सातारा; हरीष पाटणे : शिवेंद्रराजे यांच्या गुलछडीवर जयंतरावांची कडी, विधानसभा निवडणुकीपूर्वी सातार्यात कल्याण रिसॉर्टला झालेल्या मेळाव्यात 'शिवेंद्रबाबा मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी पक्ष बदलता, तुम्हाला निवडणूक जाचेल,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर केली होती.
त्यावर 'भाऊसाहेब महाराजांना शेवटच्या पंचवार्षिकमध्ये मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याचे राजकारण झाले', हे सांगायला पाटील कसे विसरले, असा पलटवार शिवेंद्रराजेंनी केला होता.
पक्षांतरानंतर निर्माण झालेले हे वितुष्ट शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भेटीत नष्ट झाले. प्रथमच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आलेल्या जयंतरावांचे स्वागत विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर हे करत असताना 'मला शिवेंद्रराजेंच्या हातूनच बुके हवा' असा हट्ट जयंतरावांनी धरला. त्यामुळे रामराजेंच्या हातातला बुके स्वत:कडे घेवून शिवेंद्रराजेंनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जयंतरावांचे स्वागत केले. शिवेंद्रराजेंच्या या गुलछडीवर जयंतरावांनी केलेल्या कडीची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. उदयनराजे व शिवेंद्रराजे या दोघांच्या वादात शरद पवार नेहमीच उदयनराजेंची बाजू घेतात, असा आरोप करत शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता. ऐन विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भाजपला जाऊन मिळाल्याने सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच हलकल्लोळ माजला होता. पक्षांतराची मोठी लाट तेव्हा राज्यात आली होती.
या गदारोळातच सातार्याच्या कल्याण रिसॉर्टला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा झाला होता. या मेळाव्यात पक्षांतर केलेल्या शिवेंद्रराजेंवर जयंत पाटील यांनी शाब्दिक हल्ला चढवला होता. 'सातार्यात हे सगळे असे कसे पळपुटे निघाले? शिवेंद्रबाबा मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी पक्ष बदलता?' अशी टीका जयंतरावांनी शिवेंद्रराजेंवर केली होती. 'शरद पवार यांनी तुम्हाला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले होते. हे कसे काय विसरता? माझेही चार कारखाने आहेत, मलाही अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले; पण मी कुणापुढे शरणागती पत्करली नाही.
पवारांनी तुम्हाला वडिलांसारखे प्रेम दिले. सकाळी 6 वाजता जरी तुम्ही फोन केला, तरी तुमचा फोन उचललाजायचा. वडिलांसारखी आपुलकीची वागणूक शिवेंद्रबाबांना कुठेही मिळणार नाही. तुम्हाला काटा टोचला तरी तुम्हाला फोन यायचा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी अभयसिंहराजेंनी काय सांगितले होते आठवते का? त्यांनी पवार साहेबांना साथ दिली होती. तुम्ही मात्र अर्ध्यावरच सोडताय', अशा शब्दात जयंतरावांनी शिवेंद्रराजेंच्यावर टिकास्त्र सोडले होते.
शिवेंद्रराजेंनी दुसर्याच दिवशी जयंतरावांवर पलटवार करत टिकेला प्रत्युत्तर दिले होते. '15-20 वर्षे मी राष्ट्रवादीत आमदार म्हणून काम केले. मात्र त्या कालावधीत पक्षातील नेत्यांना माझी आठवण क्वचितच व्हायची. भाऊसाहेब महाराजांची आठवण काढणारे जयंत पाटील शेवटच्या पंचवार्षिकमध्ये भाऊसाहेब महाराजांना मंत्रीपदापासून वंचित ठेवण्याचे राजकारण झाले. हे सांगायला कसे बरे विसरले?', असा उलटा सवाल शिवेंद्रराजेंनी केला होता.
'20-20 वर्ष मंत्रीपदे भोगणार्या मातब्बरांनी लोकसभा निवडणुकीतून माघार का घेतली? पक्षातील माझ्या प्रामाणिकपणाचे फळ पक्षाने मला काय दिले? मी पक्ष सोडला की पाटलांचा तीळपापड होत आहे. मात्र, 40-40 वर्षे प्रामाणिक राहिलेली कुटुंबे पक्ष का सोडतात? याचे आत्मपरीक्षण पाटलांनी करावे. माझी चिंता करु नये, आठवण काढल्याबद्दल धन्यवाद', अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी जयंतरावांना कोपरखळी मारली होती.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जयंतराव पाटील व शिवेंद्रराजे भोसले यांच्यात रंगलेला हा सामना कमालीचा गाजला होता. पुढे पावसात शरद पवार यांची सभा होवूनही उदयनराजेंचा लोकसभेला पराभव झाला. मात्र, त्याचवेळी शिवेंद्रराजे भाजपच्या चिन्हावर निवडून आले. हेच शिवेंद्रराजे गेली 7 वर्षे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत. तर तेच जयंतराव पाटील राज्याचे जलसंपदामंत्री आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतरही दोन्ही नेत्यांची सातार्यात जाहीर भेट झाली नव्हती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ना. जयंत पाटील शुक्रवारी सातार्यात होते.
याचवेळी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले व अन्य मंडळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत बसली होती. रामराजेंनी जयंतरावांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत बोलावून घेतले. राज्यातल्या सत्ता पालटानंतर जयंतराव प्रथमच जिल्हा मध्यवर्ती बँकेत येणार होते. आठ दिवसांपूर्वी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला जरंडेश्वर साखर कारखान्याला केलेल्या कर्ज पुरवठ्याबाबत माहिती देण्यासाठीचा मेल पाठवला होता. जयंतरावांच्या शुक्रवारच्या भेटीला ईडीची पार्श्वभूमी होतीच.
जयंतराव प्रथमच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मार्गदर्शक संचालक व राज्याच्या विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी गुलाबाचा पुष्पगुच्छ जयंतरावांच्या स्वागतासाठी मागवला. गुलाबाचा पुष्पगुच्छ समोर येताच जयंतराव उठून म्हणाले, 'मी बुके घेणार पण शिवेंद्रराजेंच्याच हातून.' जयंतरावांच्या गुगलीवर शिवेंद्रराजेंचा चेहरा लाजल्यासारखा झाला. रामराजेंनी तसाच रेटून बुके जयंतरावांच्या हातात ठेवण्याचा आटापिटा केला. मात्र, मागे हटतील ते जयंतराव कसले? त्यांनी 'नाही, बुके मी शिवेंद्रराजेंकडूनच घेणार' असा हट्ट जयंतरावांनी धरला. त्यामुळे लगेचच शिवेंद्रराजे पुढे आले. जयंतरावांच्या गुगलीवर त्यांचा क्लिन बोल्ड झाला होता.
या हास्यकल्लोळातच शिवेंद्रराजेंनी गुलाबाचा गुच्छ जयंतरावांच्या हाती सोपवला. त्यावर 'आता मला कसं बरं वाटतंय', असे म्हणत 'घ्या रामराजे, तुम्हीही आता एकत्रित हात लावा', असे जयंतराव म्हणाले. शिवेंद्रराजेंच्या गुलछडीवर जयंतरावांनी केलेली कडी भुवया उंचावणारी आहे. पक्षांतरानंतर या दोन नेत्यांमध्ये निर्माण झालेले वितुष्ट शुक्रवारच्या भेटीत पुरते नष्ट झाले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पक्षीय राजकारण नसते. येणार्या प्रत्येकाचे स्वागत केले जाते, असेही स्पष्टीकरण उद्या दिले जाईल. मात्र, शिवेंद्रराजेंच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य व जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेत्यांचा वाढलेला लडीवाळपणा निश्चितच राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेचा विषय ठरणार आहे. येवू घातलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ही शुक्रवारची भेट महत्वपूर्ण ठरेल.