Latest

सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Arun Patil

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 11 तालुक्यांतील 189 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात सर्वाधिक 77 ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारत भाजप नंबर वनचा पक्ष बनला आहे. भाजप खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 41 ग्रामपंचायती जिंकल्या. काँगे्रस आणि शिवसेनेची मात्र यावेळी पिछेहाट झाली. अनेक ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागत सत्ता परिवर्तन झाले. दरम्यान, 12 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविविरोध झाल्या आहेत. निकालानंतर सर्वत्र गुलालांची उधळण करीत नेते, विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले होते. दरम्यान, मंगळवारी मतमोजणी पार पडली. मतमोजणी केद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सकाळी मतमोजणी सुरू होताच कल समोर येऊन अनेकजणांना अनपेक्षित विजय तर अनेकांना पराभवाला सामोरे जावे लागले.

पंढपूर तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींपैकी 7 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी प्रणित विठ्ठल परिवाराने वर्चस्व मिळविले. उर्वरित तीन ग्रामपंचायतींवर परिचारक गटाच्या पांडुरंग परिवाराने सत्तास्थापनेचा दावा केला. पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी विरूद्ध भाजप असा पारंपरिक सामना झाला. त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणूकीवरही झाला आहे. तालुक्यात स्थानिक नेत्यांनी आपापल्या गावच्या ग्रामपंचायती राखण्यात यश मिळविले.

उत्तर सोलापूर तालुक्यात 12 पैकी आठ ग्रामपंचायतींवर माजी आ. दिलीप माने गटाने सत्ता काबीज केली. राष्ट्रवादीचे नेते बळीरामकाका साठे यांच्या गटाने गावडी दारफळ ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. बहुचर्चित मार्डी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा सुवर्णा झाडे या सरपंचपदाच्या निवडणूक रिंगणात होत्या. तेथे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुवर्णा झाडे आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांना एकाकी झुंज द्यावी लागली. त्यामध्ये झाडे यांचा पराभव झाला, तर भाजपने 3 ठिकाणी सत्ता मिळविली.

सांगोला तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीपैकी 3 ठिकाणी पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. राष्ट्रवादीने 2 ठिकाणी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी घरोबा केलेल्या आमदार शहाजी पाटील यांच्या गटाला केवळ एका ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश आले.

बार्शी तालुक्यातील भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने सरशी केली. या ठिकाणी 22 पैकी 12 ठिकाणी राऊत यांच्या गटाचे सरपंच झाले आहेत. उध्दव ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री सोपल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आठ ठिकाणी सत्ता मिळाली. अन्य 2 ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. मोहोळ तालुक्यातील 10 पैकी 7 ग्रामपंचायतींमध्ये भाजप आणि समविचार गटाने सत्ता स्थापन केल्याचा दावा केला आहे. तीन समविचारी पॅनेलची सत्ता स्थापन झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाला मात्र अनेक ठिकाणी सत्ता गमवावी लागली. तालुक्यातील 16 पैकी 9 ठिकाणी भाजप, 5 ठिकाणी काँग्रेस तर एका ठिकाणी राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात काँगे्रसची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे.

माढा तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. आमदार संजय शिंदे आणि आ. बबनदादा शिंदे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम ठेवले आहे. तालुक्यातील आठही ग्रामपंचायतींची सत्ता ताब्यात ठेवण्यास शिंदे बंधूना यश आले. अक्कलकोट तालुक्यातील 20 पैकी 19 जागेवर भाजपचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी दावा सांगितला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी 17 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.

त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात नेमके कोणाच्या किती ग्रामपंचायती आहेत याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंगळवेढा तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये जुना पॅटर्न राबविण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर न वापरता स्थानिक नेत्यांनी समविचारी आघाडी स्थापन करून 16 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापन केली आहे. करमाळा तालुक्यात विद्यमान आ. संजय शिंदे आणि माजी आमदार नारायण पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली.

यामध्ये आ. संजय शिंदे गटाने अनेक ठिकाणी सत्ता मिळविल्यामुळे नारायण पाटील यांच्या गटातून काही ग्रामपंचायती निसटल्या आहेत. बागल गटाने अनेक ठिकाणी आपआपली सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले आहे. माळशिरस तालुक्यात सध्या भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. तालुक्यातील 35 पैकी 23 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत. या ठिकाणी विधानपरिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते आणि मोहिते-पाटलांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला केवळ 9 ठिकाणी सत्ता स्थापन करता आली.

एकूण 189 ग्रामपंचायती

भाजप 77
राष्ट्रवादी काँग्रेस 41
मुख्यमंत्री शिंदे गट 26
काँग्रेस 14
ठाकरे गट 8
इतर/अपक्ष 23

SCROLL FOR NEXT