Latest

‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील’ साठी भरीव निधी

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेचे कोल्हापूरप्रमाणे नवी मुंबईतील खारघर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, लातूर आणि नागपूर येथेही उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या ठिकाणी उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देऊन गतीने उपकेंद्र उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने त्यांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, त्यांना योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

'एमपीएससी'च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पहिल्या पाचपैकी 4, पहिल्या 10 पैकी 7, एकूण उत्तीर्ण 597 पैकी 198 उमेदवार 'सारथी' संस्थेचे आहेत. यावरून 'सारथी'ची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी 'सारथी'च्या कामगिरीचेही कौतुक केले.

देशात, जगाच्या पाठीवर उद्योग क्षेत्राची गरज ओळखून रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम तरुणांनी निवडावेत. प्रशिक्षणानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. कृषी, उद्योग, आर्थिक क्षेत्राच्या गरजेनुसार कौशल्यविकासाचे अभ्यासक्रम निवडून पूर्ण करण्यासाठी 'सारथी'ने तरुणांना मदत करावी. राज्यातील तरुणांना रोजगार, उद्योग, व्यवसायात संधी देऊन यशस्वी होण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे स्पष्ट आश्‍वासन त्यांनी दिले.

मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, 'सारथी'चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. मोहिते, राजेंद्र कोंढरे, अनंत पवार, धनंजय जाधव, आप्पासाहेब कुढेकर, गंगाधर काळकुटे हे उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत 'सारथी' व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांचा आढावा घेण्यात आला. 'सारथी'च्या माध्यमातून विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी वसतिगृहांची सोय करणे. कौशल्यविकासाचे कार्यक्रम सुरू करणे, 'सारथी'ची विभागीय उपकेंद्रे सुरू करणे, तिथे पदभरती करणे आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला आवश्यक निधी प्राधान्याने देण्यात येईल, असा विश्‍वास उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला. 'सारथी'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी पाठवताना, जे अभ्यासक्रम आपल्या देशात उपलब्ध नाहीत, अशाच अभ्यासक्रमांचा विचार व्हावा. परदेशी शिक्षणासाठी निवडले जाणारे अभ्यासक्रम हे वैशिष्ट्यपूर्णच असतील, याची खात्री करण्याची सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT