पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहे, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी
'सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला।
नाम आठवितां रूपी प्रकट पैं झाला॥'
संत ज्ञानेश्वरांच्या या ओवीप्रमाणेच 'पुढारी'च्या सुवर्ण महोत्सवाचा ( Pratapsinh Jadhav autobiography ) दिवस कोल्हापूरनं 'अमृते पाहिला!' 22 जून, 1989 चा दिवस उजाडला तोच मुळी सुवर्ण किरणांची उधळण करीतच! 'नाम आठवितां रूपी प्रकट पैं झाला!' हे वर्णन केवळ त्या दिवसालाच नव्हे, तर देशाच्या लाडक्या पंतप्रधानांनाही लागू पडत होतं. कारण या उमद्या, राजबिंड्या आणि द्रष्ट्या राजीव गांधींचे पाय आज शाहूरायांच्या पवित्र करवीर नगरीला लागणार होते. एका मराठी वृत्तपत्राचा सुवर्णमहोत्सव आणि त्याला देशातील सर्वोच्च पदावरील नेता म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधान येणार म्हटल्यावर, हा दिवस 'सोनिया'चा म्हटला, तर त्यात अतिशयोक्ती कसली?
या सोहळ्यानं एक नवा इतिहासच रचला जाणार होता. कारण उजाडल्यापासूनच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 'सर्व रस्ते रोमकडेच जातात', या प्राचीन रोमन उक्तीप्रमाणे, त्या दिवशी कोल्हापुरातील सर्व रस्ते सेंट झेव्हियर्स हायस्कूलच्या प्रांगणाकडेच जात होते! सर्व वाहनांची आणि माणसांच्या पावलांची दिशा तीच होती. कार्यक्रमाची वेळ वास्तविक सकाळी साडेदहाची होती. परंतु, सकाळी नऊ वाजताच मंडप अक्षरशः फुलून गेला. नव्हे, ओथंबून वाहू लागला! कारण खुर्च्यातर केव्हाच भरल्या होत्या. पण खुर्च्यांच्या मागील बाजूस किमान पाच हजार लोक दाटीवाटीनं उभे होते. सुमारे तीसएक हजारांवर जनसमुदायाचे नेत्र या अनुपमेय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आसुसले होते. ( Pratapsinh Jadhav autobiography )
कोल्हापूर, सांगली, सातार्यासह महाराष्ट्राच्या सर्व थरातून तसेच कर्नाटक आणि गोव्यातूनही लोक मोठ्या उत्साहानं आणि औत्सुक्यानं आलेले होते. सर्व थरातील निमंत्रित मान्यवरांसह जनसामान्यांची उपस्थितीही उत्स्फूर्त आणि मोठी होती. ( Pratapsinh Jadhav autobiography )
सनई चौघड्याच्या सुरांनी वातावरण मंगलमय बनलं होतं. सप्तसुरांचा दरवळ वातावरण प्रसन्न करीत होता. व्यासपीठावरच्या पार्श्वभागी 'पुढारी' सुवर्णमहोत्सव अशी फुलांच्या सजावटीनं कोरलेली बहुरंगी अक्षरं आणि पद्मश्री डॉ.ग.गो. जाधव यांची आकर्षक चित्रप्रतिमा लक्ष वेधून घेत होती. सजावटीची फुलं खास बंगळूरूहून मागवण्यात आली होती. शिक्षक, प्राध्यापकांपासून ते थेट नामांकित पैलवानांपर्यंत सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा स्वागत समितीमध्ये समावेश होता. भगवे फेटे बांधून स्वागत समितीच्या सदस्यांची लगबग सुरू होती. सार्या वातावरणात उत्साह ओसंडून वाहत होता. मंडपातील उपस्थितांमध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, जनार्दन पुजारी, मार्गारेट अल्वा, श्रीमती शीला कौल, विधानसभा अध्यक्ष शंकरराव जगताप, महाराष्ट्राचे मंत्री रामराव आदिक, शिवाजीराव देशमुख, अभयसिंहराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, मदन बाफना, राजमाता विजयमाला राणीसाहेब, छत्रपती शाहू महाराज, सांगलीच्या महाराणी पद्मिनीराजे पटवर्धन, डॉ. डी. वाय. पाटील, पतंगराव कदम, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभाताई पाटील, तत्कालीन पालकमंत्री प्रकाश आवाडे, खा. उदयसिंहराव गायकवाड, खा. बाळासाहेब माने यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वांगीण क्षेत्रातील जाणकार मंडळी व जनता उपस्थित होती. ( Pratapsinh Jadhav autobiography )
काही क्षणातच तीन मिलिटरी हेलिकॉप्टर्स आकाशात गरुडांसारखी घिरट्या घालू लागली. सुमारे तीस हजार लोकांचे, किंबहुना सार्या कोल्हापूरचेच डोळे आकाशाला भिडले. 'आले! आले! राजीव गांधी आले!' असा एकच जल्लोष कोल्हापूरभर ध्वनित झाला! ( Pratapsinh Jadhav autobiography )
आकाशात घिरट्या घेणारी हेलिकॉप्टर्स हळूहळू पोलिस ग्राऊंडवर अवतीर्ण झाली. हेलिकॉप्टर्सची घरघर थांबली. गरगरणारे पंखे स्तब्ध झाले. त्यातील एका हेलिकॉप्टरमधून पांढराशुभ्र कुर्ता आणि पायजमा परिधान केलेले राजीव गांधी हसतमुखानं खाली उतरले. सार्या वातावरणावर चैतन्याचा वर्षाव झाला. क्षणभरातच पोलिस ग्राऊंडवरून पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा निघाला आणि बघता बघता समारंभाच्या मंडपाजवळ आला. साडेदहाकडे काटा झुकला आणि जबरदस्त सिक्युरिटीमध्ये राजीवजींचं आगमन झालं. ( Pratapsinh Jadhav autobiography )
पुष्पवृष्टी करीत राजीवजींचं जल्लोषात स्वागत केलं. पाच सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं. झांजपथकाच्या निनादात मोठ्या उत्साही वातावरणात देशाच्या पंतप्रधानांचं स्वागत झालं. तसेच माझी मुलगी शीतल आणि मुलगा योगेश हे लहान होते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. ( Pratapsinh Jadhav autobiography )
त्यानंतर राजीवजी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं झपाझप पायर्या चढत व्यासपीठावर गेले. तिथून त्यांनी जनसमुदायाला हात हलवून अभिवादन केलं. त्याचबरोबर सारा मंडप त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला. 'ही केम, ही सॉ अँड ही काँकर्ड! तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं.' ज्युलियस सिझर या रोमन सम्राटाबद्दल वापरण्यात आलेलं विशेषण या क्षणी राजीवजींना शब्दशः लागू पडलं होतं.
तुतारीच्या गगनभेदी निनादात त्यांना खास कोल्हापुरी भगवा फेटा बांधण्यात आला. अस्सल कोल्हापुरी पारंपरिक पद्धतीनं झालेल्या स्वागतानं हा तरुण नेता भारावून गेला. त्यांच्या देखण्या, हसतमुख, उमद्या आणि राजबिंड्या व्यक्तिमत्त्वानं सार्या जनसमुदायावर मोहिनी घातली होती.
ते स्थानापन्न होताच वाद्यवृंदाचे सूर झंकारून उठले आणि त्या सुरांच्या साथीनं प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी आपल्या सुरेल आवाजात ज्ञानेशांचं पसायदान गायला सुरुवात केली.
'आता विश्वात्मके देवें, येणे वाग्यज्ञे तोषावे।
तोषोनी मज द्यावे, पसायदान हे॥'
ज्ञानेश्वरांच्या या पसायदानानं सारा जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. मराठी समजत नसलं तरी राजीवजी त्या गीताचा आस्वाद घेत होते. कधी शब्दांपेक्षा सूरच मनाला खोलवर जाऊन भिडतात, हे काही खोटं नाही.
पसायदानाचं गारूड रसिक मनावरून उतरतं ना उतरतं, तोच सुरेश वाडकरांनी आपल्या सहकार्यांसोबत स्वागतगीतातून मानाचा मुजरा केला.
'हिमालयाचे स्वागत करतो
सह्याद्री हा महाराष्ट्राचा
राजीवजी हा त्रिवार घ्यावा
मावळ मुजरा महाराष्ट्राचा'
स्वागतगीत ऐन रंगात आलेलं असतानाच अचानक ध्वनिक्षेपण यंत्रणा बंद पडली! एखादा चित्रपट पाहताना मध्येच ध्वनियंत्रणा बंद पडावी आणि क्षणार्धात बोलपटाचा मूकपट व्हावा, तशी तीस हजार प्रेक्षकांची अवस्था झाली. माईक बंद पडताच शरद पवार एकदम अस्वस्थ झाले. ते जागचे उठले आणि लगेच पोलिस अधिकार्यांना बोलावून काय झालं, ते बघायला सांगितलं.
खरं तर, शरद पवारांनी आदल्या दिवशीच मला माईकची तपासणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मी स्वतः ग्राऊंडवर जाऊन माईकची तपासणी केली होती. तेव्हा तर तो उत्तम स्थितीत होता. तरीही तो कसा बंद पडला, याचं मला आश्चर्य वाटलं. आता राजीवजींची प्रतिक्रिया कशा पद्धतीनं उमटणार, या विचारानं मी चिंताग्रस्त झालो. माझ्या चेहर्यावर उमटलेले चिंतेचे भाव राजीवजींच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाहीत. मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो.
"डोंट वरी! इट विल स्टार्ट. डोंट टेक टेन्शन!" अशा शब्दांत राजीवजींनी मला दिलासा दिला.
त्या प्रसंगात मला राजीवजींच्या विशाल अंतःकरणाचं दर्शन झालं आणि कौतुकही वाटलं. दरम्यान, प्रसंगावधान राखून सुरेश वाडकरांनी आपली पट्टी बदलली आणि ते वरच्या सुरात गाऊ लागले.
'आप आये यहाँ तो खुशी छा गयी दूर गम हो गया
रोशनी आ गयी यूँ कि जैसे हुआ है खुदा करम।'
राजीवजींचं स्वागत करताना माझी अवस्था याहून काही वेगळी नव्हती. मी माझ्या स्वागतपर प्रास्ताविकात 'पुढारी'चा इतिहास सांगितला व छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांची महती सांगितली. त्याचबरोबर लहान वृत्तपत्रांपुढील समस्याही मांडल्या आणि कोल्हापूर विषयीही भरभरून बोललो. राजीवजींना श्री अंबाबाईची चांदीची प्रतिमा आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून पुन्हा एकदा त्यांचं जंगी स्वागत व्यासपीठावरून करण्यात आलं. त्यांना राष्ट्रीय ध्वजाच्या सन्मानार्थ तिरंगी पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार, राज्यपाल ब्रह्मानंद रेड्डी आणि केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद, महापौर फाळके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दुर्दैवानं माझ्या भाषणाच्यावेळीही माईक बंदच होता. मला चढ्या आवाजातच बोलावं लागलं. मात्र, शरद पवार बोलायला उभे राहिले आणि माईकला वाचा फुटली. माईक सुरू होताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. कारण आता त्यांना पंतप्रधानांचं भाषण व्यवस्थितपणे ऐकता येणार होतं.
शरद पवारांचं भाषण चालू असतानाच राजीवजींनी प्रेक्षकांतील काही लोकांकडे अंगुलीनिर्देश करीत मला विचारलं, "ते काळे कपडे घालून आलेले लोक कोण आहेत?"
मी म्हणालो, "राजीवजी, ते लोक वकील आहेत. थेट कोर्टातून ते इथं सुवर्ण महोत्सवाला आले आहेत."
"आपने तो 'क्रीम ऑफ सोसायटी'को ही आमंत्रित किया है।" राजीवजी कौतुकानं म्हणाले.
त्यांचा अभिप्राय ऐकून मला माझाच अभिमान वाटला. व्यासपीठावर बसल्या बसल्या आमच्यात बर्यापैकी 'हितगुज' चालू होतं. बोलता बोलता मी त्यांना म्हणालो,
"राजीवजी, कोल्हापूर प्रसिद्ध आहे ते श्री अंबाबाई मंदिरामुळे. अंबाबाई देवी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. आपण देवीचं आवश्य दर्शन घ्यावं!"
त्यावर ते लगेचच पवारांना म्हणाले, "शरद, मला अंबाबाईचं दर्शन घ्यायचंय. तशी व्यवस्था करा."
पवारांनी तशी सुरक्षा व्यवस्था केली नसल्याचं त्यांना सांगितलं. त्यावर राजीवजी म्हणाले, "सुरक्षा व्यवस्थेचा काही प्रश्न नाही. बस, मुझे दर्शन लेना है।"
राजीवजी भाषणासाठी उठून उभे राहिले. मात्र, मघापासून त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कानात प्राण आणून बसलेल्या तीस हजार प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
"यह स्पीकर भी क्या चीज है? इसको गायक की सुरीली आवाज पसंत नहीं। बल्कि राजनेताओं की बेसूर आवाज इसे पसंद है।"
भाषणाच्या प्रारंभीच मघाशी बंद पडलेल्या माईकचा संदर्भ देऊन त्यांनी केलेल्या कोटीवर प्रेक्षकांमधून हास्याचा नि टाळ्यांचा धबधबा कोसळला. या पहिल्याच वाक्याला राजीवजींनी सभा जिंकली होती. तब्बल बत्तीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी श्रोत्यांवर आपली छाप टाकली. विशेष म्हणजे बत्तीस मिनिटांपैकी बारा मिनिटे तर ते फक्त 'पुढारी' आणि आबांवरच बोलले!
" 'पुढारी' हे वृत्तपत्र स्वातंत्रलढ्याशी, काँग्रेस आंदोलनाशी आणि स्वातंत्र्योत्तर सामाजिक क्रांतीशी निगडित आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाशी 'पुढारी'चे कार्य निगडित आहे. 'पुढारी'चे संस्थापक ग. गो. जाधव यांनी स्वातंत्र लढ्यात ब्रिटिशांना विरोध करण्याचे मोलाचे कार्य केले. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी ग. गो.जाधव यांचे जवळचे संबंध होते. 'पुढारी'ने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. शेतकर्यांचे- कष्टकर्यांचे प्रश्न मांडले. 'पुढारी'ने ज्या ध्येयवादाने कार्य केले, त्याच ध्येयवादाने संपूर्ण देश प्रगतिपथावर जाऊ शकेल." अशा शब्दांत त्यांनी 'पुढारी'ची प्रशंसा केली. तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करतानाच, "'पुढारी'नं शाहू महाराजांचा सामाजिक समतेचा विचार पुढे नेला!" असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. देशाच्या पंतप्रधानांनी गौरव करावा, हा 'पुढारी'च्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा सुवर्णक्षण ठरला!
राजीवजींच्या भाषणानंतर आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. माझा निरोप घेऊन झपझप पावलं टाकीतच देशाचं हे उमदं नेतृत्व गाडीत जाऊन बसलं आणि आधीच पवारांना कल्पना दिल्याप्रमाणे ते अंबाबाईच्या दर्शनाला निघून गेले.
समारंभानंतर राजीव गांधी यांच्यासाठी पोलिस खात्याच्या अलंकार हॉलमध्ये मी खास प्रीतिभोजन आयोजित केलं होतं. या प्रीतिभोजनासाठी प्रत्येक क्षेत्रातील पाच दिग्गजांना निमंत्रित केलं होतं. उज्ज्वल नागेशकर यांच्याकडे कॅटरिंगची जबाबदारी सोपवली होती. बुफे पद्धत ठेवली होती. 'पुढारी'च्या कार्यक्रमानंतर राजीवजी इचलकरंजीच्या एका कार्यक्रमाला गेले होते. तिथून ते प्रीतिभोजनासाठी परत येणार होते आणि ते आलेही.
केवळ प्रीतिभोजनासाठी इचलकरंजीची सभा आटोपून राजीवजी परत कोल्हापूरला आले, ही गोष्ट साधी नव्हती. मी राजीवजींच्या हातात भोजनाची प्लेट दिली तसेच पवारांनाही दिली.
"मी या मेजवानीला फारशा राजकारण्यांना न बोलावता प्रत्येक क्षेत्रातील निवडक मान्यवर दिग्गजांनाच बोलावलं आहे." मी राजीवजींना म्हणालो.
त्यांना ते ऐकून समाधान वाटलं आणि माझ्या नियोजनाचं त्यांनी कौतुकही केलं. राजीवजींसह मी आणि पवार निमंत्रित पाहुण्यांच्या समुदायात फिरत होतो. राजीवजींशी मी प्रत्येकाची ओळख करून दिली. प्रत्येकाशी ते दोन शब्द बोलले. यावेळी काहींनी त्यांना निवेदनंही दिली. ती त्यांनी त्यांच्या खासगी सचिवाकडे सोपवली. काहींनी तोंडी गार्हाणं मांडली. तीही त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतली. नेहमी राजकीय नेत्यांचा गराडा असलेल्या राजीवजींना हा सुखद आणि वेगळाच अनुभव होता. मेजवानीचं नियोजन पाहून ते खूपच प्रभावित झाले. विविध क्षेत्रांतील दिग्गजांकडून त्यांना जी माहितीरूपी मेजवानी मिळाली, त्यामुळे ते अधिक प्रभावित झाले.
प्रीतिभोजनानंतर आम्ही सुवर्ण महोत्सवासाठी उभारलेल्या भव्य मंडपातच दुपारी काँग्रेसचा मेळावा पार पडला. मेळावाही चांगला झाला. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी या मेळाव्यातच काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
सायंकाळी चार वाजता राजीव गांधी यांचं प्रयाण होणार होतं. मी त्यांना निरोप द्यायला पोलिस ग्राऊंडवर गेलो. त्यांच्याशी शेकहॅण्ड केला. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. राजीवजी 'पुढारी'च्या कार्यक्रमाने आणि त्यानंतर सर्व क्षेत्रातील निमंत्रिताबरोबर झालेल्या संवादाने फारच भारवून गेले होते. त्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल माझे पुनश्च अभिनंदन केले.
मी त्यांना म्हणालो, "राजीवजी, आपण 'पुढारी'च्या सुवर्ण महोत्सवासाठी खास कोल्हापूरला आलात, यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे.
पण हजरजबाबी राजीवजी लगेच उद्गारले, "जाधवजी, इट्स माय प्लेझर."
राजीवजींच्या हेलिकॉप्टरनं आकाशात झेप घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं मी भारावून गेलो होतो. तसेच सुवर्णमहोत्सव भव्यदिव्य स्वरूपात प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत साजरा झाला. याचं मनाला अतीव समाधान वाटत होतं. दृष्ट लागावा असा हा सोहळा झाला आणि 'पुढारी'च्या शिरपेचात एक नवा मानाचा तुरा खोवला गेला. हा सुवर्णमहोत्सवी सोहळा माझ्या 'मर्मबंधातली ठेव' झाला, यात शंकाच नाही.
खरं तर पंतप्रधानांचा कार्यक्रम घेणं हे एक अग्निदिव्यच असतं. दौरा ठरवणं, कार्यक्रमाची काटेकोर तयारी करणं, त्याचबरोबर सर्व प्रकारचे शिष्टाचार सांभाळणं हे सर्व डोळ्यात तेल घालून करीत असतानाच पंतप्रधानांचा दौरा ऐनवेळी रद्द तरी होणार नाही ना, याची टांगती तलवार डोक्यावर कायम असते. कारण कुठे काही इमर्जन्सी निर्माण झाली, तर ऐनवेळीही दौरा रद्द होऊ शकतो. अशा घटना अधूनमधून कुठेतरी घडतच असतात. त्यामुळे मनावर त्याचाही ताण होताच. गेला महिनाभर सारी तयारी चालू असतानासुद्धा मी या तणावाखाली वावरत होतो. मात्र, राजीवजींचं आगमन झालं, कार्यक्रम पार पडला आणि सारा ताणतणाव कुठल्याकुठे पळून गेला!
'टाइम्स' आणि 'मल्याळम मनोरमा' यांच्या कार्यक्रमांना मी उपस्थित होतो. त्या दोन्ही कार्यक्रमांत राजीवजी त्या दोन्ही वृत्तपत्रांबद्दल फारसे बोलले नव्हते. 'पुढारी'बद्दल आणि आबांच्याबद्दल मात्र ते भरभरून बोलले. कार्यक्रमानंतर दोन दिवसांनी राजीवजींचे प्रेस सेक्रेटरी जी. पार्थसारथी यांचा मला दिल्लीहून फोन आला.
"जाधवजी! यू हॅव क्रिएटेड हिस्ट्री! राजीवजी इज व्हेरी इम्प्रेस्ड!" पार्थसारथी मला अत्यानंदानं सांगत होते.
"राजीवजींनी 'पुढारी'बद्दल गौरवोद्गार काढले. त्याबद्दल मी त्यांचा नितांत आभारी आहे." मी त्यांना कृतज्ञतापूर्वक म्हणालो,
"'पुढारी' आणि ग. गो. जाधव यांचं स्वातंत्र्य चळवळीत आणि दलित आंदोलनात मोलाचं योगदान होतं, याची माहिती राजीवजींनी कोल्हापूरला येण्याआधीच मिळवलेली होती." पार्थसारथी सांगत होते, "त्यांनी महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चाही केली होती. आपल्या वडिलांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्यानं आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यानं राजीवजी खूपच प्रभावित झाले होते. म्हणूनच राजीवजी 'पुढारी' आणि 'पुढारी'कारांबद्दल भरभरून बोलले." हे ऐकूण कोणाला धन्य वाटणार नाही!
आमच्यावरचं सुवर्ण महोत्सवाचं गारूड अद्याप पुरेसं उतरलेलं नव्हतं, तोच पार्थसारथींचा मला पुन्हा एकदा फोन आला. त्यांनी मला राजीवजींच्या सोबत त्रिदेश दौर्याचं निमंत्रण दिलं. माझ्यासाठी हा माझा फार मोठा सन्मानच होता. त्यावेळी त्यांनी मला जे सांगितलं ते त्रिदेश दौर्याहूनही महत्त्वाचं होतं. ते म्हणाले,
"राजीवजी मेजवानीसाठी बोलावण्यात आलेल्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांमुळे खूपच प्रभावित झाले आहेत. अन् अशा मेजवानीवेळी 'क्रीम ऑफ सोसायटी' निमंत्रित करण्याचा 'कोल्हापूर पॅटर्न' रूढ करावा, अशा सूचनाच त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांशी चर्चा करता येते, अशी त्यांची भावना झालेली आहे." यापेक्षा 'पुढारी'च्या यशाचं गमक वेगळं ते काय असणार आहे! देशाच्या पंतप्रधानांना 'पुढारी'च्या सुवर्ण महोत्सवाला बोलावणं, ही अनेकांना अशक्य कोटीतील गोष्ट वाटली होती. परंतु, माझी जिद्दच मला माझ्या स्वप्नापर्यंत घेऊन गेली आणि अखेर स्वप्न सत्यात उतरलं! ही नशिबाची किंवा भाग्याची गोष्ट मुळीच नाही. आत्मप्रौढीचा धोका पत्करूनही मी असं म्हणेन, की केवळ माझ्या 'जिद्दीची' गोष्ट आहे. कारण नशिबात असेल तेवढंच मिळेल, असा विचार मी कधीच केला नाही. याउलट आपलं नशीब हे आपणच घडवलं पाहिजे. या मताचा मी आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे उद्गार याबाबतीत लक्षणीय आहेत.
"Our destiny is not written for us, but by us."
'आपलं नशीब हे कुणी आपल्यासाठी लिहिलेलं नसतं, तर आपणच आपल्यासाठी ते लिहायचं असतं.' आणि मीही याच विचाराचा आहे.
-डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव
मुख्य संपादक, दैनिक पुढारी