Latest

अनाथांचा दीपस्तंभ…

अमृता चौगुले

सिंधुताई सपकाळ अशा अचानक एक्झिट घेतील, असे कधीच वाटले नाही. माझा आणि त्यांचा परिचय पंचवीस वर्षांपूर्वीचा. एका कार्यक्रमात आम्ही दोघे एकत्र होतो. त्या सोबत आहेत म्हणून मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि भाषणासाठी उभा राहिलो. माईककडे जाताना त्यांच्या पायावर डोके ठेवले आशीर्वाद घेतले. माईंनी डोक्यावरून हात फिरवला. म्हणाल्या, 'लेकरा घाबरू नकोस, बिंदास बोल, मी आहे.' आणि त्यांच्या या वाक्याने माझ्या मनातली भीती निघून गेली. मी मनसोक्‍त भाषण केले. त्या दिवसापासून आमची मैत्री झाली. औपचारिकता कधीच जाणवली नाही.

त्यांच्यामध्ये एक खोडकर लहान मूल लपले होते. त्यामुळेच त्या इतका संघर्ष करू शकल्या. त्यांचा जन्म झाल्यावर, मुलगी झाली या रागाने त्यांचे नाव चिंधी असे ठेवले होते. लहानपणापासूनच त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. नकळत वयामध्ये त्यांना या नावाने हिणवण्यात आले. चिंधीपासून सुरू झालेला हा प्रवास पद्मश्री सिंधुताई सपकाळपर्यंत पोहोचला. त्याच्यामध्ये फक्‍त संघर्ष हा एकच शब्द होता. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्‍न लावून दिले गेले. त्यांच्या पतीचे वय तेव्हा 32 वर्षे होते. गरोदर असताना त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण झाली. अंगावरचे फाटके लुगडे, कडेवर कन्या, खंबीर आणि जिद्दी मन आणि प्रेमळ हृदय या भांडवलावर त्या बाहेर पडल्या. स्मशानभूमीमध्ये वास्तव्य केले. त्या नेहमी त्यांच्या भाषेत म्हणायच्या की, 'लोक म्हणतात स्मशानभूमीत भूत असते; पण खरे सांगू जिवंत माणसांपेक्षा भूतं जास्त प्रेमळ असतात.' मृतदेहाच्या जाळणार्‍या चितेवर भाकर्‍या भाजून खाल्ल्या. तान्ह्या मुलीला गायीचे दूध पाजले. त्यांचा हा संघर्ष ऐकताना कितीही कठोर माणूस असला, तरी त्याचे डोळे भरून येत. गायीच्या उपकाराची परतफेड म्हणून की काय, त्यांनी अनाथ मुलांसोबत अनेक गायींचे पण संगोपन केले. ज्या नवर्‍याने त्रास दिला तोच त्यांच्या आश्रयाला आश्रमात आला. माईंनी त्यांनाही सांभाळले. त्या नेहमी म्हणायच्या की, माझ्या नवर्‍याने मला त्रास दिला नसता, तर तुम्हाला सिंधुताई सपकाळ दिसली नसती. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे.

अमेरिका दौर्‍यात त्यांच्या नऊवारीकडे अमेरिकन लोक कुतूहलाने पाहत. जगात भारी आमची नऊवारी, असे त्या म्हणत. आपल्याकडे भारत देशाला माता म्हणतात; पण अमेरिकेत त्यांच्या देशाला मावशी पण म्हणत नाहीत, हे सांगताना त्यांच्यातल्या देशप्रेमाची भावना श्रोत्यांमध्ये देशभक्‍तीची ज्योत पेटवत असे. त्यांच्या आश्रमातील अनेक मुलांना कान, नाक, घसातज्ज्ञ म्हणून उपचार आणि ऑपरेशन करण्याचे भाग्य मला लाभले. प्रत्येक वेळेस आणि विशेषतः ऑपरेशनच्या वेळेस त्या देशभरात कुठे जरी असल्या, तरी तरी सतत फोन करून उपचारासंदर्भात माहिती घेत. प्रत्यक्ष आई-वडील जितकी काळजी घेतात, त्यापेक्षा काकणभर जास्तच काळजी त्यांना या मुलांची असायची. माझ्या एका लेकराचा ऑपरेशन माझा दुसरा लेक करतोय, असे त्या म्हणाल्या की, मला स्वतःला खूप नशीबवान असल्यासारखे वाटायचे. संपूर्ण जगातल्या तरुणांचे आयडॉल असणार्‍या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 'व्हिजन इंडिया ट्वेंटी-ट्वेंटी' या उपक्रमात काम करत असताना मला ग्रामीण भागातील युवकांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यासाठी पुणे ते चेन्‍नई सायकल रॅलीचे आयोजन भोई प्रतिष्ठानने केले होते. अहवाल तयार करताना त्यामध्ये सिंधुताईंनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाच्या निमित्ताने यांची जीवन कहानी लोकांसमोर आली. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले; पण शासकीय सन्मान त्यांना याआधीच मिळायला हवा होता. त्यांना पद्मश्री प्रदान करताना साक्षात राष्ट्रपती यांनी खाली येऊन त्यांना वाकून नमस्कार केला. हा नमस्कार केवळ सिंधुताई सपकाळ यांना नव्हता, तर देशभरात अनाथांसाठी काम करणार्‍या प्रत्येक आईला होता. स्वतःच्या मुलीला दूर ठेवून अनाथ मुलांना सांभाळणार्‍या माईंना तो होता आणि चिंधीपासून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेला होता. सिंधुताईंमुळे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना एक वेगळे स्टेटस प्राप्त झाले.
एकदा त्यांना भेटायला माझ्यासोबत गोव्याचे मंत्री तावडकर आले होते. त्यांनी सिंधुताईबद्दल फक्‍त ऐकले होते. त्यांच्यासोबत शासकीय लवाजमा होता. सिंधुताईंची कहाणी ऐकल्यावर मंत्र्यांपासून ते शासकीय अधिकार्‍यांपर्यंत सगळ्यांचे डोळे पाणावले आणि सर्वांनी माईंना दंडवत घातला. त्यानंतर या मंडळींनी सिंधुताईंना गोव्यात बोलवून मोठा सत्कार केला आणि त्यांच्या कार्याला निधी अर्पण केला. भाषण नाही तर राशन नाही, हे त्यांचे नेहमीच वाक्य. भाषण करून मिळालेले पैसे हे अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आणि उपजीविकेसाठी वापरले जात. त्यासाठी माई पायाला भिंगरी बांधल्यासारखी वणवण फिरत. परमेश्‍वर प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली, असे म्हणतात; पण मला असे वाटते की, परमेश्‍वराने ज्यांची आई हिरावून नेली त्यांच्यासाठी सिंधुताईंची निर्मिती केली.

आई आणि माई याच्यात फक्‍त एकाच अक्षराचा फरक आहे, तरीसुद्धा स्वतःच्या या लेकरावर प्रेम करणार्‍या आईपेक्षा अनाथ मुलांवर प्रेम करणारी माई ही मला जास्त महत्त्वाची वाटते. एवढे सगळे दुःख भोगूनसुद्धा समाजाकडे बघण्याचा त्यांचा द‍ृष्टिकोन खूप सकारात्मक होता. त्या स्वतः गाणे शिकत होत्या. कारण, सुरुवातीच्या काळात गाणे गाऊनच त्यांनी पैसे मिळवले होते. माईंच्या संस्थेमध्ये सतत देवासमोर एक दिवा तेवत राहतो आणि माई म्हणायच्या, 'मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा माझी लेकरं तो दिवा विझू देत नाहीत. मी सुखरूप आणि लवकर परत यावे, यासाठी माझी लेकरं प्रार्थना करतात.' आज समाजात स्वतःच्या जन्मदात्या आई-बापांना श्रीमंत आणि शिकलेली मुले वृद्धाश्रमात सोडत आहेत आणि रक्‍ताचे कोणतेही नाते नसणार्‍या या आईसाठी ही लेकरे देवासमोर दिवा लावून प्रार्थना करत; पण आता ते होणार नाही. तिची मोठी सावली या लेकरांवरून आता हरपली असली, तरी तिच्या कामामधून, तिच्या संस्थांमधून तिच्यासारख्या कामाची प्रेरणा सर्वांना कायम मिळत राहील.

– डॉ. मिलिंद भोई

SCROLL FOR NEXT