Latest

सातार्‍याने दिला महाराष्ट्राला चौथा मुख्यमंत्री

सोनाली जाधव

सातारा : हरीष पाटणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तांतर घडवत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याच गळ्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाची माळ घालून चमत्कार केला. एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील जावळी खोर्‍यातील दरे गावचे सुपुत्र असल्याने त्यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्रिपद मिळाले. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता एकनाथ संभाजी शिंदे हे सातार्‍याच्या मातीतून महाराष्ट्राला मिळालेले चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत.

महाराष्ट्राचे राजकारण घडवण्यात सातारा जिल्ह्याच्या मातीचा सिंहाचा वाटा राहिला आहे. संयुक्‍त महाराष्ट्राचा मंगल कलश आल्यानंतर यशवंतराव चव्हाण हे संयुक्‍त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. दि. 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 या कालावधीत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. सातारा जिल्ह्यातील कराडच्या मातीतून तयार झालेल्या या नेत्याने महाराष्ट्राला ललांभूत नेतृत्व दिले. दि. 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 या कालावधीत बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कलेढोण गावचे रहिवासी असलेल्या बाबासाहेबांची इंदिरा गांधींवरची निष्ठा त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद देऊन गेली. आज जसा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा सुखद धक्‍का सातारा जिल्ह्याला बसला तसाच 1982 साली बाबासाहेब भोसले यांना आकस्मिकपणे मुख्यमंत्रीपदावर बसवले गेल्याने सातारा जिल्ह्याला सुखद धक्‍का बसला होता.

दि. 10 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014 या कालावधीत पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सातारा जिल्ह्यातील कराड येथील पृथ्वीराज चव्हाण यांचीही काँग्रेस निष्ठा फळाला आली आणि त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले होते. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण हे तिघेही काँग्रेसमधूनच मुख्यमंत्री झाले. मात्र, शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावून एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड अविस्मरणीय असेच राहणार आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी खोर्‍यातील दरे तांब या गावच्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास रचला. त्यांच्या रुपाने शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याला मिळाला. तर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा चौथ्यांदा महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

सातारा जिल्ह्याच्या मातीत बंड करण्याची खुमखुमी आहे. स्वातंत्र्य सेनानी किसन वीर आबा यांनी बंडाची प्रेरणा दिल्याने शरद पवार यांनी बंड करुन वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. बंडखोरीनंतर पुलोदचा पहिला प्रयोग महाराष्ट्राने पाहिला तो सातारा जिल्ह्याच्या ताकदीवरच. कारण बंडाची प्रेरणा देणारे किसन वीर आबा हे सातारा जिल्ह्यातल्या वाईतल्या कवठ्यातले तर महाराष्ट्रातले गाजलेले बंड करणारे शरद पवार हेही मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळचे. पवारांनीही प्रदीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्या अर्थाने तेही सातारा जिल्ह्याचेच सुपुत्र ठरतात. याशिवाय संयुक्‍त महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी ब्रिटीश आमदानीत मुंबई स्टेटचे मुख्यमंत्री म्हणून 1937 साली सातार्‍याच्या सर धनजीशा कुपर यांनी नेतृत्व केले होते. सातार्‍याच्या मातीत असलेली बंडाची खुमखुमी घेवून जावळीच्या दर्‍याखोर्‍यातील कोयनेच्या भूमिपुत्राने गेले काही दिवस देशाचे राजकारण हादरवून सोडले. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र चौथ्यांदा राज्याच्या गादीवर बसला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.

सातारकर मुख्यमंत्री झाल्याचा शरद पवारांनाही आनंद…
महाविकास आघाडीच्या सत्तेचे शरद पवार हे शिल्पकार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करताना सातारा जिल्ह्याने आजवर दिलेल्या मुख्यमंत्र्यांची नामावली आवर्जून उल्‍लेखली आहे. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर चौथा सातारकर एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री होत असल्याचा आपणाला आनंद आहे, अशा शब्दांत सातार्‍याच्या मातीविषयी गौरवोद‍्गार काढले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT