Latest

सुकेश चंद्रशेखर : एका महाठगाचा भूलभुलैया!

Arun Patil

आपल्या देशात आतापर्यंत हर्षद मेहता, नीरज मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, राजू रत्नम, मेहुल चोक्सी, तेलगी, सुब्रतो राय, केतन पारीख असे अनेक छोटे-मोठे ठकसेन होऊन गेले, त्यांच्यामध्ये आता सुकेश चंद्रशेखर याची भर पडली आहे. अवघ्या 32 वर्षांच्या या महाठगाने बॉलीवूड कलाकारांवर कशी भुरळ घातली आणि लोकांना कसे लुबाडले, याची कहाणी 'अरेबियन नाईटस्'पेक्षा सुरस आहे.

जगामध्ये आणि भारतामध्ये महाठगांची काही कमी नाही. एक संपला की, दुसरा त्याची जागा घेतो आणि लोकांची लुबाडणूक, फसवणूक चालूच राहते. आधी ठेच लागूनही लोक शहाणे होत नाहीत. आता सुकेश चंद्रशेखर नावाच्या महाठगाचे नाव गाजत आहे. अलीकडेच सुकेश आणि बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांचा एकमेकांचे चुंबन घेतानाचा फोटो व्हायरल झाल्यावर सुकेशचे नाव देशभर गाजू लागले आहे. या महाठगाने बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे 'ईडी'च्या तपासामध्ये दिसून आले आहे. या प्रकरणाने बॉलीवूडला जबरदस्त हादरा बसला आहे.

सुकेशने जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्यावर कोट्यवधी रुपयांची उधळण केल्याचे दिसून आले असून, त्याने इतर अनेकांना लुबाडण्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, सुकेशने तिहार जेलसारख्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणार्‍या कारागृहातून खंडणीचे रॅकेट चालवले हे समजल्यावर अनेकांची मती गुंग झाली आहे. अवघ्या 32 वर्षांच्या या महाठगाने बॉलीवूड कलाकारांवर कशी भुरळ घातली आणि लोकांना कसे लुबाडले, याची ही 'अरेबियन नाईटस्'पेक्षा सुरस कथा.

सुकेशचा जन्म 1989 मध्ये बंगळूरच्या भवानीनगर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण बंगळूरच्या बिशप कॉटन बॉईज स्कूलमध्ये झाले, तर बारावीनंतर त्याने शिक्षण सोडून दिले आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काम सुरू केले. सामान्य दिसणार्‍या या सावळ्या मुलाने लहानपणापासून अब्जाधीश होण्याची स्वप्ने पाहिली आणि ती साकार करण्यासाठी शॉर्टकट, अवैध मार्ग पत्करला.

त्याचे वडील चंद्रशेखर हे त्याला सांगत तू भरपूर शिक आणि नाव कमव; पण सुकेशने आपल्या वडिलांचा उपदेश न ऐकता भलत्याच मार्गाने नाव कमावले. सुकेशला बालपणापासून लक्झरी आणि स्पोर्टस् कार्सची आवड. तो शहरामध्ये कार शर्यती आयोजित करण्यासाठी मदतनिस म्हणून काम करत होता. कुमारवयामध्ये सुकेश कायदेशीररीत्या कार चालू शकत नव्हता; पण त्याने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बंगळूर पोलिस आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर केला आणि कर्नाटकात कुठेही वाहन चालवण्याचा परवाना मिळवला.

नोकर्‍या लावून देतो, मालमत्ता मिळवून देतो किंवा इतर काही कामे करून देतो, अशा आश्नासनांच्या बदल्यात त्याने कित्येकांना टोप्या घातल्या. सर्वप्रथम 2005 साली त्याला अटक झाली, त्यावेळी तो अवघा सतरा वर्षांचा होता. त्यावेळी त्याने कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मुलाचा आपण जवळचा मित्र असल्याचे भासवून बंगळूरमधील एका उद्योगपतीला 1.14 कोटी रुपयांना गंडवले होते. त्याचप्रमाणे आपण बंगळूर विकास प्राधिकरणाचा अधिकारी असल्याचे भासवून त्याने 100 लोकांना लुबाडले होते.

सुकेश हा अगदी वेगळ्या प्रकारचा महाठग आहे. तो आपल्या सावजांना लुटताना हिंसाचाराचा वापर करीत नाही. त्याला अनेक भाषा येतात आणि तो मृदुभाषी आहे. तो इतका छान बोलतो की, समोरचा माणूस भारावून जाऊन त्याचा त्वरित मित्र बनतो. सावजाला तो आपण एखाद्या अतिमहत्त्वाच्या बड्या व्यक्तीचा नातेवाईक असल्याचे भासवतो.

त्याला पहिल्यापासूनच आलिशान राहणीची, चैनीची, महागड्या वस्तूंची आणि सुंदर ललनांची चटक आहे, असे त्याचे वर्णन मीडियाने केलेले आहे. सुकेशने मल्याळी अभिनेत्री लीना मारिया पॉल हिला आपल्या जाळ्यात ओढून नंतर तिच्याशी लग्नही केले. लीनाने 'मद्रास कॅफे' या गाजलेल्या चित्रपटात भूमिका केली होती. मग सुकेशच्या ठगबाजीमध्ये तीही सामील झाली.

2015 चाली सुकेश लीनासह मुंबईत राहायला गेला आणि त्याने तेथे एक पोंझी स्कीम सुरू केली. त्याच्या कंपनीत 450 ठेवीदारांनी आपले पैसे ठेवले होते. या ठेवीदारांचे 20 कोटी रुपये लुबाडण्याचा गुन्हा सुकेशविरुद्ध दाखल करण्यात आला. 2017 साली गाजलेल्या निवडणूक आयोग लाचलुचपतप्रकरणी सुकेश आणि त्याची पत्नी लीनालाही अटक करण्यात आली होती.

अण्णाद्रमुकचे 'दोन पाने' हे निवडणूक चिन्ह तुमच्या गटाला मिळवून देतो, असे आश्वासन देऊन सुकेशने टी.टी.व्ही. दिनकरन गटाकडून पन्नास कोटी रुपये उकळले, असा आरोप होता. त्यावेळी क्राईम ब्रँच पोलिसांनी सुकेशविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. सुकेशने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले होते; पण त्याच्या हॉटेलच्या खोलीमध्ये पोलिसांना 1.30 कोटी रुपये रक्कम सापडली होती. ही रक्कम आणि हॉटेलबाहेर उभी केलेली त्याची मर्सिडिज बेंझ कार पोलिसांनी जप्त केली होती.

त्यानंतर सुकेशला दिल्लीच्या तिहार कारागृहामध्ये डांबण्यात आले; पण तेथूनही त्यांने आपले खंडणीचे रॅकेट आपल्या आतील आणि बाहेरील हस्तकांमार्फत सुरू ठेवले. या कारागृहामध्ये सुकेशला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बाहेर संपर्क साधण्यासाठी तो वेगवेगळ्या मोबाईलचा उपयोग करायचा.

तो पंचतारांकित हॉटेलमधून जेवण मागवायचा. पार्टी करायचा. त्याबदल्यात सुकेश हवाला डीलर्स, पोलिस आणि कारागृह अधिकार्‍यांना महिन्याला एक कोटी रुपये देत असे. याप्रकरणी दोन कारागृह अधिकार्‍यांना अटक झाली होती. सुकेशने आपण कायदा मंत्रालयातील अधिकारी असल्याचे भासवून रॅनबॅक्सी कंपनीचे माजी प्रमोटर शिविंदर सिंग यांच्या पत्नी आदिती सिंग यांना 200 कोटी रुपयांना टोपी घातली.

आदिती सिंग कारागृहात आपल्या पतीला भेटण्यासाठी येत असत, त्यावेळी सुकेशने त्यांच्याशी संपर्क साधून तुमच्या पतीला जामीन मिळवून देतो, असे आश्वासन देऊन त्यांना अशाप्रकारे गंडवले. यावर्षी तो जामिनावर बाहेर आल्यावर याच प्रकरणी त्याला दिल्ली पोलिसांनी पुन्हा अटक केली आणि मग हे प्रकरण गाजू लागले. 'ईडी'ने यावर्षी जुलैपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

डिसेंबरमध्ये सुकेश आणि इतर आठजणांविरुद्ध आरोपपत्र तयार केले आणि 175 साक्षीदार तयार केले. 'ईडी'नेे सुकेशच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. चेन्नईतील त्याच्या समुद्रकिनार्‍यालगतच्या आलिशान बंगल्यावरही छापे टाकण्यात आले. यावेळी 'ईडी'च्या अधिकार्‍यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, त्याच्या बंगल्यासमोर सोळा अल्ट्रा लक्झरी मोटारींचा ताफा खडा होता. त्यामध्ये रोल्सराईस मोटारींचाही समावेश होता.

सुकेश 2020 पासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या मागावर होता. कारागृहातून तो तिला वारंवार फोन करायचा. त्याने आपण सरकारी अधिकारी असल्याचे भासवून जॅकलीनचा मेकअप आर्टिस्ट शान मुथीलच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने आपली ओळख रत्न वेला अशी सांगून आपण सन टी.व्ही.चा मालक असल्याचे तिला सांगितले होते व आपल्याकडे बरेच प्रोजेक्ट असल्याचेही त्याने तिला सांगितले होते. त्यानंतर त्यांचे एकमेकांना भेटणे सुरू झाले. सुकेशने जॅकलीनला सोन्याचे आणि हिर्‍याचे इअररिंग्स, ब्रेसलेटस्, ब्रँडेड शूज, बॅग अशा अनेक किमती वस्तू दिल्या. याशिवाय तिला 'इस्क्युअला' नामक एक महागडा घोडा आणि मिनी कूपर कारही भेट म्हणून दिली.

त्याशिवाय तिच्या अमेरिकेत असलेल्या बहिणीला त्याने 1 लाख 50 हजार डॉलर्स कर्जरूपात (सुमारे 10 कोटी रुपये) दिले. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातील तिच्या भावाला पंधरा लाख रुपये दिले. जॅकलीनने तशी कबुली 'ईडी'समोर दिलेली आहे. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलीनला भारत फिरण्यासाठी विमान उपलब्ध करून दिले होते. या विमानाचे दोन महिन्यांचे भाडे झाले एक कोटी 39 लाख रुपये!

सुकेशने बॉलीवूड डान्सर नोरा फतेहीच्या एंटरटेन्मेंट कंपनीच्या माध्यमातून तिच्याशी ओळख करून घेतली आणि तिला चेन्नईतील एका इव्हेंटसाठी निमंत्रण दिले. त्यानंतर या दोघांची मैत्री फुलत गेली. सुकेशने तिलाही अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या. एक कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू कारही तिला भेट म्हणून दिली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर 'एसीबी'ने जेव्हा ड्रग्ज केसप्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरला चौकशीसाठी बोलावले होते, तेव्हा त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण तिला मदत केली होती, असे सुकेशने 'ईडी'ला सांगितले. त्याचप्रमाणे पोर्नफिल्मप्रकरणी राज कुंद्राला जामिनावर सोडवण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्याशी संपर्क साधला होता, अशी माहिती त्याने 'ईडी'ला दिली.

श्रद्धा आणि शिल्पा या आपल्या जुन्या मैत्रिणी आहेत, असे तो सांगतो. हर्मन बावेजा हासुद्धा आपला जुना मित्र असून, त्याच्या 'कॅप्टन' या आगामी चित्रपटामध्ये आपण पैसा गुंतवणार होतो, अशी माहिती त्याने 'ईडी'ला दिलेली आहे. बॉलीवूडमधील आघाडीच्या किमान दहा अभिनेत्री आणि कलाकार सुकेशच्या संपर्कात होते, अशीही माहिती 'ईडी'ला मिळाली आहे. त्यांची नावे हळूहळू बाहेर येतील. देश-विदेशात सुकेशच्या बँक खात्यांमध्ये रग्गड पैसा आहे. सुकेश चंद्रशेखर याने काळा पैसा पांढरा कसा केला, याची चौकशी आणि तपास 'ईडी' करीत आहे. त्यातून आणखी चक्रावून टाकणारी माहिती उघड होत राहणार आहे.

आपल्या देशात आतापर्यंत हर्षद मेहता, नीरज मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, राजू रत्नम, मेहुल चोक्सी, तेलगी, सुब्रतो राय, केतन पारीख असे अनेक छोटे-मोठे ठकसेन होऊन गेले, त्यांच्यामध्ये आता सुकेश चंद्रशेखर याची भर पडली आहे. हे भामटेगिरीचे चक्र असेच फिरत राहणार आहे आणि लोक पुन्हा टोपी घालून घेण्यासाठी आपली डोकी पुढे करीत राहणार आहेत.

प्रसाद वि. प्रभू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT