Latest

सुसंवाद : लहानग्यांशी सुसंवादाची गरज!

अमृता चौगुले

कामकरी माता-पिता दिवसाकाठी मुलांना केवळ 20 मिनिटे देतात, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलांमध्ये सर्जनशील व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी शिक्षण, शिक्षक आणि पालक या सर्वांमध्ये सुसंवाद असण्याची गरज आहे.

ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून आत्महत्येपर्यंत पोहोचलेल्या मुलांच्या कहाण्या सातत्याने ऐकायला मिळतात. महत्त्वाची बाब अशी की, या विषयावर भरपूर चर्चा आणि विचारविनिमय होऊनसुद्धा अशा घटनांवर आपण अंकुश लावू शकलेलो नाही. त्याचे एक कारण असे की, आजकाल मुले ही आपल्या प्राधान्यक्रमात अगदी शेवटच्या पायरीवर आहेत. मुलांची एक स्वतंत्र दुनियाच तयार झाली आहे. सोशल मीडियाच्या नव्या आभासी दुनियेने त्यांच्यासमोर वेगळाच समाज आणून ठेवला आहे. नवउदार जागतिक व्यवस्थेत सामाजिक आणि आर्थिक दबावामुळे आई-वडील आणि मुलांमधील अंतर वाढत आहे. मुलांचे बालपण आता पूर्णपणे उपभोगवादाच्या विळख्यात सापडले आहे.

धावपळीच्या जगण्याने लहान मुलांच्या डोळ्यांमधून झोपच हिसकावून नेली आहे. मुले आता एकलकोंडी आणि हिंसक होत आहेत. एका अहवालात म्हटले होते की, देशातील 42 टक्के मुले निद्रानाशाच्या तक्रारीने ग्रस्त आहेत आणि त्यामुळे झोपेतून घाबरून उठणे, झोपेत चालणे, बडबडणे, रडणे आणि भीतीदायक स्वप्ने पडणे अशा समस्या त्यांना सतावत आहेत. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील सेंट जोसेफ विद्यापीठाने भारतातील सुमारे चार हजार मुलांचा अभ्यास केला. त्यानुसार भारतीय मुलांना युरोपीय मुलांच्या तुलनेत कमी झोप मिळते. परिणामी, मुलांचा नैसर्गिक विकास होऊ शकत नाही. घरातून पळून जाणे, आक्रमक होणे, एकांतात राहणे, मोबाइलमध्ये गुंतून पडणे, मोबाईल गेमला प्रतिक्रिया म्हणून आत्मघाताच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होणे, अशा सामाजिक विकृतींच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील आणि शाळेतील वातावरणाची पार्श्वभूमी तपासणे नक्कीच आवश्यक बनले आहे. मुलांच्या बदलत्या व्यवहारांसाठी केवळ त्यांना दोषी मानून चालणार नाही. मुलांच्या बालपणाला दिशा देणारी कुटुंबसंस्था, शाळा यांच्याही भूमिकेचा कुठेतरी विचार करायला हवा. शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये भौतिक जीवनाच्या बदलत्या गरजांमुळे आई-वडील आणि मुलांच्या दरम्यान एरव्ही होणार्‍या मनमोकळ्या संवादाचा पायाच कुठेतरी ठिसूळ झाला आहे. एखाद्या घरात आजी-आजोबा असतीलच, तरी त्यांच्या नंतरच्या दुसर्‍या पिढीचे नियंत्रण त्यांच्या हातून निसटून जात आहे. आज विभक्त कुटुंबे आदर्श बनली. शाळांची जबाबदारीही पुस्तकी शिक्षणापुरतीच मर्यादित राहिली. या पार्श्वभूमीवर शाळेत मुलांचे होणारे शैक्षणिक सामाजिकीकरण आणि घरात होणारे चांगले संगोपन या दोन्ही पातळ्यांवर मोठे आव्हान निर्माण झाले. त्याचबरोबर मुलांविषयी अनुराग आणि स्नेहाची भावनाही जवळजवळ शून्य होऊ लागली आहे.

असोचेमच्या सोशल डेव्हलपमेन्ट फाऊंडेशनने देशातील तीन हजार कामकरी माता-पित्यांविषयी अध्ययन केलेे. त्यातून दिसले की, कामकरी माता-पित्यांजवळ त्यांच्या मुलांना देण्यासाठी वेळ इतका कमी झाला आहे की, तो दिवसाकाठी केवळ 20 मिनिटे इतका आटला आहे. मुलांच्या विकासाच्या द़ृष्टीने ही निश्चितच वाईट बाब आहे. हे पालक मुलांना होमवर्कसाठी मदत करत नाहीत. आठवड्याच्या अखेरीस मुलांसोबत एकत्र जेवण करू शकत नाहीत. म्हणजेच, मुलांचे बालपण हळूहळू एकाकी होऊ लागले आहे. मुले आणि त्यांच्या पालकांमध्ये मुक्त संवाद होत नसल्यामुळे मुले समाजजीवनापासून दूर जाऊ लागली आहेत. संयम, शिस्त, परंपरा, मूल्ये, सहानुभूती आणि प्रेम यासारखे शब्द मुलांपासून दूर जात आहेत.

आज इलेक्ट्रॉनिक माध्यमे, सोशल मीडिया, कॉम्प्युटर, इंटरनेट, चित्रपट अशा विविध माध्यमांनी शाळा आणि कुटुंब या व्यवस्थांचे स्थान मुलांच्या बालपणातून दुय्यम केले आणि त्यांच्या भावविश्वात स्वतः ठाण मांडले. मुलांमध्ये सर्जनशील व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी शिक्षण, शिक्षक आणि पालक हे तिन्ही घटक त्यांच्या मनातील आक्रोश कमी करण्यासाठी योगदान देऊ शकतात. त्याचप्रमाणे निद्रानाशासारख्या समस्यांचे निराकरण करू शकतात. मात्र, यासाठी सर्वांमध्ये सुसंवाद असण्याची गरज आहे.

– प्रा. शुभांगी कुलकर्णी,
समाजशास्त्र अभ्यासक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT