Latest

सातारा : एम. आर. देशमुखला अटक

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : मायणी मेडिकल कॉलेजमध्ये खोटी यंत्रसामुग्री खरेदी दाखवून मनी लाँडरिंग केल्याप्रकरणी तसेच बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांकडून मेडिकलच्या अ‍ॅडमिशनसाठी भरमसाठ पैसे घेतल्याप्रकरणी ईडीने मायणी मेडिकल कॉलेजचे तत्कालीन चेअरमन एम. आर. देशमुख याला अटक केली असून त्याला दि. 18 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतचे ट्विट ईडीच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरून करण्यात आले आहे.

मायणी मेडिकल कॉलेजचे विद्यमान संचालक अरुण गोरे यांनी ईडीला दिलेल्या तक्रारीनुसार सातारा जिल्ह्यातील मायणी येथील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या मेडिकल महाविद्यालयासाठी लागणार्‍या यंत्रसामुग्रीसाठी एचडीएफसी या बँकेतून तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे 15 कोटी रूपये कर्ज स्वरूपात घेतले.

त्याची खरेदी न करता संचालक मंडळाने बोगस बिले बँकेकडे सादर केली. बँकेच्या कर्जाचे हफ्ते न भरल्यामुळे बँकेकडून वेळोवेळी मेडिकल कॉलेजला पत्रव्यवहार सुरू झाला. बँकेचे अधिकारी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये आले तेव्हा कोणत्याही वस्तूची खरेदी झाली नसल्याचे उघडकीस आले.

जेव्हा ही माहिती उघडकीस आली तत्पूर्वीच या मेडिकल कॉलेजचे संचालक मंडळ बदलण्यात आले होते. संबंधित कंपन्यांनीही आपण मेडिकल कॉलेजला कोणतीही बिले दिले नसल्याचे सांगितले. त्यामुळेच विद्यमान संचालक मंडळाविषयी गैरसमज होवू शकतो म्हणून आपण ही तक्रार तत्कालीन संचालक मंडळाविरोधात देत असल्याचे गोरे यांनी म्हटले.

या तक्रारीवरून खरेदी प्रक्रियेत मनी लाँड्रींग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महादेव रामचंद्र देशमुख (एम. आर. देशमुख) यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली.ईडी न्यायालयाने त्यांना 18 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

गोरे यांनी दिलेल्या तक्रारीत मायणी मेडिकल कॉलेजमध्ये जुन्या संचालक मंडळाच्या काळात बनावट कागदपत्रे तयार करून मेडिकल कॉलेजला अ‍ॅडमिशन दिली गेल्याचेही म्हटले आहे. याशिवाय एमबीबीएस कॉलेजला अनधिकृतरित्या पैसे घेवून विद्यार्थ्यांना प्रवेेश दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत ईडीनेही आपल्या ट्विटर हँडलरवरून बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांकडून भरमसाठ पैसे गोळा करून मायणी मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन केल्याप्रकरणी एम. आर. देशमुख यांना अटक केली असल्याचे म्हटले आहे. एम. आर. देेशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यात ही पहिलीच ईडीची अटकेची कारवाई आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT