सांगली : पुढारी वृत्तसेवा : एका वाहनावर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच लाखांचा गुटखा जप्त केला. वाहतूक नियंत्रक पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात पोलिस सुशांत गुलाबराव पाटील यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आलताफ इस्माईल शेख (वय 40, रा. गांधी कॉलनी, मंगळवार बाजार) या संशयितास अटक केली आहे. त्याच्याकडून जीपसह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी सांगितले, शनिवारी रात्री उशिरा कुपवाड फाटा येथे सुशांत पाटील हे वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी जीप (एम. एच. 10 बी आर 6741) ची तपासणी करताना त्यामध्ये तंबाखू, गुटखा दिसून आला. यामध्ये चार लाख 41 हजार रुपये किंमतीचा हिरा पान मसाला 35 पोत्यांमध्ये मिळून आला. त्याशिवाय 1 लाख 10 हजार 250 रुपयांची रॉयल तंबाखू 35 पोत्यांत मिळून आली.
शेख हा कर्नाटकातून हा गुटखा घेऊन येत होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.
सांगलीसह शहरात गुटखा, सुगंधी तंबाखू खुलेआम विक्री होत आहे. याकडे अन्न आणि औषध विभागाचे दुर्लक्ष आहे. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात रेल्वे आणि रस्ते मार्गाने हा गुटखा येतो. त्यावर फारशी कारवाई होत नाही.