घातक असल्याने केंद्र सरकारने अशा गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याची यंदा काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचे संकेत असल्याने सोलापुरात तयार झालेल्या सुमारे चार लाख मूर्तींचे काय करावयाचे, असा प्रश्न स्थानिक मूर्तिकारांसमोर पडला आहे. मूर्तिकारांवरील हे 'विघ्न' दूर न झाल्यास कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्यता आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वीच घेतला होता, याविरोधात मूर्तिकारांनी न्यायालयात धाव घेतली होती तसेच राज्यात काही ठिकाणी राज्यस्तरीय आंदोलनही करण्यात आले होते. न्यायालयाने बंदीच्या निर्णयाचे समर्थन केल्याने यंदा बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या पार्श्वभृमीवर सोलापुरात महापालिकेने शुक्रवारी मूर्तिकार संघटनेची बैठक घेतली. यामध्ये केंद्राच्या मार्गदर्शक सूचना मूर्तिकारांना अवगत करुन देत यंदा ईको-फ्रेंडली मूर्ती बनविण्याच्या तसेच याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना करण्यात आल्या. याला मूर्तिकारांनी प्रतिसाद दिला. ही स्वागतार्ह बाब असली तरी सध्या सोलापुरात तयार असलेल्या सुमारे चार लाख गणेशमूर्तींचे काय होणार, असा यक्षप्रश्न मूर्तीकारांसमोर पडला आहे.
गणेशोत्सव संपला की मूर्तिकार दसर्यापर्यंत सुटी घेतात. दसरा संपला की पुन्हा पुढील वर्षी लागणार्या मूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. गतवर्षीदेखील पीओपी मूर्तींबाबत नियम उपस्थित झाल्याने सुमारे 25 टक्के पीओपी मूर्तींची विक्री झाली नाही. शिवाय दसर्यानंतर आतापर्यंत मूर्ती तयार करण्याचे काम 70 ते 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. गतवर्षीच्या व यंदा बनवून तयार असलेल्या मूर्तींची संख्या सुमारे चार लाखांच्या घरात आहे.
या पार्श्वभूमीवर मनपाने शुक्रवारी घेतलेल्या बैठकीनंतर मूर्तिकार पेचात सापडले आहेत. चार लाख मूर्तींचे काय करावयाचे, या विवंचनेत ते पडले आहेत. सोलापुरात तयार होणार्या मूर्तींपैकी 80 टक्के मूर्तींना कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या परराज्यात बाजारपेठ आहे. यंदा पीओपीच्या मूर्ती परराज्यात विकण्याचा प्रयत्न होणार आहे, मात्र नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास मूर्तींची विक्री करणे अवघड बनून कोट्यवधींचा फटका मूर्तिकारांना बसण्याची शक्यता आहे.
एकंदर नवीन नियमाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीची नितांत गरज आहे. गणेशभक्तांनी ईको-फ्रेंडली मूर्तींचा आग्रह धरल्यास भावी काळात पीओपी मूर्तींची निर्मिती घटणार आहे.
प्रशासनाकडूनदेखील नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास पीओपी मूर्तींची निर्मिती रोखली जाणार. पर्यायाने पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत होणार आहे.