Latest

सोलापूर : नातेपुते नगरपंचायत ‘माऊलीं’च्या स्वागतासाठी सज्ज; आज नातेपुते येथे पालखीचा मुक्काम

दिनेश चोरगे

नातेपुते;  सुनील गजाकस :

तू माउलीहून मयाळ । चंद्राहुनि शीतळ ।

पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा॥
कन्या सासुर्‍यासि जाये । मागे परतोनी पाहे ।
तैसे जाले माझ्या जिवा केव्हा भेटसी केशवा ॥
चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ।
जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी॥

आषाढी वारीची लगबग पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत असून सर्वत्र वारीचे वातावरण तयार झाले आहे.संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी स्वागताची ओढ लागली आहे. नातेपुते येथे माऊलींचा मुक्काम सोमवारी आहे.

पालखी मुक्कामाच्या अनुषंगाने नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने माऊलींच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. माऊलींच्या मुक्कामाचा पालखीतळ स्वच्छ करून घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माऊलींच्या पालखीतळाच्या आजूबाजूची सर्व झाडे तोडण्यात आली आहेत. तळावर आवश्यक ठिकाणी मुरुम टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाड्या-वस्त्यांवर थांबणार्‍या दिंड्यांसाठी स्वच्छता करण्यात आली आहे. तळाकडे जाणार्‍या रस्त्यांवर मुरुम टाकून खड्डे भरुन काढण्यात आले आहेत. वाहतुकीस अडचण होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.

शहराचा पाणीपुरवठा पुणे-पंढरपूर रोडच्या दक्षिण बाजू वेळापत्रकाप्रमाणे होणार असून उत्तर बाजूस दिवसभर पाणीपुरवठा असणार आहे. शहरांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी मुरुम टाकण्यात आला आहे. शहराची पूर्ण स्वच्छता करण्यात आली असून आरोग्य विभाग दैनंदिन कामे करत आहेत. पालखीमार्गावरील दोन्ही बाजूस असणारी सर्व अतिक्रमणे धडक कारवाई करून कायमची पूर्णपणे काढण्यात आली आहेत. वारीसाठी असणारी सुलभ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

वारीसाठी नगरपंचायतीमधील सर्व विभागांतील कर्मचारी कार्यरत असून त्याचबरोबर शासनाने नेमून दिलेले अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. पालखीच्या अनुषंगाने शहरात सर्व ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच पालखीतळ आणि शहरांमध्ये विद्युत विभागाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. पालखीतळावर विद्युत विभागाने विद्युत व्यवस्थेबरोबर जनरेटरची सोय केली आहे. त्याचप्रमाणे पालखीतळावर व आजूबाजूच्या परिसरात नियंत्रण ठेवण्यासाठी ई. ओ. सी. सेंटर उभारण्यात आले असून शहरामध्ये मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. नातेपुते नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने माऊलींच्या स्वागताची पूर्ण तयारी केली असून माऊलींच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे.

SCROLL FOR NEXT