Latest

सातारा : कुंभारगणी डोंगरमाथ्यावर ढगफुटीने हाहाकार

Arun Patil

कुडाळ/भणंग : पुढारी वृत्तसेवा : जावली तालुक्यातील कुंभारगणी, मरडमुरे डोंगरमाथ्यावर गुरुवारी रात्री कोसळलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आले. यामुळे या परिसरातील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले.

ढगफुटी सदृश्य पावसाने अवघा परिसर भयभित झाला. अनेक घरात ओढ्याचे पाणी घुसल्याने घरात चिखलाचा राडारोडा झाला.
डोंगरउतारावरुन पाण्याच्या येणार्‍या लोटामुळे दगड, माती वाहून येवून शेतांमध्ये पसरली. शेतात पाणी साठल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांच्या शेतातील ताली पडल्या आहेत. या धुवाँधार पावसाने ग्रामस्थां मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने भणंग परिसरात भाताचे तरवे वाहून गेल्यामुळे भात लागण कशी करायची? याची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे.

करंदोशीत घरे-गोठ्यात पाणी शिरले जावलीत करंदोशी गावामध्येही सायंकाळी 5 च्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील घरे तसेच गोठ्यातही पाणी घुसल्याची माहिती समोर आली आहे.जोरदार पावसाने प्रामुख्याने भात,सोयाबीन, घेवडा, ऊस पिकांचे नुकसान झाले असून विहिरीमध्ये पाणी शिरल्याने हे पाणी दुषीत झाले. मुसळधार पावसाने ओढ्यानाल्यांना पाणी वाढले.

मेढा- पाचवड या रस्त्यावर असणार्‍या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. काहींच्या गुरांच्या गोठ्यामध्ये तर काहींच्या घरात पाणी घुसले. या नुकसानीची पाहणी प्रशासकीय अधिकार्‍यांनी करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

आ. शिवेंद्रराजे, तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्याकडून पाहणी

गुरुवारी सायंकाळी करंदोशी येथे ढगफुटीने झालेल्या नुकसानीची पाहणी आ. शिवेंद्रराजे भोसले,तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांना दिले. यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे, आरोग्य,कृषी व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकसानीची पाहणी करून येथील जनतेला आधार दिला तसेच प्रशासनाला सुविधा पुरवण्याच्या सूचनाही केल्या. ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT