Latest

साडवली : एका वर्षात 5 बिबटे, 2 गवारेड्यांचा मृत्यू

backup backup

साडवली; पुढारी वृत्तसेवा : भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडून तसेच उपासमारीमुळे 5 बिबट्यांचा मृत्यू, 1 सांबर व 5 गवारेडा यांचा एकाच वर्षात मृत्यू झाल्याची माहिती देवरूखचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी दिली आहे. तालुक्यात बिबट्या व गवारेडे यांचा मृत्यू होणे ही चिंताजनक बाब आहे.

संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधिक आहे. येथील गाव व वाड्या या डोंगरांमध्ये वसलेल्या आहेत. यामुळे अधूनमधून अनेक भागांमध्ये बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. जंगले नष्ट होत असल्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीमध्ये येत आहेत. पाळीव मांजरे, कुत्री, कोंबड्या, गाई, बैल यांच्यावर बिबट्या भरदिवसादेखील हल्ला चढवत असल्याचा प्रकार पुढे येत आहे.

भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटे विहिरीमध्ये कोसळण्याचा प्रकारदेखील घडला आहे. तसेच भूक बळीमुळे बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी संगमेश्वर तालुक्यात सहा बिबटे सापडले. चार बिबटे विहिरीत कोसळण्याचा प्रकार घडला. यातील 3 जणांचा मृत्यू झाला असून एका बिबट्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. जंगलात दोन बिबटे मृतावस्थेत सापडले आहेत. कळंबस्ते, पिरंदवणे, कनकाडी, देवधामापूर, मोर्डे, हरपुडे या ठिकाणी बिबटे मिळून आले आहेत.

गतवर्षी गवा रेडे मिळाले आहेत. नारडुवे, अंबावली, पाचांबे या ठिकाणी गवारेडे विहिरीत पडण्याचा प्रकार घडला. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने या गवारेड्यांना सुखरूप बाहेर काढून यांना जीवदान दिले आहे. किरबेट येथे झुंजीमध्ये दोन गव्यांचा मृत्यू झाला आहे.

कोंडउमरे येथे कड्यावरून कोसळून एका सांबराचा मृत्यू झाला आहे. संगमेश्वर तालुक्यात वनपाल म्हणून तौफिक मुल्ला, वनरक्षक म्हणून नानू गावडे, राजाराम पाटील, आकाश कडूकर, अरुण माळी हे कार्यरत आहेत. पाळीव व वन्य प्राण्यांकडून भात, काजू, आंबा, केळी आदी पिकांची नासधूस केली जाते. गतवर्षी 147 शेतकर्‍यांचे नुकसान झाले. यातील 56 शेतकर्‍यांना 4 लाख 45 हजार 875 इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. अजूनही 91 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT