Latest

सिद्धिविनायक दर्शनासाठी क्युआर कोडची सक्‍ती

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सवाच्या मुहुर्तावर राज्यातील मंदीरे उघडण्याच्या परवानगी सरकारने दिली आणि देवदर्शनासाठी राज्यभरातील महत्वाच्या देवस्थानांनी आपापले नियम आता जाहीर केले आहेत. गर्दी होणार नाही आणि कोरोनाचे निर्बंध पाळले जातील याची जबाबदारी देवस्थानांच्या विश्‍वस्तांवर टाकण्यात आल्यामुळे दर्शनासाठी विविध प्रकारचे नियम करण्यात आले असून हे नियम पाळूनच दर्शन घेता येणार आहे. सिद्धिविनायक दर्शनासाठी मंदिराचे मोबाईल अ‍ॅप बंधनकारक करण्यात आले असून क्यूआर कोड दाखवूनच मंदिरात प्रवेश मिळेल.

गुरुवारपासून सिद्धिविनायकाचे दर्शन श्री.सिद्धिविनायक गणपती मंदीराच्या अ‍ॅपवर बुकिंग करुन घेता येईल. दर गुरूवारी दुपारी 12.00 वाजता न्यासाकडून श्रीं च्या दर्शनाकरिता भाविकांसाठी मर्यादित क्युआर कोड दिले जातील. दर तासाला 250 भाविक क्युआर कोड दाखवूनच मंदिरात जाऊ शकतील. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळीच भाविकांना दर्शन घेता येईल, असे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले. एस. के. बोले मार्गावरील सिध्दि प्रवेशद्वार व काकासाहेब गाडगीळ मार्गावरील रिध्दि चेकपोस्ट येथून श्री दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.

कुठे, कसे घ्याल दर्शन?

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरिता दररोज ऑनलाईन बुकिंग केलेल्या 5 हजार तर बुकिंग न करता आलेल्या 5 हजार अशा एकूण 10 हजार भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येईल. रोज सकाळी 6 ते 7 या वेळेत पंढरपूरमधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाईल.

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात श्री अंबाबाईचे दर्शन ई-पासद्वारे देण्याचा निर्णय देवस्थान व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार देवस्थान समितीच्या www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळावर ई-दर्शन पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. 7 ते 13 व दि. 15 या दिवशी पहाटे पाच ते रात्री नऊ तर दि. 14 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत भाविकांना ई-पासद्वारे दर्शन घेता येणार आहे. बुधवारपासून पासची नोंदणी सुरु होणार आहे.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी रोज दोन डोस घेतलेल्या 15 हजार भाविकांना सोडण्यावर निर्णय झाला आहे. डोस घेतलेले नसतील तर मंदिराच्या प्रवेशद्वारातच आधी कोरोना चाचणी केली जाईल.

शिर्डीच्या साईबाबांचा दरबार गुरुवारी पहाटेच्या काकड आरतीने सुरू होईल. मंदिर पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. दररोज 15 हजार भाविकांना दर्शन घेता येईल. यात 5 हजार भाविकांना 5 दिवस अगोदर ऑनलाईन सशुल्क व नि:शुल्क पास आरक्षित करता येऊ शकणार आहे. एका नोंदणीवर चार भाविकांना दर्शन घेता येऊ शकणार आहे. दर गुरुवारी निघणारी पालखी तूर्तास बंद ठेवण्यात आली आहे. भाविकांसाठी भक्‍तनिवास खुले करण्यात येणार आहे. मुखदर्शनही सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र प्रसादालय बंद राहणार आहे.

श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरात गुरुवारपासून दररोज पाच हजार भाविकांना प्रवेश दिला जाईल. भाविकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे किंवा त्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल. मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत खुले राहिल. नि:शुल्क दर्शन पूर्व दरवाजाने, तर 200 रुपये देणगी दर्शन उत्तर दरवाजाने सुरू राहील.

अक्‍कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरातही भाविकांची आरोग्य तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, पुरोहित मंदार पुजारी यांनी दिली.

माहूर रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे संस्थानतर्फे स्पष्ट केले.

* ज्या भाविकांकडे ऑनलाइन आरक्षण नाही अशा भाविकांना सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश मिळणार नाही. क्युआर कोड व्हॉट्स अ‍ॅपवर, फोटोकॉपी आणि स्क्रीनशॉट या स्वरूपात चालणार नाही.

* मुुंबईत महालक्ष्मीच्या मुखदर्शनासाठी www.mahalakshmitemplemumbai या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. यात नेटची अडचण आल्यास 022-23538901 या क्रमांकावरही नोंदणी करता येईल. मोबाईलवर आलेला मेसेज दाखवूनच मंदिरात प्रवेश मिळेल. मंदिर पहाटे 6 ते रात्री 9 पर्यंत उघडे राहील. भक्‍तांनी आणलेली फुले, थाळी, पेढे हातात घेतले जाणार नाहीत. प्रसादही दिला जाणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT