Latest

सातारा : अभियंतेच नसतात जागेवर, सगळा कारभार वार्‍यावर…

Arun Patil

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील पाटबंधारेच्या प्रकल्प मंडळ व सिंचन मंडळात बरेच अधिकारी उंडारत असतात. दोन्ही विभागांच्या कार्यालयांमधील कर्मचार्‍यांमध्ये बेशिस्तपणा प्रचंड वाढला आहे. बेलगाम वृत्तीला आळा घालण्यासाठी अधीक्षक अभियंतेही जाग्यावर उपस्थित नसतात. त्यामुळे 'अभियंते नसतात जागेवर, सगळा कारभार वार्‍यावर' अशी पाटबंधारेची अवस्था झाली असून, या मनमानीला मुख्य अभियंत्यांनी आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

सातार्‍यातील कृष्णानगरला विस्तीर्ण जागेवर सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व सिंचन मंडळाची कार्यालये पसरली आहेत. दोन्ही सर्कलभोवती असलेल्या या कार्यालयात नेमकं काय चालतं, हे सर्वसामान्यांच्याही लक्षात येत नाही. सिंचन मंडळाच्या सातारा सिंचन विभागातील वरिष्ठ अभियंत्यांची मग्रुरी फारच वाढली आहे.

कामानिमित्त येणार्‍या शेतकर्‍यांना याठिकाणी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या ठिकाणी काम करणार्‍या अभियंत्यांचा कामाचा 'वार' आणि वेळ जणू ठरलेलीच नसते. शेतकर्‍यांनी माहिती विचारली की या विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांचा जळफळाट होतो. बर्‍याचदा 'साईट'च्या नावाखाली हे बाहेरच असतात. कार्यालयात आल्यावरही अभ्यागतांना भेटण्याची यांना अलर्जी असल्यासारखे त्यांचे वागणे असते. एक तर म्हसोबा मख्ख चेहर्‍याने येणार्‍यांकडे पाहत असतो.

साहेबच जागेवर नसल्यावर कर्मचारी तरी टेबलवर काम कसे करणार? कर्मचारी कार्यालयात आल्यावर 5-10 मिनिटे काम करतात. त्यांना लगेच चहाची तल्लफ होते. तासभर तिकडेच टवाळक्या केल्यावर कार्यालयात टक्केवारीच्या चार-दोन फाईली या टेबलावरुन त्या टेबलावर हलतात. त्यानंतर दुपारची सुट्टी होण्यापूर्वीच बरेचजण कार्यालयातून गुल होतात. त्यापैकी काहीजण सायंकाळीच कार्यालय बंद होण्यापूर्वी घरी येतात. अशीच परिस्थिती सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळांच्या उपविभागांमध्ये आहे.

कार्यकारी अभियंतेच जाग्यावर नसल्यामुळे कर्मचार्‍यांची मनमानी सुरु असते. कामाच्या पाहणीच्या नावाखाली कार्यकारी अभियंते जागेवर नसतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात विस्कळीतपणा आला आहे. अतिरिक्त कार्यभाराच्या नावाखालीही कामात अळमडळम केली जाते. या विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालयात येतात कधी आणि जातात कधी हेच कळत नाही. आठवड्यातील तीन-चार दिवस त्यांच्या पुणे-मुंबईलाच मिटिंगा असतात. सातार्‍यात असले तरी त्यांचा उरलेला बहुतांश वेळ त्यांच्या निवासस्थानीच जातो. त्यातून शिल्लक राहिलेल्या काही तासांपुरतेच ते कार्यालयात असतात, हे दिसून आले आहे.

त्यामुळे कामानिमित्त कार्यालयात येणार्‍या शेतकर्‍यांवर हेलपाटे मारायची वेळ येते. जिल्ह्यातील दुर्गम, अतिदूर भागातील शेतकरी कामे घेवून दोन्ही अधीक्षक अभियंत्यांना भेटायला येतात मात्र हे वरिष्ठ अभियंते जाग्यावर नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. दोन्ही मंडळांतील बरेच कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंत्यांमध्ये प्रचंड मनमानी वाढली आहे. या बेलगामवृत्तीला आळा घालून या कर्मचार्‍यांना शिस्त व वळण लावावे, अशी मागणी जिल्हावासीयांतून होत आहे.
(क्रमश:)

ठराविक ठेकेदारांनाच गब्बर करणारी नीती…

पाटबंधारे व जलसंपदा विभागाने गेली कित्येक वर्षेे ठराविक ठेकेदारांना गब्बर करण्याची नीती अवलंबली आहे. ठेकेदारांच्याच गाड्या, ठेकेदारांकडूनच खरेदी, ठेकेदारांकडूनच डबे, ठेकेदारांच्याच पैशावर मिजास असे प्रकार कित्येक वर्षे सुरू आहेत. त्यात अलीकडच्या दोन वर्षांत कमालीची वाढ झाली आहे.

निकृष्ट कामांना चटावलेले ठेकेदार अभियंत्यांना टक्केवारी देऊन सरकारी पैशाची अक्षरश: वाट लावत आहेत. अभियंते आणि ठेकेदार गब्बर होऊन कामे मात्र निकृष्ट होत आहेत. कोयनानगर विश्रामगृहाचे बांधकाम हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. जलसंपदाच्या प्रत्येक कामाची माहिती घेतली असता सगळीकडे निकृष्टतेची ठिगळे आहेत. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांवरच कारवाई झाली पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT