फलटण; अजय माळवे : फलटण नगरपरिषदेची प्रभाग रचना आणि आरक्षण अखेर जाहीर झाले आहे. आपल्या मनातील प्रभाग रचना आणि आरक्षण न झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे, तर मनासारखे आरक्षण आणि प्रभाग रचना झाल्यामुळे कांहींना आनंद झाला आहे. त्यामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवीन प्रभाग रचनेमुळे फलटण नगर परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ झाली असून आता 27 नगरसेवक राहणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे 2 पुरुष आणि 3 महिला असे 5 तर एकुण महिला नगरसेविकांची संख्या 14 राहणार आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमांमध्ये ओबीसी समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण देण्यात आले नसल्यामुळे ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांमध्ये नाराजीची भावना आहे. सर्वच्या सर्व पक्षातील नेत्यांनी आरक्षण मिळाले नसले तरी ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे जाहीर केले आहे.
फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वांना उकंटा लागून राहीलेली शहराची नवीन प्रभाग रचना जिल्हाधिकार्यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत शहराची 13 प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून जुन्या प्रभागरचनेत बहुतांश प्रमाणात बदल झाले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फलटण नगरपरिषदेची आरक्षण सोडत सोमवारी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. या आरक्षण सोडतीमध्ये फलटण नगरपरिषदेच्या अनुसूचित जातीसाठी असलेल्या पाच प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 4 हे तीन प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. नवीन प्रभाग रचना व आरक्षणामुळे अनेकांची गोची झाली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात कही कुशी कही गम असेच वातावरण निर्माण झाले आहे.