सातारा; प्रविण शिंगटे : सातारा जिल्हा परिषदेचे विविध विभाग नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर भर देत असतात.आता तर कृषि विभागाकडून नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील शेतकर्यांचा भाजीपाला, कडधान्ये आणि फळांच्या ऑनलाईन विक्रीसाठी सातारा फार्मर अॅप तयार करण्यात येत आहे. यामधून शेतकर्यांना घरबसल्या बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.
या सातारा फार्मर अॅपच्या माध्यमातून सातार्यातील शेतमाल तृणधान्य, कडधान्ये, फळे, संपूर्ण देशातील ग्राहक ऑनलाईन खरेदी करु शकतात. सातारा फार्मर अॅपमुळे सातार्यातील शेतकर्यांना त्यांचा शेतमाल व शेतीमधील उत्पादने देशपातळीवर विक्रीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. सातार्यातील प्रसिध्द हातसडीचा तांदूळ दिल्ली व मुंबईच्या ग्राहकापर्यंत ऑनलाईन विक्री करता येणार आहे. सातार्याची हळद, तांदूळ व अन्य शेतमाल देशातील कोणत्याही ग्राहकाला खरेदी करता येणार आहे.
जिल्ह्यातील शेतकर्यांना त्यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळणार आहे. तसेच ग्राहकाला उत्तम प्रतिचे उत्पादन थेट शेतकर्यांच्या शेतातून मिळणार आहे. तसेच शेतमाल विक्रीतील मध्यस्थांची व व्यापार्यांची साखळी या अॅपमुळे तोडली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा यांच्या संकल्पनेतून सातारा फॉर्मर अॅपची निर्मीती जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत केली जात असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी सांगितले. कडधान्य, पापड, कुरड्या, चटणीचीही ऑनलाईन विक्री ; स्वत:चा शेतमाल स्वत: विक्री करण्याची मिळणार संधी
सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने फार्मर अॅप तयार केले आहे. शेतकर्यांना घरबसल्या त्याचा शेतमाल तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला , फळे तसेच पापड, कुरड्या, लोणचे, मसाला, चटण्या यांनाही अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन बाजारपेठ मिळणार आहे.
उत्पादक व ग्राहकामधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सेंद्रीय शेती करणार्या शेतकर्यांची व ग्राहकांची या माध्यमातून ओळख निर्माण होणार आहे. शेतकर्यांना कृषि उत्पादन बाजार समितीऐवजी स्वत:चा शेतमाल स्वत: विक्री करण्याची संधी मिळणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकर्यांची ऑनलाईन बाजाराच्या माध्यमातून मोठ्या व्यापार्यांशी ओळख निर्माण होऊन व्यापार वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
जिल्ह्यातील सेंद्रीय उत्पादीत शेतमाल देशपातळीवर विक्री होणार आहे. या अॅपमध्ये शेतमालाचे भाव शेतकरी ठरवणार आहेत. त्यामुळे शेतकर्याच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.