Latest

सातारा : न्याय निवाडा करणारा अदालतवाडा पोरका

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : थोरल्या छत्रपती शाहूंच्या काळात जिथे कोर्ट भरायचे, जिथे न्यायनिवाडा केला जायचा तो अदालत वाडा मंगळवारी पोरका झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय व समतेचा विचार पुढे चालवणारे बारावे वंशज छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निवासस्थान असलेला अदालतवाडा मंगळवारी त्यांच्या निधनाने सुनासुना झाला आहे.

राजघराण्यांच्या परंपरेत अदालतवाड्याचे स्थान फार मोठे. थोरले छत्रपती शाहू यांनी सातारा ही राजधानी वसवली. शाहूनगरी या नावाने सातार्‍याची ओळख झाली ती छत्रपती शाहूंमुळे. या छत्रपती शाहूंचे अदालतवाडा हे निवासस्थान. या निवासस्थानातूनच सातार्‍याचा राज्यकारभार चालायचा. न्यायनिवाडा करणारे छत्रपतींचे कोर्टही इथेच भरायचे. शाहूंनंतरच्या वारसदारांनीही अदालतवाड्यातूनच राज्यकारभार केला. त्यामुळे सातारकरांना व प्रजेला अदालतवाड्याचा आदेश हा त्याकाळी अंतिम असायचा. याच अदालतवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे बारावे वंशज छत्रपती शिवाजीराजे भोसले रहात. बारावे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंहराजे भोसले, माजी सहकार मंत्री श्रीमंत अभयसिंहराजे भोसले, श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे श्रीमंत शिवाजीराजे भोसले हे बंधू. राजघराण्यात कायम एकोपा असावा यासाठी शिवाजीराजेंनी पुढाकार घेतला होता.

2007 साली सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद मिटवून शिवाजीराजे भोसले यांनी ऐतिहासिक मनोमीलन घडवून आणले होते. अदालतवाड्याने ते ऐतिहासिक मनोमीलन पाहिले आहे. याच अदालतवाड्यात शिवाजीराजे भोसले यांनीही अनेक न्यायनिवाडे केले. अलिकडच्या काळातही अदालतवाडा हेच न्यायनिवाड्याचे केंद्र झाले होते. अनेक सामाजिक संस्थांशी शिवाजीराजेंचा संबंध होता. दोन वर्षांपूर्वीच शिवाजीराजेंच्या पत्नी श्रीमंत चंद्रलेखाराजे भोसले यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता शिवाजीराजेंचेही निधन झाले. त्यामुळे सातारकर जनतेला आपलासा असणारा, न्यायनिवाडा करणारा प्रसंगी उदयनराजे व शिवेंद्रराजे यांना समज देणारा अदालतवाडा मंगळवारी शिवाजीराजेंच्या निधनाने पोरका झाला.

SCROLL FOR NEXT