Latest

सीपीआर मधील शंभरवर आरोग्य कर्मचारी सर्दी-तापाने बेजार

Arun Patil

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : कोल्हापुरात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेविषयी नागरिकांत अद्यापही गाफीलपणा दिसत असला, तरी या लाटेने जिल्ह्याचे कोव्हिड रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या सीपीआर रुग्णालयाला तडाखा दिला आहे. या रुग्णालयातील सुमारे 100 वर कोरोना योद्धे सध्या कोरोनाची शिकार बनल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. यापैकी 31 योद्ध्यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, 16 जण रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत.

उर्वरितांनी सध्या उपचारासाठी गृह विलगीकरणाचा मार्ग स्वीकारला असून, आरोग्य कर्मचार्‍यांना होणार्‍या कोरोना संसर्गबाधेचा आलेख विचारात घेता आगामी आठवड्यात आणखी काही आरोग्य कर्मचारी बाधित म्हणून समोर येतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सीपीआर रुग्णालयातील कोरोनाचे संक्रमण वेग पकडते आहे.

पहिल्या दोन लाटांमध्ये ज्यांनी कोरोनाविरुद्ध लढताना यशस्वी मुकाबला केला असे डॉक्टर्स, विभागप्रमुख सध्या सर्दी-तापाने फणफणाताहेत. वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष ते अंतिम वर्षापर्यंत शिकणारे 29 विद्यार्थी कोरोनाबाधित आहेत. याखेरीज रुग्णालयातील काही निवासी वैद्यकीय अधिकारी, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, परिचारिका यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

रुग्णालयातील वॉर रूम अद्याप अद्ययावत झाली नसल्याने या सर्वांचा एकत्रित आकडा उपलब्ध नाही. पोर्टलवर सध्या आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह असलेल्या 31 रुग्णांचीच माहिती दिसत असली, तरी लक्षणे आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट करून बर्‍याच जणांनी स्वतःचे तत्काळ विलगीकरण करून घेतले आहे. या सर्व कर्मचार्‍यांची विभागनिहाय आणि वर्गनिहाय संख्या एकत्रित केली, तर ती शंभरीचा उंबरठा ओलांडत असल्याचे निदर्शनास येते आहे. या सर्वांमुळे सीपीआरच्या रुग्णसेवेत मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

सर्दी, ताप, खोकला आणि घशात खवखव अशी सर्वसाधारण लक्षणे या वैद्यकीय कर्मचार्‍यांमध्ये आहेत. डिसेंबरच्या उत्तरार्धात हे रुग्ण बाधित होण्यास सुरुवात झाली होती. प्रामुख्याने राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये ही लक्षणे आढळली. या बाधित विद्यार्थ्यांचाच आकडा आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे.

त्यांच्या दरम्यान संसर्ग वाढू नये, यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने शेंडा पार्क इथल्या वसतिगृहात मुलांचे, तर शाहू स्मारकच्या पिछाडीस असलेल्या मुलींच्या वसतिगृहात मुलींसाठी विलगीकरणाचा कक्ष उभारला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे एक पथक संबंधित ठिकाणी जाऊन त्यांना उपचारासाठी मदत करते आहे.

…अन्यथा कोल्हापुरात तिसर्‍या लाटेची स्थिती गंभीर

सीपीआर रुग्णालयात आरोग्य सेवेतील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा काहीअंशी कमकुवतही बनू शकते. नागरिकांनी मास्कला सोडचिठ्ठी दिली आहे. हजारोंचे लग्न समारंभ आणि जेवणावळी उठताना दिसताहेत. बाजारामध्ये नागरिक गर्दी करताना दिसताहेत.

स्वच्छतेचे आणि सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. ही स्थिती कायम राहिली, तर मात्र पहिल्या दोन लाटांमध्ये रुग्णालय आणि रुग्णसेवेतील कर्मचारी खंबीर होते. आता आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांमध्येच संसर्गाचे प्रमाण शिरल्याने उपचारातही अडचणी निर्माण होऊ शकतात, याचे भान राखले पाहिजे; अन्यथा कोल्हापुरात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची स्थिती गंभीर होऊ शकते.

* 31 आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह
* उपचारासाठी 16 जण रुग्णालयात, उर्वरित गृह विलगीकरणात!
* सीपीआरमधील रुग्णसेवेवर परिणाम
* वैद्यकीय शिक्षणच्या विद्यार्थ्यांचे शेंडा पार्कमध्ये, विद्यार्थिनींचे सीपीआरजवळ विलगीकरण
* कोल्हापूरकर बोध घेणार केव्हा?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT