Latest

‘सोनेरी’ अक्षयतृतिया

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर मंगळवारी सोने खरेदीला मुंबईत उधाण आले. सकाळपासून ग्राहकांनी सराफा पेढ्यांवर सोने खरेदीसाठी गर्दी केली. सराफा बाजारासह पेढ्यांवर सायंकाळपर्यंत झालेली गर्दी पाहता गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक उलाढाल झाल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने दिली.

असोसिएशनचे प्रमुख कुमार जैन यांनी सांगितले की, एका वर्षात सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. यंदा अक्षयतृतियेस सोन्याचे दर प्रति तोळा 52 हजार 800 रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्यावर्षी अक्षयतृतियेस सोन्याचे दर प्रतितोळा 47 हजार 476 रुपये इतके होते. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांत सोने दरात तब्बल 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींसह गुंतवणूकदार यांपर्यंत प्रत्येकाचा सोने खरेदीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

अक्षयतृतियेला दागिने खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सोने व हिर्‍यांच्या दागिन्यांना खूप मागणी आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्याने लोकांनी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केले होते, मात्र यावर्षी दालनात येऊन ग्राहकांना खरेदीचा आनंद घेता आला. 2019च्या विक्रीच्या तुलनेत यंदा 30 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. पुढच्या दोन महिन्यांत अनेक लग्ने असल्याने या शुभ दिवसाचे औचित्य साधून लग्नासाठी लोकांकडून दागिनेखरेदी केली जात आहे.

या दागिन्यांना मागणी

नेकलेस, कडे, सोने व हिर्‍यांच्या दागिन्यांना ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. हिर्‍यांच्या दागिन्यांना शहरी व निमशहरी भागात मोठी मागणी आहे. त्याशिवाय पुरुषांमध्ये सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट्स यांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र प्लॅटिनमने पुरुषांचे अधिक लक्ष वेधले आहे. अनेक नवीन ग्राहक दागिने खरेदी करत असून 2019 पासून या ग्राहकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पहिल्यांदाच सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांकडून सरासरी 25 हजार रुपयांची सोन्याची नाणी, वळी अशा स्वरूपात प्रातिनिधिक खरेदी केली जात आहे. याउलट लग्नासाठी सरासरी 5 लाख रुपयांहून अधिक मूल्यांची दागिनेखरेदी केली जात आहे.

नवी मुंबई आणि पनवेलमधील सराफा बाजारपेठेत 400 ते 450 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती नवी मुंबई ज्वेलर्स फेडरेशनचे अध्यक्ष ललित बागरेचा यांनी दिली.

दरवाढीनंतरही गृहखरेदीला अच्छे दिन

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी गृहखरेदीचा मुहूर्त साधला. घरांच्या किमतीत वाढ झालेली असली, तरीही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे विकासकांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत एप्रिल महिन्यात मालमत्ता विक्रीने गेल्या 10 वर्षांतील उच्चांक गाठला असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विक्रीचा आलेख चढताच असल्याचे दिसत आहे.

मुंबईत गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 1 हजार 136 मालमत्तांची नोंदणी झाली होती. तर या वर्षी एप्रिल महिन्यात मुंबईत गेल्या 10 वर्षांतील विक्रमी म्हणजे एकूण 11 हजार 744 मालमत्तांची विक्री झाली. या मालमत्ता नोंदणीमधून राज्य शासनाला तब्बल 738 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मुंबईत झालेल्या मालमत्ता नोंदणीमधील तब्बल 55 टक्के मालमत्तांची किंमत 1 कोटी रुपयांहून अधिक आहे.

या नोंदणीतील घरांचा आकार 500 ते 1 हजार चौरस फुटांदरम्यान आहे. विशेष म्हणजे, त्यात 86 टक्के निवासी मालमत्तांचा समावेश असून, 8 टक्के व्यावसायिक, 3 टक्के औद्योगिक, 1 टक्का जमिनी आणि 3 टक्के इतर मालमत्ता आहेत. त्यात अक्षय्य तृतीयेनिमित्त मे महिन्याच्या आरंभाला झालेल्या मालमत्ता विक्रीची मोठी भर पडली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नव्या कार्यालयाचा शुभारंभ केला, असे व्यावसायिक अमोल सालके यांनी सांगितले. कोरोनामुळे दोन वर्षे संघर्षात गेली. आता बाजाराची परिस्थिती सुधारली असल्याने नव्या कार्यालयाची सुरुवात केल्याचे ते म्हणाले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या अक्षय्य तृतीयेनिमित्त विकासकांनी मेट्रो सेसचा भार कमी करण्यासाठी ऑफर्सचा वर्षाव केला. त्याचा सकारात्मक परिणाम मालमत्ता विक्रीवर झाल्याचे जाणकारांनी सांगितले.

दरम्यान, मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये कमी मालमत्ता नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्क नोंदणीत 3 टक्के सूट देण्यात आल्याने मार्च महिन्यात अधिक मालमत्ता नोंदवण्यात आल्या होत्या. यावर्षी मात्र एप्रिलपासून लागू झालेला 1 टक्का मेट्रो सेस टाळण्यासाठी मार्चमध्ये तुलनेने अधिक मालमत्तांची विक्री झाल्याचे जाणकारांनी सांगितले. या दोन्ही वर्षांतील मार्च महिन्यांचा अपवाद वगळल्यास, एप्रिल 2022 मध्ये झालेल्या मालमत्ता नोंदणीचा आकडा सर्वाधिक आहे.

मोठ्या घरांना अधिक मागणी

मुंबईत मोठ्या घरांना अधिक मागणी असल्याचे एप्रिलमधील विक्रीतून स्पष्ट होते. मुंबईत 36 टक्के नोंदणी झालेल्या घरांचा आकार 500 चौरस फुटांहून कमी असून 47 टक्के घरांचा आकार 500 ते 1 हजार चौरस फूट, 15 टक्के घरांचा आकार 1 ते 2 हजार चौरस फूट आणि 2 टक्के घरांचा आकर 2 हजार चौरस फुटांहून जास्त आहे. अक्षय्य तृतीयेलाही हाच 'ट्रेंड' कायम राहिला.

SCROLL FOR NEXT