Latest

सुरेश प्रभू यांची निवडणुकांच्या राजकारणातून निवृत्ती!

Arun Patil

सिंधुदुर्ग ; गणेश जेठे : तळकोकणातून तब्बल चारवेळा लोकसभेवर निवडून गेलेले आणि सध्या राज्यसभेचे खासदार असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थतज्ज्ञ माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यापुढे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा सोमवारी कणकवलीतील व्यापारी एकता मेळाव्यात ऑनलाईन भाषणात त्यांनी केली. यापुढे राजकारणविरहित कामांवर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुरेश प्रभू यांच्या या घोषणेनंतर कोकणातील राजकारणात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

व्यापारी मेळाव्यात ऑनलाईन भाषणात त्यांनी बोलता

बोलता आपला राजकीय जीवनपट उभा केला. कोकण विकासामधील आपले योगदान त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श करून स्पष्ट केला. आपल्या राजकीय यशाचे श्रेय त्यांनी कोकणातील आणि सिंधुदुर्गातील जनतेला दिले. सुरेश प्रभू सध्या भाजपचे नेते म्हणून संबोधले जातात. तसे पाहिले तर त्यांचे राजकीय जीवन हे लोकप्रतिनिधी म्हणून अधिक प्रभावी ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराचे सुपूत्र असलेले प्रभू राजकीय शह-काटशहाच्या राजकारणापासून नेहमीच दूर राहिले.

आपण विजयी झालो या आनंदापेक्षा दंडवते पराभूत झाल्याचे दु:ख

शिवसेना पक्षातून सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातील पहिल्यांदा निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी प्राध्यापक मधू दंडवते यांचा पराभव केला. त्याचवेळी त्यावेळचे खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनाही पराजित केले. 'आपण विजयी झालो या आनंदापेक्षा प्राध्यापक मधू दंडवते यांचा आपल्याकडून पराभव झाला याचे दु:ख अधिक होते' अशा भावनाही त्यांनी सोमवारी बोलताना व्यक्‍त केल्या.

1998, 1999 या सालच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला. 1998 सालात अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते वने व पर्यावरण खात्याचे मंत्री बनले. खते व रसायन खात्याचा कारभारही त्यांनी केला. 2004 सालापर्यंत ते मंत्री होते. ऊर्जाखातेही त्यांच्याकडे होते. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला.

देशात काँग्रेसचे सरकार आले तरीदेखील शिवसेनेचे नेते असलेल्या सुरेश प्रभू यांना काँग्रेसच्या मनमोहन सिंग सरकारने नद्याजोड प्राधिकरणचे अध्यक्ष बनविले. 2009 सालच्या निवडणुकीत मात्र सुरेश प्रभू यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या सध्याचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी त्यांचा पराभव केला होता.

…आणि त्यांनी शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत सुरेश प्रभू यांना शिवसेनेकडून त्यांना पुन्हा रिंगणात उतरविले जाईल, अशी शक्यता होती, परंतु शिवसेनेने नव्या दमाच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांना तळकोकणात रिंगणात उतरविले. राऊत हे विजयीदेखील झाले. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अस्तित्वात आले.

सुरेश प्रभू केंद्रातील सत्तास्थानांपासून काहीसे दूर होते, अखेर अर्थतज्ज्ञ आणि अनेक क्षेत्रातील प्रचंड ज्ञान असलेल्या सुरेश प्रभू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात मंत्रीपद दिले.

9 नोव्हेंबर 2014 रोजी सुरेश प्रभू यांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तिथपासून ते भाजपचे नेते म्हणून ओळखले जात आहे. प्रभू यांना रेल्वेमंत्रीपद देण्यात आले. नंतर काही काळ त्यांच्याकडे वाणिज्य खातेही सोपविण्यात आले. या काळात भाजपने त्यांना हरियाणातून राज्यसभेची खासदारकी दिली.

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत ते तळकोकणातील भाजपचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली होती. प्रभू यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे सांगण्यातही येत होते. परंतु शिवसेना-भाजपची युती लोकसभा निवडणुकीत झाली आणि खासदार विनायक राऊत यांना शिवसेनेची पर्यायाने युतीची उमेदवारी मिळाली. सध्या सुरेश प्रभू लंडन स्कूल ऑफ इकॉनामीमध्ये बदलत्या हवामानावर काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील डझनभर संस्थांमध्ये ते सक्रीय आहेत.

भाजपने त्यांना आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर खासदार म्हणून आणले आहेच. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीला आणखी दोन वर्षे शिल्लक आहेत. यावेळी उमेदवार कोणत्या पक्षातून कोण असतील याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. सध्या शिवसेनेने घेतलेली भाजपबद्दलची भूमिका लक्षात घेता पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपची युती होणे कठीण वाटते.

अशावेळी भाजपचा तळकोकणातील उमेदवार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होत होताच, या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून भाजपकडून काही नावांबरोबरच सुरेश प्रभूंचे नावही पुढे येत होते. त्यातूनच कदाचित सुरेश प्रभू पुढील लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चाही व्हायची. यापुढे आपण निवडणुक लढविणार नाही या प्रभू यांनी सोमवारी केलेल्या घोषणेनंतर त्यांनी निवडणुकांच्या राजकारणापासून निवृत्ती घेतल्याचे स्पष्ट झाले आणि ही चर्चाही थांबली आहे.

शिवसेनाप्रमुखांचे निमंत्रण आले आणि राजकारणात आलो

व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असलेल्या सुरेश प्रभू यांनी एक हजारपेक्षा अधिकचे क्लाइंड आणि 200 पेक्षा अधिक मुले फर्ममध्ये काम करत असतानासुध्दा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले आणि आपण राजकारणात आलो, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठीचा टाटा कन्सल्टन्सीचा रिपोर्ट आपण बनवून घेतला, तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण भोसले होते. पंतप्रधान सडक योजना, नाबार्ड आणि सेंट्रल रिझर्व्ह फंडातून पहिल्यांदा आपण रस्त्यांसाठी निधी आणला, रस्ते चांगले केले. तोपर्यंत या योजना कोकणला माहित नव्हत्या असा दावाही त्यांनी केला.

रेल्वेमंत्री झाल्यानंतर कोकण रेल्वेत अमुलाग्र बदल केले. चिपळुणात कारखाना निर्माण केला, असे सांगून आजही परिवर्तन केंद्रांच्या माध्यमातून आपण कोकणची सेवा करत आहोत, याही पुढे करत राहणार, असेही त्यांनी जाहीर केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT