Latest

सातारा : आज जेल.. कल बेल.. परसो वही पुराना खेल

Arun Patil

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुले व युवकांमध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक, वॉट्सअप या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी खुळ लागल्याचे वास्तव समोर येत आहे. 'आज जेल.. कल बेल.. परसो वही पुराना खेल' अशा गुन्हेगारी विश्वाची भाषा वापरुन दहशत निर्माण केली जात आहे. गेल्या काही दिवसांमधील पोलिसांच्या तपासात याबाबी समोर आल्या असून अल्पवयीन मुले यामध्ये सर्वाधिक गुरफटली जात आहेत.

गेल्या काही घटनांमध्ये बाल गुन्हेगारीचा रेशो झपाट्याने वाढू लागला आहे. बाल गुन्हेगारी वाढीची अनेक कारणे आहेत. मित्र परिवार, मोबाईलचा किती व कसा वापर, पालकांची आदरयुक्त भिती, मानसिकता ही काही प्रमुख कारणे आहेत. मुलांना कुठे कोणी बोलले? समज दिली? रागवले? मनासारखे काही झाले नाही? की हिंस्त्र होवून चुकीच्या गोष्टी मुलांकडून होवू लागल्या. आपण काय करतोय? आपल्या संगतीमध्ये कोण आहे? आपल्या चुकीच्या कृत्यामुळे कुटुंबियांना किती त्रास होईल? आपले स्वत:चे भविष्य अंधारमय होईल? याची जराशीही काळजी मुलांना राहिलेली नाही.

कोरोना काळात मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल वापरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पुढे याचेच मुलांना व्यसन जडले. ऑनलाईन शाळा, क्लास झाल्यानंतर मुले मोबाईल तासन्तास इन्स्टाग्राम, फेसबुक, वॉट्सअप ग्रुपवर रमू लागली. यातूनच स्टाईलिश राहणे, दुचाकी वेगाने चालवणे, महागड्या मोबाईलची क्रेझ, इन्स्टावर आपलेही अकाउंट काढून त्यावर रिल्स बनवून टाकणे याची चटक लागू लागली. हीच चटक आज अल्पवयीन मुलांच्या पालकांच्या मुळावर उठली आहे.

इन्स्टा, फेसबुक व स्टेटससह सोशल अकाऊंट चेक करण्याची गरज

कोणताही एखादा हल्ला अचानक होत नाही. त्यापाठीमागे काही ना काही पार्श्वभूमी असतेच. अल्पवयीन मुलांची ही मळमळ अगोदर बाहेर येत असते. जसे रील्सच्या माध्यमातून त्यांच्या डोक्यामध्ये काय सुरु आहे? स्टेटसचा आशय कोणता आहे? गुन्हेगारी संबंधी वाक्ये, डायलॉग असतील तर त्यांची कोणासोबत तरी धुसफूस सुरु असल्याचे स्पष्ट आहे. अशा या रील्स बहाद्दरांवर पोलिसांनी वॉच ठेवणे काळाची गरज बनली आहे.

मुलांसाठीच 'पुढारी' ची मोहीम…

जिल्ह्यातील वाढती बाल गुन्हेगारी ओळखूनच दै.'पुढारी'ने वर्धापनाचे औचित्य साधून संस्कारक्षम मुले घडण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. यासाठी वाचन चांगले झाले पाहिजे. मुलांनी चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. मुलांनी शूर-पराक्रमी, थोरांचे विचार आचरणात आणले पाहिजेत ही भूमिका घेवून दैनिक 'पुढारी' समोर आल्यानंतर त्याला सातारकरांनीही साथ देण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम अशीच चालवली जाणार आहे. बालगुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही तातडीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करावा लागणार आहे. कारण काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन झाले होते. आता नव्याने ही बाल गुन्हेगारी जिल्हावासियांच्या मानगुटीवर बसू लागली आहे. त्यावर जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांना तातडीने उतारा द्यावा लागणार आहे.

SCROLL FOR NEXT