Latest

सातारा : आईच्या कुशीतच ९० बाळांनी सोडला जीव, बाळाला झोपवताना अशी घ्या काळजी..!

दिनेश चोरगे

सातारा;  विशाल गुजर :  जिल्ह्यात अर्भक मृत्यू आणि बालमृत्यू कमी होत असतानाच दुसरीकडे मात्र, बाळाला पोटावर झोपवल्याने तसेच स्तनपान केल्यानंतर ढेकर न काढल्याने 90 बाळांनी आईच्या कुशीतच जीव सोडल्याचे समोर आले आहे. 'सडन इन्फंट डेथस सिंड्रोम' प्रकारात मोडणार्‍या या दोन प्रमुख कारणांमुळे या बाळांचा मृत्यू झाला आहे. अशा बालमृत्यूच्या घटना ग्रामीण भागात कमी अन् शहरी भागात अधिक आहेत. ढेकर न काढल्याने अथवा पोटावर झोपवल्याने श्वास गुदमरून कराड तालुक्यात 18 तर माण व पाटण तालुक्यात 13 मृत्यू झाल्यांची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.

लहान बाळाला त्याच्या आईच्या कुशीत आयुष्यभराची उब मिळते. मात्र, कधी-कधी आई रात्रीच्या वेळी बाळाला कुशीत स्तनपान करत असताना अचानकपणे झोपी जातात. नेमकी येथेच मोठी चूक होते. बाळ आईच्या कुशीत निवांत झोपले असल्याचे समजून कुटुंबातील माणसेही निर्धास्त होवून जातात. मात्र, झोपेतच स्तनपान सुरु असल्याने बाळाच्या घशात काही थेंब अडकून पडण्याची शक्यता असते. काहीदा हे बाळ झोपेतच पालथे होण्याची शक्यता असते. त्यामुळे आणखी धोका संभवतो. याकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी त्यात बाळाचा श्वास गुदमरतो अन अघटित घडते.

अर्भकाचा श्वास गुदमरून होणारा मृत्यू ही अतिशय गंभीर बाब आहे. हे मृत्यू टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. प्रसूती करणारे डॉक्टर, परिचारिका आणि सुईणींना सातारा जिल्हा आरोग्य विभागाकडून विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
परिणामी इतर जिल्ह्याच्या तुलनेत 'सडन इन्फंट डेथस सिंड्रोम' प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागातील स्तनदा मातांना बाळाचा ढेकर काढणे सुलभपणे जमते. मात्र, शहरी भागातील महिलांना फारसे जमत नाही. जिल्ह्यात 90 बाळ मृत्यू हे श्वास गुदमरुन झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू कराड येथे झाले आहेत. येथील मृत्यूचा आकडा 18 इतका आहे. त्यापाठोपाठ माण व पाटण तालुक्यात 13 मृत्यू झाले आहेत. सातारा तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत.

बाळाला झोपवताना अशी घ्या काळजी..!

आईने स्वत:च्या अंगावर, सोफा किंवा आराम खुर्चीवर बाळाला झोपवू नये.
बाळाच्या आजूबाला खेळणी किंवा उशी ठेवू नये.
बाळ झोपले असताना चेहरा उघडा ठेवावा
बाळाची हालचाल होईल अशाप्रकारे दुपट्यात गुंडाळणे
पाळणा सुरक्षित अन् आईपासून जवळ हवा

आईने बाळाला स्तनपान केल्यानंतर त्याला खांद्यावर घ्यावे आणि त्याच्या पाठीवर अगदी हलक्या हाताने काही मिनिटे थोपटत राहावे. यामुळे ढेकर निघतो. परिणामी बालकांना उलटी होत नाही. ढेकर नाही काढला तर त्याला उलटी होण्याचा धोका असते. असे करुनही ढेकर नाही निघाला त्याला डाव्या कुशीवर झोपवावे. अशा परिस्थितीत उलटी झाली तर धोका नसतो. बाळाला झोपवताना पोटावर झोपवू नये.
-डॉ. किरण घार्गे, बालरोगतज्ज्ञ सातारा

असे झाले बालमृत्यू

तालुका  संख्या
कोरेगाव  3
खटाव  4
माण   13
कराड 18
वाई      7
फलटण   4
खंडाळा   3
जावली    9
पाटण    13
सातारा   12
महाबळेश्वर  4

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT