Latest

सातारा : ट्रॅफिक विरुद्ध युवकाचा स्टंट, पेटवून घेण्याचा प्रयत्न

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहर वाहतूक (ट्रॅफिक) पोलिसाने ट्रिपल सीट, नंबर प्लेट व वाहन परवाना (लायसेन्स) नसल्याने एका युवकाला दंडाची रक्कम सांगितल्यानंतर ती भरण्यास त्याने नकार देत पोलिसासोबत हुज्जत घातली. यावेळी डिझेलसारखा द्रव पदार्थ आणून अंगावर ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने स्टँड परिसर हादरून गेला. दरम्यान, स्टंट करणार्‍या युवकाने चूक केल्याचेही मान्य केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दुपारी 2 वाजता घडली. शासकीय कामात अडथळा आणणे व आत्महत्येचा प्रयत्न करणे याप्रकरणी युवराज उत्तम लोखंडे (वय 33, रा. शाहूपुरी, मूळ रा. कामेरी, ता. सातारा) याच्याविरुद्ध हवालदार सोमनाथ शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार पोलिस सोमनाथ शिंदे हे सोमवारी दुपारी स्टँड परिसरातील राधिका सिग्नलजवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी एक एसटी बंद पडल्याने परिसरात ट्रॅफिक जॅम झाले होते.

पोलिस वाहतूक सुरळीत करत असताना युवराज लोखंडे हा ट्रिपल सीट आला. पोलिसांनी त्याला बाजूला दुचाकी घेवून थांबवले. त्याला लायसन विचारले असता त्याने नसल्याचे सांगितले. त्याच्या दुचाकीच्या पुढे नंबर प्लेट नव्हती तर पाठीमागे नंबर प्लेट होती. तसेच दुचाकीला प्रेशर हॉर्न होते. पोलिसाने यावरुन सुमारे 7 हजार रुपये दंडाची रक्कम सांगितली.

दंडाची रक्कम ऐकताच लोखंडे याने वाद घालत पैसे नसल्याचे सांगितले. दंड कमी, अधिक करण्यावरुन शाब्दीक बाचाबाची झाल्यानंतर लोखंडे याने दुचाकी तेथेच सोडली व तो निघून गेला. काही वेळानंतर मात्र तो परत आला व त्याने येताना सोबत डिझेलसदृश पदार्थ आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे संपूर्ण परिसर थबकला. संशयित लोखंडे याने 'तुम्हाला दाखवतो. तुमची नोकरी घालवतो,' असे जोरजोरात ओरडून गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी पीसीआर व्हॅन बोलावून लोखंडे याला ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात त्याच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT