Latest

सोलापूर : नऊ नागरी बँका डेंजर झोन मध्ये

Arun Patil

सोलापूर ; संदीप येरवडे : सोलापूर जिल्ह्यातील नागरी बँकांचा एनपीए गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट झाला आहे. कोरोनापूर्वी देण्यात आलेल्या कर्जाची वसुलीच झाली नाही. या थकीत कर्जामुळे 9 नागरी बँका डेंजर झोनमध्ये आल्या आहेत. परिणामी संचालक मंडळावरदेखील सध्या टांगती तलवार आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात 34 नागरी सहकारी बँका आहेत. त्यापैकी अनेक बँकांचा एनपीए 10 टक्क्यांपुढे गेला आहे. यामध्ये 10 टक्क्यांच्या आत एनपीए असलेल्या बँका या सेफ झोनमध्ये समजल्या जातात. परंतु, कोरोना काळात सर्व उद्योग, व्यवसाय बंद होते. त्यामुळे छोट्या-मोठ्या कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची परतफेडच केली नाही. विशेषतः या थकबाकीमुळे सोलापूर शहरातील 92 वर्षांच्या लक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करावे लागले आहे.

त्यामुळे आता प्रशासकीय मंडळाला येथील कामकाज पाहावे लागत आहे. अनेक बँकांनी कर्जदारांना देण्यात आलेल्या कर्जाची वसुलीच झाली नाही. त्यामुळे यंदा 34 नागरी बँकांचा सरासरी एनपीए 153.26 टक्के इतका झाला आहे. थकीत कर्जाचा डोंगरही 800 कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. गतवर्षी देण्यात आलेल्या कर्जापेक्षा 400 ते 450 कोटी रुपयांचीच केवळ थकबाकी होती. परंतु, यंदा थकबकीचे प्रमाणदेखील दुप्पट झाले आहे.

सध्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त एनपीए असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बँकांमध्ये लक्ष्मी सहकारी बँकेचा एनपीए 27.83 टक्के इतका आहे. विद्यानंद अर्बन को-ऑप बँकेचा एनपीए 15.62 टक्के इतका आहे. नीलकंठ अर्बन को-ऑप. बँकेचा एनपीए 10.66 टक्के, दि. पंढरपूर अर्बन को-ऑप. बँकेचा एनपीए 21.79 टक्के, करमाळा अर्बन को-ऑप. बँकेचा एनपीए 44.98 टक्क्यांवर गेला आहे. मंगळवेढा येथील रतनचंद शहा बँकेचा एनपीए 24.40 टक्के, शंकरराव मोहिते-पाटील बँक, अकलूज 10.61 टक्के, सांगोला अर्बन को-ऑप. बँक 10.63 टक्के, कृषी सेवा अर्बन बँक कोळे, सांगोला 19.31 टक्के इतका एनपीए आहे.

10 टक्क्यांपेक्षा कमी एनपीए व्यापारी बँक 0.88 टक्के, सोलापूर जनता सहकारी बँक 8.4 टक्के, सोलापूर सिध्देश्‍वर बँक 4.89 टक्के, अहिल्यादेवी अर्बन बँक 3.15 टक्के, विकास सहकारी बँक 0.06 टक्के, सोलापूर सोशल अर्बन बँक 1.06 टक्के, महेश अर्बन को-ऑप. बँक 1.79 टक्के, मनोरमा अर्बन बँक शून्य, शरद नागरी बँक 4.44 टक्के, लोकमंगल अर्बन बँक 7.28 टक्के, कविता अर्बन बँक 2.70 टक्के, महावीर बँक 7.77 टक्के, कमला अर्बन बँक 2.19 टक्के, दि पंढरपूर मर्चंटस् बँक 1.36 टक्के, जनता सहकारी बँक शून्य, सद‍्गुरू गहिनीनाथ बँक 9.04 टक्के, माढेश्‍वरी डेव्हलपमेंट बँक 1.55 टक्के, रुक्मिणी अर्बन बँक 2.96 टक्के, मोहोळ अर्बन बँक 0.24 टक्के, निशिगंध सहकारी बँक 4.56 टक्के, शिवशक्‍ती अर्बन बँक 7.7, राजमाता को-ऑप. बँक 2.13 टक्के, दिलीप अर्बन बँक शून्य टक्के एनपीए आहे.

कोरोनामुळे थकीत कर्जाचे प्रमाण वाढले : मोरे

कोरोना काळात गेल्या दीड-दोन वर्षांत शहरातील रिक्षाचालक, हॉटेल, छोटे- मोठे उद्योगधंदे यांना देण्यात आलेल्या कर्जाची वसुलीच झाली नाही. त्यामुळे नागरी बँकांचा एनपीए यंदा वाढला आहे. नोटिसा वगैरे आणि न्यायालयीन प्रक्रिया केली तरीही थकीत कर्जाची वसुली करण्यात वेळ जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांत आमच्या मनोरमा बँकेचा एनपीए शून्य टक्के असल्याचे मत मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्‍त केले.

SCROLL FOR NEXT