सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात अजून तरी तशी परिस्थिती नाही. 13 जूनपासून नव्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्यात येत आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची संपूर्ण स्वच्छता व सॅनिटायझरने फवारणी करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
शाळेत गुणवत्ता वाढावी यासाठी यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा व तालुका स्तरावर गुणवत्ता अभियानांतर्गत शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत बदलत्या काळानुसार शिक्षकांना अध्यापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आधुनिक काळात ज्या पध्दतीने अध्यापन अपेक्षित आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन शिक्षकांना या कार्यशाळेतून करण्यात येणार आहे.
मुलांचे हस्ताक्षर, लेखनाबरोबरच स्पर्धात्मकदृष्टीने तयारी करुन घेण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. शाळेत वर्गात असताना शिक्षकांना मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. शाळेच्या परिसरात धूम्रपान निषेध करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यादृष्टीने आवश्यक खबरदारी उपाययोजना करण्याचे आदेशही गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत.