Latest

सोलापूर : ड्रेनेजमध्ये पडून तिघा मजुरांचा मृत्यू; दोघे गंभीर

Arun Patil

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : अक्‍कलकोट रोडवरील सादूल पेट्रोल पंपासमोरील गांधीनगर ते कोंडानगर या रस्त्यावर ड्रेनेजलाईनच्या कामावर नव्याने चेंबर बांधण्याचे काम सुरू आहे. या चेंबरमध्ये पडून तीन कामगारांचा मृत्यू झाला. अन्य दोघे कामगार जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोलापूर ते अक्‍कलकोट मार्गावर महानगरपालिकेच्या वतीने 'अमृत' योजनेतून ड्रेनेजलाईन टाकण्याचे तसेच राष्ट्रीय महामार्गाकडून महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सादूल पेट्रोल पंपासमोरील गांधीनगर ते कोंडानगर यादरम्यान ड्रेनेज लाईनच्या चेंबरचे काम सुरू होते.

त्यावेळी अचानक एका मजुराचा पाय घसरून तो साधारण 9 फूट खोल चेंबरमध्ये पडला. त्यामुळे आजूबाजूला काम करीत असलेले इतर मजूर हे त्या मजुराला वाचविण्यासाठी पळत आले. परंतु, चेंबरमध्ये पडलेल्या मजुराला वाचविण्याच्या नादात आणखी चार मजूर चेंबरमध्ये पडले.

यावेळी वरती असलेल्या मजुरांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी याठिकाणी गर्दी करून चेंबरमध्ये पडलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना समजल्यानंतर पोलिस निरीक्षक संजय पवार व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नागरिकांच्या मदतीने चेंबरमध्ये पडलेल्या मजुरांना बाहेर काढले. परंतु त्यापैकी दोन कामगारांचा मृत्यू चेंबरमधील गॅसमुळे गुदमरुन झाल्याचे समोर आले. परंतु त्यानंतर काहीवेळाने आणखी एक कामगार ड्रेनेजमध्येच असल्याची माहिती इतर कामगारांनी दिली.

त्यानंतर पुन्हा तिसर्‍या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर इतर दोघा जखमींची प्रकृतीही गंभीर आहे. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत मृत व जखमींची नावे समजू शकलेली नव्हती. मृत व जखमी मजूर हे परराज्यांतील असून त्यांच्या भाषेमुळे त्यांची नावे समजू शकलेली नाहीत.

एमआयडीसी पोलिसांकडून तसेच महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांकडून ही दुर्घटना कशी झाली याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. यावेळी हे काम घेतलेला ठेकेदार मात्र गायब होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT