Latest

सोलापूर : ‘त्या’12 गावांचा सिटी सर्व्हेमध्ये समावेशाचा मार्ग मोकळा

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :   सोलापूर शहर हद्दवाढ क्षेत्रातील 12 गावांच्या सिटी सर्व्हे होऊन हा भाग सिटी सर्व्हे विभागात समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय शुक्रवारी काढण्यात आला. आमदार प्रणिती शिंदे व नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी याकामी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.

विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये महसूलमंत्री थोरात यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी याबाबतचा शासन निर्णय जाहीर होईल असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला.

या निर्णयानुसार हद्दवाढमधील मौजे दहीटणे, बसवेश्वर नगर (देगाव), शिवाजी नगर, प्रताप नगर, मजरेवाडी, नेहरू नगर, केगाव, कसबे सोलापूर, बाळे, सोरेगाव, कुमठे, देगाव, शेळगी या महसूली गांवांच्या विस्तारीत व गावठाण क्षेत्राची मोजणी होवून हा भाग नगरभूमापन क्षेत्रामध्ये समाविष्ट होत असल्याने येथील नागरिकांना भविष्यात सातबारा उतारा ऐवजी मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे. तसेच भुखंडाचा नकाशा व मालकी हक्क नोंदविण्याचे अभिलेख मिळकत पत्रिका, सनद व नकाशे तयार होऊन मिळणार आहेत. यामुळे नागरिकांना अचूक त्यांच्या मालमत्तेचे अचूक विवरण प्राप्त होणार आहे.

सन 1992 साली शहराची हद्दवाढ करण्यात येऊन त्यामध्ये क्षेत्रामध्ये शहरालगतची 12 गावे समाविष्ट करण्यात आली होती. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकारातून ही हद्दवाढ झाली होती.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यातून या गावांचा सिटी सर्व्हे होऊन हा भाग सिटीसर्व्हे क्षेत्रामध्ये समाविष्ट होत आहे. यामुळे हद्दवाढमधील लोकांना गत अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याचे मत नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे 12 गावांतील ग्रामस्थांचे विविध प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT