टोकियो ; वृत्तसंस्था : लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणार्या सायना नेहवाल हिने बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दमदार सुरुवात केली. तिने हाँगकाँगच्या चेऊंग ननाग यी हिचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. सायनाने 38 मिनिटांत हाँगकाँगच्या यीचे पॅकअप केले. तिने सामना 21-19, 21-9 असा जिंकला. ती आता तिसर्या फेरीत पोहोचली आहे.
32 वर्षांच्या सायनाने यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. तिने यंदाच्या बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दुसर्या फेरीतील सायनाविरुद्ध खेळणार्या नोझोमी ओकुहाराने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे बाय मिळालेल्या सायना नेहवाल हिचा प्री क्वार्टर फायनलचा मार्ग मोकळा झाला.
महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीदेखील विजयी सुरुवात केली. भारताच्या या महिला जोडीने मलेशियाच्या यीन युआन लोव्ह आणि वालेरी सिओव्हचे कडवे आव्हान 21-11, 21-13 असे परतवून लावले. मात्र, भारताला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. व्यंकट गुरुअन प्रसाद आणि जुही देवांगण यांचा इंग्लंडच्या ग्रेगोरी मारिस आणि जेनी मुरे या जोडीने 10-21, 21-23 असा पराभव केला.