Latest

सातारा : राजकीय आखाड्यात आखाडीचा धुरळा

Shambhuraj Pachindre

कराड : अमोल चव्हाण

नगरपालिका निवडणुका स्थगित झाल्या असल्या तरी त्या लवकरच पुन्हा जाहीर केल्या जातील. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आपल्या वार्डमधील मतदार, कार्यकर्ते खूश असले पाहिजेत. यासाठी भावी मेहरबानांकडून आखाडीच्या निमित्ताने जेवणावळींचा बेत आखला जात आहे. त्यामुळे राजकीय आखाड्यात सध्या आखाडीचा धुरळा उडू लागल्याचे दिसून येत असून, गल्लीबोळात पंगती बसू लागल्या आहेत.

नगरपालिका निवडणूक जाहीर झाली अन् निवडणुकीची वाट बघून थकलेले भावी नगरसेवक राजकीय आखाड्यात आले. मात्र, जाहीर झालेली निवडणूक स्थगित झाल्याने भावींची पुन्हा निराशा झाली. असे असले तरी, निवडणूक ही लवकरच होणार यात शंका नाही. त्यामुळे मतदारांना खूश करण्यासाठी आखाडीच्या पार्ट्यांचा धुरळा उडू लागला आहे. शुक्रवारपासून शहरातील प्रत्येक वार्डात इच्छुकांच्या आखाडीच्या पार्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मतदार मटण, चिकनवर ताव मारताना दिसत आहेत.

कोरोना कालखंडामुळे रखडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध इच्छुकांसह मतदारांना लागले होते. अशातच अचानक निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यामुळे आठ महिन्यांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांनी बाह्या सरसावल्या आणि निवडणूक रिंगणात उडी टाकली. त्यांच्याकडून अर्ज भरण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची जुळवा जुळवा सुरू झाली. गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक इच्छुक तयारीतच होते. मात्र, त्यातच निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम स्थगित केला. त्यामुळे पुन्हा एकदा या इच्छुकांचा हिरमोड झाला.

मात्र, निवडणुका स्थगित झाल्या असल्या तरी त्या पुन्हा केंव्हाही जाहीर होतील म्हणून इच्छुकांनी आपली जोरदार तयारी सुरु ठेवली आहे. त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची इच्छुकांची मानसिकता आहे. त्यातच सद्या आषाढ महिना सुरु असल्याने व पोर्णिमा झाल्यानंतर आखाडीवर ताव मारण्याची तयारी अनेक जणांकडून केली जात आहे. त्यामुळे मतदारांना लुभावण्यासाठी भावी नगरसेवकांकडून आखाडीचा बेत आखला जात आहे. यंदाच्या आखाडींच्या पंगतींना बहर येऊ लागला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागातील चौकाचौकांतून आता रात्री आठनंतर मटण, चिकन, मासे याचा घमघमाट येऊ लागला आहे. हे चित्र गटारीपर्यंत वाढत जाईल, यात शंका नाही. मतदार मात्र या अनोख्या आखाडीचा आनंद लुटताना दिसत असून, आखाडीच्या पंगती उठू लागल्या; पण रंगीत-संगीत मतदारांना कोरडी आखाडी नको आहे. त्यामुळे मतदारांच्या वाढत्या अपेक्षांची पूर्तता करताना भावी नगरसेवकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

आज कोणाचं आहे रे… कार्यकर्तेच ठरवतात तारखा

शुक्रवारपासून या आखाडीच्या पंगती उठू लागल्या आहेत. मतदारांसाठी काय पण हे लक्षात घेऊन त्याला मटण, चिकन, मासे यांची मेजवानी सुरु आहे. इमारतीचे पार्किंग, टेेरेस, आडोशाला असलेल्या पत्र्यांची शेड, शेतातील वस्ती या ठिकाणी होत असलेल्या आखाडींची चर्चा असून आज कोणाचं हाय रे, असे विचारून कार्यकर्तेच आपल्या नेत्यांच्या आखाडीची तारखा निश्चित करताना दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT