न्यूयॉर्क : सूर्यावर सध्या विनाशकारी वादळ घोंगावत आहे. या सौरवादळाने आठवडाभरात दुसर्यांदा शुक्राला तडाखा दिला. सूर्यापासून बाहेर पडणारा प्लाझ्मा दुसर्या बाजूने बाहेर पडला, यामुळे तो पृथ्वीवरून दिसू शकला नाही. मात्र, अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या 'स्टिरिओ-ए' नामक अंतराळ यानाने हे कोरोनल मास इजेक्शन पाहिले.
सूर्यापासून प्रचंड वेगाने बाहेर पडणार्या मास इजेक्शनचे यानाच्या मदतीने रेकॉर्ड करण्यात आले आहे. ज्यावेळी सूर्यावर मोठ मोठे स्फोट होतात, त्यावेळी त्यातून बाहेर पडणारे पदार्थ म्हणजेच मास इजेक्शन. सूर्यावरील स्फोटानंतर तेथून अब्जावधी टन पदार्थ ताशी लाखो किमी वेगाने बाहेर पडतात. याशिवाय सूर्यापासून बाहेर पडणारे कण आणि विकिरण हे कधी कधी अंतराळात कार्यरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक आणि उपग्रहांसाठी घातक ठरू शकतात.
सूर्यावर असलेल्या मोठ मोठ्या डागांमधून कोरोनल मास इजेक्शन होते. आठवडाभरापूर्वी अशाच एका विशालकाय डागामधून मास इजेक्शन झाले. ज्या डागामधून मास इजेक्शन झाले, त्याला 'एआर 3088' असे म्हटले जाते.
युरोपच्या सोलार ऑर्बिटरने कामास सुरुवात केल्यानंतर सूर्यावर झालेले हे मास इजेक्शन सर्वात शक्तिशाली आणि मोठे असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सूर्यावरील वादळापासून हे ऑर्बिटर चमत्कारिकरित्या वाचले. हे ऑर्बिटर सध्या शुक्राच्या केंद्र भागापासून 12 हजार 500 किमी अंतरावर सुरक्षितपणे कार्यरत आहे.