Latest

सिंहायन आत्मचरित्र : दिल्‍लीतील सत्तानाट्य

अमृता चौगुले

पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्‍नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

साल 1991… 'In politics, nothing happens by accident. If it happens, you can bet it was planned that way.'

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष होते फ्रँकलिन डी. रूझवेल्ट. विशेष म्हणजे ते अमेरिकेच्या अध्यक्षपदी सलग चारवेळा निवडून आले होते. त्यांची अध्यक्षपदाची एकूण कारकीर्द 13 वर्षांची होती. अशा या असामान्य व्यक्‍तिमत्त्वाचं हे ऐतिहासिक विधान. या विधानाची प्रचिती भारतीय राजकारणात, एकदा नव्हे तर पुनःपुन्हा आणि पदोपदी आलेली आहे. वानगीदाखल आपण राजीव गांधींच्या निधनानंतर देशात रंगलेला राजकारणाचा खेळ पाहिला, तरी रूझवेल्ट यांचं विधान खरं वाटतं.

21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची हत्या झाली आणि राजकारणाचा सारा सारीपाटच बदलून गेला. राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण करणं तर दूरच; पण काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्वावरूनच सुंदोपसुंदी सुरू झाली. आपल्यामागे आपल्या पक्षामध्ये अशी यादवी माजेल, असं राजीवजींना स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल. परंतु, त्यांची पावलं नेहमीच जमिनीवर होती. जनतेला एकतेचा मंत्र देताना ते एकदा म्हणाले होते,

'हर व्यक्‍ती को इतिहास से सबक लेना चाहिए। हमें यह समझना चाहिए कि जहाँ कही भी आंतरिक झगडे और देश में आपसी संघर्ष हुआ हैं, वह देश कमजोर हो गया है। और देशको ऐसी कमजोरी के कारण बडी कीमत चुकानी पडती है।'

परंतु, सत्तासंघर्षाच्या कैफात राजीवजींचा हा अनमोल विचार काँग्रेसवाल्यांच्या डोक्यावरून गेला. मुळात जिथं विचार संपतो, तिथेच सुंदोपसुंदी जन्माला येते.

अन् या सुंदोपसुंदीचं रणांगण होतं, भारताची राजधानी दिल्ली. ज्या दिल्ली शहरानं परकीयांची असंख्य आक्रमणं, अत्याचार पचवले. सत्तेच्या दर्पात राहणारे अनेक राज्यकर्ते पाहिले. ज्यांच्या हातात जनतेचं भलं करण्याचे सुकाणू असतात, तेच स्वार्थांध निघाल्याचे कडवे घोट पचवले… तेच हे दिल्ली शहर. इथं सत्ताधारी आणि जनतेची नाळ कधी जुळलीच नाही. फक्‍त स्वतःपुरतं पाहायचं हा या मातीचा गुणच असावा की काय, अशी शंका यावी, इतका तो इथल्या राज्यकर्त्यांच्या, जनतेच्या अंगी भिनलेला. त्याचे चटके स्व. यशवंतराव चव्हाण यांनाही बसलेले. मीसुद्धा दिल्लीला असंख्य वेळा गेलो, आजही जात असतो. स्व. यशवंतराव चव्हाण, वेणूताई होत्या तेव्हा तर माझं येणंजाणं, तिथं राहणं हे नेहमीच घडायचं. त्यावेळी दिल्लीकरांना वाचण्याचा, त्यांची मानसिकता अभ्यासण्याचा, त्यांच्या व्यवहाराचा अनुभव घेण्याचा योग मलाही आला. अर्थात, मला राजकारणात विशेष गोडी व गती असल्यानं प्रथम माझं लक्ष तिकडेच असायचं. पण, दिल्लीचं राजकारण हे प्रचंड अनिश्चिततेचं. आपलं कोण अन् परकं कोण, हे एखाद्याचा राजकीय 'गेम' झाला तरी त्याला कळूनही येणार नाही, इतक्या सहजतेनं ते होतं असतं व संबंधिताला जे आपले वाटतात, ते केव्हा त्याच्यापासून दूर होतात, समोरच्या कळपाशी हातमिळवणी करतात हे कळूनही येत नाही. इथल्या सत्तेला एक विशिष्ट दर्प आहे. तो अंगी भिनवावा लागतो. इथं गटातटाचं राजकारण चालतं. त्याचे कंगोरे लक्षात घ्यावे लागतात. नाहीतर आपल्यापेक्षा जड होत आहे नं…, मग पंख कापा, पंख कापणं जमत नसेल तर ते उपटून टाका, तेही जमत नसेल तर त्याला उखडून फेकून द्या… या मंत्रावरच दिल्लीच्या राजकारणाची वाटचाल आजही राहिली आहे. अन् ती परिस्थिती कधीही बदलणार नाही.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत रंगलेल्या राजकीय खेळाच्या काळात मी दै.'पुढारी'च्या सर्वच कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं असलं तरी तिकडेे माझं बारीक लक्ष होतं. त्याशिवाय दिल्‍लीतील आमच्या प्रतिनिधीला मी डोळ्यांत तेल घालून सगळ्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून राहायला सांगितलं होतं. राजीव गांधी यांच्याशी माझे मैत्रीचे पदर घट्ट होत असतानाच त्यांची दुर्दैवी हत्या झालेली. ते कटू घोट पचवत असतानाच सत्तेचा हा सारीपाट रंगलेला. विशेष म्हणजे सत्तेच्या या सारीपाटावर प्रथमच गांधी घराण्यातील कोणी नव्हते. त्यामुळे तर मला अधिक जिज्ञासा निर्माण झालेली.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया थांबली होती. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर, पुन्हा निवडणुकीची धामधूम सुरू झाली. साहजिकच राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्येनं देशभर सहानुभूतीची लाट पसरली होती. त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला झाला हे निर्विवाद. राजीव गांधी यांची हत्या होण्यापूर्वी उत्तर भारतातील मतदान आटोपले होते व दक्षिण भारतातील व्हायचे होते. निवडणुकीचे निकाल पाहिले तर, उत्तर भारतात काँग्रेसची जबरदस्त पिछेहाट झालेली व दक्षिण भारतानं काँग्रेसला हात दिल्याचं अगदी स्पष्टपणे दिसून येत होतं. राजीव गांधी यांची हत्या झाली नसती, तरी तोच कल दक्षिणेत राहण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळेच तेव्हा काँग्रेस सत्तेच्या आसपासही फिरकणं तसं अवघडच होतं. त्याला या अगोदर दिल्लीत व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर यांच्या काळात निर्माण झालेल्या राजकीय अनागोंदीचा जसा पदर होता, तसा जनतेचाही काँग्रेस पक्षावरचा विश्वास उडत चालल्याचं ते निदर्शक होतं. बोफोर्सच्या आरोप-प्रत्यारोपाबरोबरच, मंडल आयोगही निर्णायक ठरला होता. त्याच काळात रामजन्मभूमीचं आंदोलनही चरमपंथावर पोहचू लागलेलं. तरी राजीव गांधी यांच्या अमानुष हत्येनं काँग्रेस पक्षाला हात दिला, हे ऐतिहासिक सत्य आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 244 जागा मिळाल्या. मात्र, एवढं होऊनही बहुमत मिळालं नाही. परंतु, डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. सत्ता स्थापन करता येते याची खात्री पटताच, पक्षांतर्गत नेतेपदासाठी सुंदोपसुंदी सुरू झाली.

दिल्लीत घडणार्‍या घडामोडींमुळे मी दिल्लीत जाऊन राहिलो. यावेळी दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची अचानक एन्ट्री झाली. भारतीय राजकारणात तेव्हा तरी दक्षिण-उत्तर अशा मोठ्या लॉबी कार्यरत होत्या आणि त्यामध्ये उत्तर भारतीय लॉबीचं वर्चस्व होतं. पवार यांच्या निसरड्या राजकारणाचा अनुभव सर्वांनाच आलेला होता. अशा परिस्थितीत इतर काँग्रेसवासी त्यांना स्वीकारतील का; असा प्रश्‍न एका उत्तर भारतीय नेत्यानंच मला विचारला होता. उत्तर भारतीय राजकारण्यांचा पवारांवर काडीमात्र विश्‍वास नव्हता, असं त्या नेत्यानंच मला सांगितलं होतं. शिवाय त्यावेळी नरसिंहराव यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली. त्याला छेदणं पवारांना कधीही शक्य नव्हतं, हेही त्यानं आवर्जून सांगितलेलं. शरद पवारांच्या दिल्लीतील एन्ट्रीवर आर. के. लक्ष्मण यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये चांगले व्यंग्यचित्र प्रसिद्ध केलं होतं.

17 जून 1991 रोजी निवडणुकीचे निकाल स्पष्ट होऊ लागले, तशी काँग्रेस नेत्यांची दिल्‍लीच्या दिशेनं मॅरेथॉन सुरू झाली. बघताबघता सर्व ज्येष्ठ नेते दिल्‍लीत एकत्र येऊ लागले. पक्षाध्यक्ष नरसिंहराव, अर्जुनसिंग, माधवसिंग सोळंकी आणि भजनलाल यांची खलबतं सुरू झाली. या चर्चेतून पी. व्ही. नरसिंहराव यांनाच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा असल्याचे संकेत मिळाले. दिल्‍लीत या हालचाली चालू असतानाच कहानी में ट्विस्ट आ गया! तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार हे राजधानीत डेरेदाखल झाले. पण कुठेतरी अज्ञातवासात निघून गेले. संध्याकाळपर्यंत ते कुठे होते, याचा कुणालाच पत्ता नव्हता.

त्यांनी नरसिंहरावांचीही भेट घेतली नव्हती. अज्ञात ठिकाणी त्यांची कोणाशी तरी गुप्‍त खलबतं चाललेली होती. त्याचवेळी नेतेपदासाठी अर्जुनसिंग, एन. डी. तिवारी, माधवराव सिंधिया, दिनेश सिंग यांनी गुडघ्याला बाशिंगं बांधली होती. मात्र, तिवारी आणि दिनेश सिंग हे पराभूत उमेदवार होते. त्यामुळे त्यांचं बाशिंग वांझोटं होतं. तसेच माधवराव सिंधियांच्या पाठीराख्यांची संख्याही फारशी नव्हती, तर शरद पवार हे मुळात लोकसभा सदस्यच नव्हते. राहता राहिले अर्जुनसिंग; पण ते स्वतःच नरसिंहरावांचे समर्थक होते. अर्जुनसिंग यांच्या नरसिंहरावांच्या पाठीमागे राहण्यामध्येही स्वार्थ होता. त्या काळात नरसिंहराव यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना रक्‍तदाब व मधुमेहाचा त्रास होता. ते पाच वर्षे पंतप्रधान पदावर राहतील, याचा काँग्रेस जणांनाच विश्वास वाटत नव्हता. आपसूकच रावांनंतर कोण, हा प्रश्न पुढे येणारच होता व त्या संधीचा फायदा घेण्याचे मनसुबे अर्जुनसिंग यांनी मांडले होते! दुसरी बाब म्हणजे, उत्तर भारतात काँग्रेसला मोठा फटका बसलेला व दक्षिण भारतात काँग्रेसचे खासदार मोठ्या संख्येनं निवडून आलेले. ते नरसिंहरावांसारख्या बुद्धिवादी व आपल्या माणसाला सोडून थोडेच अर्जुनसिंगांसारख्यांच्या पाठीमागे उभा राहणार होते! तर, गांधी घराण्याच्या समर्थकांना सोनिया गांधी या वर्षदीड वर्षांत सत्ता हातात घेतील, असा विश्वास वाटत होता. स्वाभाविकच तेव्हा तरी नरसिंहरावांचं पारडं जड झालं होतं. राजीवजींच्या हत्येनंतर नरसिंहरावांकडे पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हाही नरसिंहराव एक वेगळीच चाल खेळले होते. आपल्या नावावर शिक्‍कामोर्तब होत आहे, हे दिसून आल्यानंतर त्यांनी पक्षाध्यक्ष पदासाठी नारायणदत्त तिवारी यांचंही नाव पेरलं होतं! अर्थात, नारायणदत्त तिवारी यांचं नाव गांधी घराण्याला कधीही मान्य होणार नाही, याची त्यांना खात्री होती. अन् झालंही तसंच. अर्थात, नारायणदत्त तिवारीसारख्या तिकडच्या हेवीवेट नेत्याचं नाव पुढे आल्यामुळे इतरांचे ताबूत थंड होणं साहजिकच होतं. तो धोकाही नरसिंहराव यांनी असा दूर केला होता. राजकारणाच्या पटावर कोण कोणत्या व कशा पद्धतीने सोंगट्या हलवतो, आपले सरदार-दरकदारांच्या चाली ठरवतो, नियंत्रित करतो याला कमालीचं महत्त्व असतं व या बाबतीत तेव्हा तरी नरसिंहराव शरद पवार यांना सर्वच बाबतीत सरस ठरले होते, असंच चित्र होतं.

परंतु, शरद पवारांचा अद्याप एक डाव शिल्‍लक होताच. दिवसभर अज्ञातस्थळी असलेले शरद पवार रात्री अचानक पत्रकारांसमोर प्रकट झाले. नेता निवडीत एकमत होत नसेल, तर निवडणुकीनं निर्णय घ्यावा; असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. याचा अर्थ सरळ होता. त्यांना पंतप्रधानपदाची निवडणूक लढवायची होती आणि त्याच इराद्यानं ते दिल्‍लीत दाखल झाले होते! परंतु, 'नरसिंहरावांच्या नावावर एकमत होत आहे,' असं पत्रकारांनीच त्यांना जेव्हा सांगितलं, तेव्हा त्यांनी त्यावर मासलेवाईक उत्तर दिलं. ते म्हणाले, "मला त्याची माहिती नाही. हे मला कोणी सांगितलेलं नाही."

दुसर्‍या दिवसापासून शरद पवारांनी नेतेपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी चालू केली. त्याचीच एक चाल म्हणून नेतेपदाची निवड गुप्‍त मतदान पद्धतीनं व्हावी, अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली. त्याशिवाय अन्य पक्षांच्या नेत्यांशीही त्यांनी संपर्क साधला. चौधरी चरणसिंगांचे पुत्र अजितसिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक आणि मार्क्सवादी नेते एच. के. सुरजित या सर्व बिनीच्या नेत्यांशी त्यांनी संधान बांधलं. तसेच पश्‍चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्याशीही त्यांनी फोनवरून चर्चा केली. तोवर पवारांना पाठिंबा द्यावा, असं गोविंदराव आदिक यांनी जाहीर निवेदनच काढलं. काही असो, पण पवारांच्या चिकाटीची दादच द्यायला हवी. ते हरेपर्यंत जिंकण्याचे प्रयत्न कधी सोडत नाहीत. परंतु, पी. व्ही. नरसिंहराव हे आपल्याला कोणत्या पद्धतीने जड जातील, याचा विचार पवार यांनी केलाच नसावा, असेच एकंदरीत परिस्थिती सांगत होती.

पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे निजी सचिव म्हणून राम खांडेकर हे अधिकारी होते. यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीपासून या खांडेकरांशी माझा संबंध. मी दिल्लीला गेलो, की त्यांच्याशी अनेकदा भेट व्हायची. अनेक विषयांवर चर्चा घडायची. तर, राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा नरसिंहराव हे नागपूरमध्ये होते व त्यांच्यासोबत खांडेकर होते. नरसिंहराव यांना राजीव गांधी यांची हत्या झाल्याचे कळले. हा त्यांच्यासाठीही धक्‍का होता. परंतु, त्यातून ते सावरल्यानंतर आपल्याला आता मोठी संधी चालून आल्याचे नरसिंहराव यांनी हेरले होते व त्याद‍ृष्टीने त्यांची पावले पडू लागल्याची माहिती मला खांडेकरांनीच दिली होती.

पवारांचा स्वभाव म्हणजे, हाती असलेल्या आयुधांच्या साहाय्याने रेटून नेण्याचा. परंतु, नरसिंहराव हे कमालीचे धूर्त. त्यांचा दिल्लीच्या राजकारणात स्वतःचा गट नसला तरी ते इंदिरा गांधींचे विश्वासू शिलेदार होते. 1973 पासून त्यांनी केंद्रात गृह, परराष्ट्र, मनुष्यबळ विकास, संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळलेली. तत्पूर्वी ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. अफाट व्यासंग, बुद्धिमत्ता, राजकीय समज आदी गुणांनी त्यांचा दिल्ली दरबारात दबदबा होता. तरीही त्यांना 1991 मध्ये काँग्रेसने लोकसभेचे तिकीट दिले नव्हते. निवडणुकीनंतर दिल्ली सोडायची व आपल्या हाती काहीतरी काम असावे म्हणून कोट्टीयम येथील मठाचं आमंत्रण त्यांनी स्वीकारलं होतं! तिथं ते काय करणार होते, तर मठासाठी वेदांसारख्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून लेखन. पण विधिलिखित काही वेगळंच होतं. चंद्रास्वामी हे दिल्ली वर्तुळातील जबरदस्त व प्रभावशाली व्यक्‍तिमत्त्व. इंदिरा गांधींपासून त्यांचा अनेकांवर प्रभाव. हे चंद्रास्वामी नरसिंहराव यांना नेहमी म्हणायचे, 'देशाच्या सर्वोच्च पदावर तुमचं नाव आहे!' स्वतःचं पुस्तकासह अर्धंअधिक सामान आपल्या गावाकडे म्हणजे हैदराबादला पाठवलेल्या व निवडणूक झाल्यानंतर मठाच्या कामाला वाहून घेण्याच्या विचारात असलेल्या नरसिंहराव यांच्याकडे पंतप्रधानपद चालून येतं, याला नशिबाचा खेळ म्हणायचं नाही, तर दुसरं काय!

नरसिंहराव यांना आपल्या भविष्याचा अंदाज आला होता व त्याद‍ृष्टीने त्यांची पावलं पडू लागलेली. त्यांना घाई नव्हती. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर पंतप्रधानपदाचं बाशिंग बांधून सजलेल्या प्रणव मुखर्जींना तेव्हा काँग्रेसही सोडावी लागलेली, हे उदाहरण त्यांच्यासमोरच होतं. रात्री नागपुरात ही बातमी कळल्यानंतर दुसर्‍या दिवशी नरसिंहराव विमानानं दिल्लीला यायला निघाले. पण, तत्पूर्वी त्यांनी काय केलं असेल? तर, त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांची वेळ घेतली. व्यंकटरमण काय किंवा नरसिंहराव काय, दोघेही बुद्धिवादी व व्यासंगी. त्या अगोदर राष्ट्रपती पदासाठी व्यंकटरमण व नरसिंहराव यांच्यात रस्सीखेच झालेली व त्यावेळी व्यंकटरमण यांनी बाजी मारलेली. तरीही दोघांची मैत्री कायम होती. अन् आता तर त्यांनी तातडीने नरसिंहराव यांना भेटीची वेळ दिलेली. अटीतटीच्या प्रसंगी दाक्षिणात्य लोक आपल्या लोकांच्या मागे कसे उभे राहतात, हे यातून ध्वनित होत होतं. मग आपसूकच प्रश्न येतो, तो शरद पवारांच्याबाबतीत हे घडलं असतं का? पवारांनी कधीही दुसर्‍या मराठी नेत्याला बरोबर घेतलं नाही, हा इतिहास आहे. तर, दिल्लीत आल्यानंतर नरसिंहराव यांनी प्रथम काय केलं, तर काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. सोनिया गांधींची भेट घेऊन आले व ते राष्ट्रपतींनाही भेटले! यावेळी शरद पवार काय करीत होते, तर त्यांनी पक्षाध्यक्ष व पंतप्रधान पद वेगवेगळ्या व्यक्‍तींकडे असावे अशी मागणी केलेली. ती कशासाठी… तर लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने काँग्रेसला तातडीने पक्षाध्यक्ष नेमणं आवश्यक होतं व त्या पदावर सोनिया गांधी यांची नियुक्‍ती करावी असा प्रस्ताव काँग्रेसच्या बैठकीत आलेला व त्याला अर्जुनसिंग, सीताराम केसरी आदींचा पाठिंबा होता. असं काही झालं व सोनिया गांधी पक्षाध्यक्ष झाल्या तरी त्यांनी पंतप्रधान होऊ नये व ते रान आपल्यासाठीही मोकळे असावे असा पवारांचा उद्देश लपला नव्हता. अगोदरच दिल्लीमध्ये पवार हे भरवशाचे नाहीत, अशी हवा नेहमीच खेळते. त्यात पवारांनी हे खेकटं स्वतःहून ओढवून घेतलेलं. अन् त्याच बैठकीत नरसिंहराव यांनी मात्र मौन पाळलेलं! दोन पदांचा मुद्दा अधोरेखित करून पवारांनी सोनिया गांधींसह त्यांच्या समर्थकांनाही दुखावलेलं. शिवाय पवारांवर तेेव्हा अविश्वास दाखवण्यापाठीमागेही काही महत्त्वाची कारणं होती. एकतर पवार हे पन्‍नाशीतले व गांधी घराण्याला आव्हान देतील अशी भावनाही पसरलेली. अर्थात ती पुढे खरीच ठरली. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याबरोबर असलेला घरोबाही पवारांना चांगलाच महागात पडलेला. अशा काही शक्‍तींना बरोबर घेऊन पवार काँग्रेसमध्ये फूट पाडून पंतप्रधान पदावर दावा करणार असल्याची चर्चाही तेव्हा व्हायची. साहजिकच पवारांच्याबाबतीत सोनिया गांधी यांना कमालीचा अविश्वास होता व त्यांचा पवारांना पाठिंबा मिळणं तितकं सोपं नव्हतं. साहजिकच पवार पंतप्रधानपदाची अर्धी लढाई इथंच हरलेले. सोनिया गांधी यांचा पाठिंबा मिळाला तरी पक्षातही आपल्याला बहुमत मिळायला हवे, याचे भान नरसिंहराव यांना होते. याबाबतीत पवार कमालीचे कमी पडले. खासदारांची जुळवाजुळव करण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला तेव्हा पवारांसाठी काम करणारांमध्ये कोण होते, तर सुरेश कलमाडी. अन् नरसिंहराव यांच्यासाठी मात्र चंद्रास्वामी, डॉ. सुब्रमण्यम स्वामी, पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे दिग्गज काम करीत होते. पी. सी. अलेक्झांडर हे त्या काळातील अत्यंत धूर्त व्यक्‍तिमत्त्व. त्यांना दिल्लीतील सत्तावर्तुळ व पक्षातील सत्ताप्रवाहाची उत्तम जाण होती. बरे, त्यांनी इंदिरा गांधी व राजीव गांधी हे पंतप्रधान असताना त्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केलेले. कोणाला किती महत्त्व द्यायचे, कोणाशी काय बोलायचे याची त्यांना उत्तम जाण होती. राजकारणाबरोबरच प्रशासनावरही मजबूत पकड असलेला हा नेता नरसिंहराव यांनी बरोबर घेतलेला. त्यांना दिल्लीत थांबण्यास सांगून त्यांच्याकरवीच सर्व चाली रचण्याचे तंत्रही अवलंबलेले. त्यांच्याबरोबर अर्जुनसिंग, माखनलाल फोतेदार, कॅ. सतीश शर्मा हीही सोनियानिष्ठ मंडळी मैदानात उतरलेली. म्हणजे राजकीय चाली रचतानाही पवार हे एकटेच पडलेले होते! पुढे पवार यांनीच, तेव्हा सुरेश कलमाडी यांनी खासदार जमवण्याची किंवा पाठिंबा मिळवण्याची मोहीम खूपच उथळपणे राबवल्याची जाहीर कबुली दिल्याने याबाबत अधिक भाष्य करण्याची तशी गरज नाही.

निष्ठावंत गट पूर्णपणे राव यांच्याच पाठीशी होता. अर्जुनसिंग आणि करुणाकरन हे राव यांची एकमताने निवड व्हावी, यासाठी प्रयत्नशील होते आणि पवार मतदानावर अडून होते. एका पंचतारांकित हॉटेलमधून ते आपली सूत्रं हलवीत होते. उद्योगपती अंबानी, सिंघानिया, बजाज यासारख्या उद्योगपतींचा त्यांना अंतस्थ पाठिंबा होता आणि त्यांचे प्रतिनिधी पवारांसाठी धावपळ करीत होते. आणखीही अनामिक शक्‍ती पवारांच्या पाठीशी असल्याचं बोललं जात होतं. पवार हे एक गूढ व्यक्‍तिमत्त्व म्हणूनच प्रसिद्ध होतं आणि त्यात तथ्यही होतं. ते आपले पत्ते नेहमीच शेवटी ओपन करीत असत.

हे ठाऊक असल्यानंच अर्जुनसिंग यांनी स्वतः त्यांना फोन केला. त्यांनी सन्मानपूर्वक माघार घ्यावी, यासाठी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण सहजासहजी मानतील ते पवार कसले! परंतु, राजकारणात साम, दाम, दंड, भेद यांचा सढळ हातानं वापर केला जातो. जसा तो पवार करीत होते, तसाच आता प्रतिस्पर्ध्यांनीही तेच हत्यार त्यांच्याविरुद्ध वापरायचं ठरवलं. झालं असं, की तेव्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे होते. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एक भलताच गौप्यस्फोट केला. लोकसभेसाठी पुणे मतदार संघातून बॅ. विठ्ठलराव गाडगीळ हे पक्षाचे उमेदवार होते. त्यांना कटकारस्थान करून पाडण्यात आलं होतं. त्यात महत्त्वाच्या नेत्यांचा हात असल्याचा अहवाल आपल्याकडे आला असल्याचं, निलंगेकरांनी जाहीर केलं. आता हा महत्त्वाचा नेता कोण, हे सांगण्याची आवश्यकताच नव्हती. पवारांच्या विरोधात त्यांनी आघाडीच उघडली. पवारांचं नैतिक खच्चीकरण करून त्यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीमधून मागे खेचण्यासाठी टाकलेला हा डाव होता, याची शक्यता काही नाकारता येत नव्हती. म्हणजे दाक्षिणात्य नेता म्हणून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटकचे नेते पी. व्ही. नरसिंहरावांच्या पाठीमागे उभे राहतात व महाराष्ट्रातील नेते पवारांनाच विरोध करतात! ही विसंगती निर्माण व्हायचे कारण म्हणजे पवारांनी जे पेरलं होतं, तेच उगवलेलं!

सुरेश कलमाडी हे तेव्हा पवारांचे हनुमान बनले होते. त्यांनी पवारांसाठी जोरदार खटपट चालवली होती. गुप्‍त पद्धतीनंच मतदान व्हावं, यासाठी त्यांनी एक निवेदनच तयार केलं होतं. त्यावर सह्या घेण्याची मोहीम त्यांनी उघडलेली. परंतु, केवळ एकोणीस जणांनीच त्या निवेदनावर सह्या केल्या. मग के. करुणाकरण आणि सिद्धार्थ शंकर रे यांनी सह्या करणार्‍या सदस्यांची फेस टू फेस मतं जाणून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा 19 पैकी 12 जणांनी नांगी टाकली आणि अवघे सातच सह्याजीराव उरले.

अजित पवार, विदुला नवले, धर्माण्णा सादूल, माणिकराव गावित, बापू चावरे, शंकरराव काळे आणि डॉ. वसंतराव पवार हेच काय ते पवारांचे समर्थक! यातून राव यांनाच वाढता पाठिंबा असल्याचं चित्र स्पष्ट झालं. तेव्हा परिस्थितीची प्रतिकूलता ध्यानी आल्यामुळे पवार यांनी नेतेपदासाठी राव यांचंच नाव सुचवा, असा त्या सात जणांना घाईघाईनं निरोप धाडला! मग त्यांनी राज्यसभा उपाध्यक्षा नजमा हेपतुल्ला, पी. शिवशंकर, एन. के. पी. साळवे यांना बरोबर घेतलं. थेट राव यांचं निवासस्थान गाठलं आणि रावांचं नेतृत्व बिनशर्तपणे मान्य केलं. त्यांनी नेतेपदाच्या पर्यायानं पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून सन्माननीय माघार घेतली. त्यावेळी आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे पवारांच्या पाठीमागे जी उद्योगपतींची लॉबी उभी होती; त्यांनी नरसिंहराव यांचं पारडे जड होत आहे, हे दिसल्यानंतर पवारांचा कळप सोडून दिला. त्यांनाही आपल्या उद्योगधंद्यांची काळजी होतीच.

आदल्या दिवशीच्या बैठकीत एकमतानेच नेता निवड होईल, असा निर्णय जाहीर झाला होता. तरीही कलमाडी यांनी गुप्‍त मतदानाचा आग्रह धरणारं निवेदन प्रसिद्ध केलंच. तेव्हा काही ज्येष्ठ नेत्यांनी पहाटेलाच जाऊन पवारांची भेट घेतली. त्यांना समजावून सांगितलं. मग मात्र पवारांनी घूमजाव केलं आणि आपल्या समर्थकांना, रावांचं नाव सुचवावं असा निरोप धाडला. तथापि, अजित पवारांसह सात जणांना तो निरोप वेळेत पोहोचलाच नव्हता. त्यांनी आधी पवारांचंच नाव घेतलं. मात्र, निरोप मिळताच मत बदलून रावांच्या नावाला पाठिंबा दिला.

पी. व्ही. नरसिंहराव यांची नेतेपदी एकमतानं रीतसर निवड झाली. 21 जूनला पंतप्रधान म्हणून त्यांचा शपथविधी झाला. राव यांनी कोणतीही कटुता मनात न ठेवता सामंजस्यानं शरद पवार यांना केंद्रात येण्याचं आमंत्रण दिलं. पवारांनीही ते मान्य केलं. चार दिवसांतच त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना संरक्षण खातं मिळालं. महाराष्ट्रात त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून सुधाकरराव नाईक आले.

या सर्व घडामोडींवर भाष्य करताना आम्ही म्हटलं होतं, की राव मंत्रिमंडळ समतोल आहे. मात्र, यापूर्वीच्या अनुभवाप्रमाणे त्यात वारंवार फेरबदल होऊ नयेत. पवारांच्या मनात आपले निकटवर्ती डॉ. पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री व्हावेत असं होतं. परंतु, पवारांनी केंद्रात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदासाठी सुधाकरराव नाईक यांचं नाव पुढे केलं. ते आपल्या विरोधात जाणार नाहीत, याची त्यांना खात्री होती. नाईक हे पवार गटातील कधीच नव्हते, हे आम्ही मांडलेले मत पुढे खरंच ठरलं.

नरसिंहराव यांच्याकडे धूर्तपणा होता. त्यांचा जागतिक सत्ताकारणाचा, अर्थकारणाचा चांगला अभ्यास व सोबत धडाडी हा सुप्‍तगुणही होता. 20 जून 1991 रोजी पंतप्रधानपदी नरसिंहराव हेच असणार हे निश्‍चित झालं. त्यावेळी परंपरेनुसार ज्येष्ठ सरकारी अधिकारी त्यांच्या भेटीस येऊ लागले. त्यामध्ये तत्कालीन कॅबिनेट सचिव नरेशचंद्र हेही होते. त्यांच्याकडे देशातील घडामोडींची अद्ययावत माहिती असायची. त्यांचा अन् नरसिंहराव यांचा पूर्वीपासूनच परिचय होता. या नरेशचंद्रनी रावांच्या दालनात प्रवेश केल्यानंतर प्रथम काय केलं असेल, तर नरसिंहराव यांना देशापुढील आर्थिक बिकट स्थितीचे आठ पानी टिपण दिले. तेव्हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता व त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे, हे ते टिपण सांगत होतं. त्यातूनच नरसिंहराव यांनी दूरद‍ृष्टी दाखवून आर्थिक सुधारणांचा धडाका सुरू केला व देशाला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून पाठीमागे आणले. सत्तेच्या बाजारात बदलत्या परिस्थितीनुसार कधी कुणाचा भाव वधारतो, तर कधी खाली येतो. इथं परिस्थितीनुसार गणितं बदलत असतात. याचं सुरेख वर्णन कुसुमाग्रजांनी या कवितेत अत्यंत योग्य शब्दांत केलेलं असून ते या सत्ताखेळाला तंतोतंत लागू आहे,

'शिपायांच्या हाती दंडे
पुढार्‍यांच्या हाती हार
रांगड्यांच्या दिंडीमंदी
व्हतं इमानाचं दार'

sinhayan@pudhari.co.in

  • डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव
    मुख्य संपादक, दैनिक पुढारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT