Latest

सातारा-कास येथे एअर स्ट्रीप उभारणार

backup backup

सातारा : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरातून महाबळेश्‍वर, पाचगणी, कास येथे सरासरी 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. यामध्ये गतीमानता येण्याकरता सातारा किंवा परिसरात अ‍ॅरो स्पॉट निश्‍चित करुन, एअर स्ट्रीप उभारण्यासाठी नागरी हवाई उड्डाण मंत्री ना.ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी शुक्रवारी विस्तृत चर्चा झाली. सातारा-कास येथे योग्य ठिकाणी एअर स्ट्रीप उभारण्याची शक्यता पडताळण्यासाठी तज्ज्ञांचे पथक पाठवले जाणार आहे. त्याद्वारे एअर स्ट्रीप उभारण्याची कार्यवाही सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही ना. ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी दिली. खा. उदयनराजे यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे ना. ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. त्याची माहिती देताना खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हयातील उत्‍तर-पश्‍चिम भागातील स्थळांना भेट देण्यासाठी रस्ते वाहतुकीचा उपयोग होत आहे.

त्यालाच जर एअर स्ट्रीपची जोड दिली तर भेट देणार्‍या व्यक्‍तींचा वेळ वाचण्याबरोबरच पर्यटक अधिकाधिक आकर्षित होणार आहेत. सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. त्यामुळे या शहराला आणि सातारा जिल्हयाला एक वेगळे महत्व आहे. यासर्व बाबींचा विचार करुन दुरदृष्टीकोनातून, सातारा-कास येथे योग्य ठिकाणी एअर स्ट्रीप उभारण्याबाबत आम्ही मागणी केली आहे. सातारा जिल्ह्यात पर्यटनस्थळांबरोबरच अध्यात्मिक ठिकाणे व मोठी धरणे आहेत. यामुळे याठिकाणी सी-प्लेन धावपटटी उभारता येईल याची सुध्दा चाचपणी होणे गरजेचे आहे.

घाटाई ते महाबळेश्‍वर नवीन रस्ता अस्तित्वात आला आहे. किल्‍ले अजिंक्यतारा, किल्‍ले प्रतापगड आणि सज्जनगड या ठिकाणी रोप-वे उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वीच ना.नितिन गडकरी यांच्या रस्ते विकास मंत्रालयाला दिलेले आहेत. त्या प्रस्तावाची छाननी सुरु आहे. नजीकच्या काळात या तीनही ठिकाणी रोप-वे उभारला जाणार आहे, असेही खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT