Latest

सांगली : विधवा प्रथेचे उच्चाटन झालेच पाहिजे

Shambhuraj Pachindre

सांगली : पुढारी वृत्तसेवा

पतीच्या निधनानंतर महिलेला उर्वरित आयुष्यात समाजाची अवहेलना सहन करीत जगावे लागे. त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना धार्मिक कार्यक्रमात येण्यास बंदी केली जाई. या प्रथेच्या विरोधात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी चळवळ सुरू केली. मात्र आजही समाजातील अनेक घटकांमध्ये विधवा प्रथा पाळली जाते. पती निधनानंतर त्यांचे हक्क हिरावून घेतले जातात. या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने क्रांतिकारी पाऊल उचलले. आता शासनानेही ही प्रथा नाहीशी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना, महिला संघटनांनी विधवा प्रथेला तिलांजली देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

विधवा प्रथा बंदीचा पायंडा अत्यंत चांगला

ग्रामपंचायतींनी विधवा प्रथाबंदीचा ठराव करण्याचे शासनाने दिलेले आदेश चांगले आहेत. विधवा प्रथाबंदी ठरावाचा हा निर्णय चांगला आहे. राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. विधवापणासारख्या चालीरिती विचित्र आहेत. अशा प्रथा आता बंद होण्याची गरज आहे. अनेकवेळा पती निधनाचे दु:ख ताजे असतानाच त्यांचे कुटुंबिय या महिलांच्या मालमत्ता, पैसाअडका यासाठी सह्या घेतात. यातून महिलांचे मोठे नुकसान होते. सर्वच महिला आर्थिक आघाडीवर सक्षम असतात असे नाही. अशा महिलांना या निर्णयाने मोठा आधार मिळणार आहे. आमच्या ढवळी (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालयात आम्ही अनेक वर्षांपासून हळदी-कुंकू कार्यक्रम घेतो. यासाठी विधवा, परित्यक्तांना आवर्जून बोलवून त्यांचा सन्मान करत होतो. विधवा प्रथाबंदीचे ठराव आता गावागावांत व्हावेत यासाठी 'अंनिस'च्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोंत.
– श्रीमती सरोज नारायण पाटील, अध्यक्षा, अंनिस

महापालिकाही ठराव करणार

विधवा प्रथेविरोधात महानगरपालिका महासभेतही ठराव करण्यात येणार आहे. विधवांच्या विकासासाठी विशेष योजना राबविली जाईल. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. राज्यातून अनिष्ठ प्रथा, परंपरा हद्दपार होणे गरजेचे आहे. शहाजीराजेंच्या निधनानंतर राजमाता जिजाऊ सती गेल्या नाहीत. त्यांनी छत्रपती शिवराय घडवले. जिजाऊंनी अनिष्ट प्रथांविरोधात आदर्श घालून दिला आहे. आधुनिक युगात पुरुषांच्या बरोबरीने महिला राष्ट्रउभारणीत योगदान देत असताना विधवा प्रथेसारख्या अनिष्ठ रुढी बंद व्हायला पाहिजेत.
– महापौर, दिग्विजय सूर्यवंशी

विधवांना सक्षम बनविण्याची खरी गरज

महिलांमध्ये विधवा प्रथाबंदी करण्याचा होत असलेला प्रयत्न, त्याला मिळत असलेला प्रतिसाद आणि एकूणच हा बदल चांगलाच आहे. मात्र, यातून त्या-त्या महिलांचे विधवापण नाहीसे होते, असे चित्र निर्माण होण्याची गरज आहे. खरेतर विधवांचे दु:ख दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. विधवांनादेखील स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. माहेरी, सासरी अनेकवेळा अनेक विधवांना आधार दिला जात नाही. निराधारपणाचे जगणे होते. अशावेळी या महिलांना सक्षम बनवून जगण्याची लढाई लढण्यासाठी अधिक ताकद देण्याची गरज आहे.
– डॉ. भारत पाटणकर, पुरोगामी विचारवंत

विधवा प्रथाबंदीच्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे

विधवा प्रथाबंदी करण्याचा निर्णय होत आहे. हा निर्णय घेणार्‍या ग्रामपंचायतीचे, त्या ठिकाणच्या सर्व सदस्यांचे आणि गावकर्‍यांचे संपूर्ण राज्याने स्वागतच करायला हवे. त्या सर्वांचे परिवर्तनवादी लोकांनी अभिनंदनच केले पाहिजे. यासाठी धाडसाने पुढे आलेल्या महिलांचे देखील आभार मानले पाहिजेत. विधवा प्रथाबंदी हा खरेतर जनसमूहासाठी महत्त्वाचा निर्णय ठरतो आहे. लोकांनी, महिलांनीदेखील अशा बाबींसाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. काही घटक या निर्णयाला धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक रंग देतील. मात्र, हा बदल गरजेचा आहे. खरे तर कायदा करून देखील फारसे काही साध्य होत नाही. अनेकवेळा जबाबदार घटकच कायदा मोडत असल्याचे दिसते. अशा सामाजिक बदलाच्या निर्णयासाठी न्यायसंस्थेने सकारात्मक राहण्याचीच गरज आहे. एखादी वाईट गोष्ट नाकारली जात असेल तर त्याला समाजघटकांनी पाठिंंबा देऊन बदलाचे स्वागत करण्याची गरज आहे.
– कॉ. धनाजी गुरव, विद्रोही चळवळीचे नेते

विधवांकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन बदलला पाहिजे

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने आणि गावकर्‍यांनी विधवा प्रथाबंदीसाठीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. विधवांकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन बदलला पाहिजे. पतीच्या निधनानंतर तिचे हक्क, अधिकार तिला मिळवून दिले पाहिजे. आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत.
– मनीषा दुबुले, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख

विधवा महिलांसाठी प्रशिक्षण

अनिष्ट रूढी, परंपरा, प्रथांमुळे विधवा महिलांच्या मानसिकतेवर मोठा विपरित परिणाम होत आहे. पती निधनानंतर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढणे, जोडवी काढणे या प्रथा बंद होणे गरजेचे आहे. विधवा महिलांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत विधवा व परित्यक्ता महिलांसाठी प्रशिक्षण योजना राबविली जाईल. रोजगार, स्वयंरोजगारासाठी त्यांना हे प्रशिक्षण महत्वाचे ठरेल. अनिष्ट प्रथा बंद करण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करून देणे महत्त्वाचे आहे.
– सभापती गीतांजली ढोपे-पाटील

विधवांचे आर्थिक प्रश्न सोडवले पाहिजे

विधवा ही प्रथा धर्मातील पुरुषी वर्चस्वाचे प्रतीक आहे. स्त्रीच्या आयुष्यात पुरुष नसणे म्हणजे तिला समाजात काही किंमत नाही, अशी चुकीची समजूत पुरुषसत्ताक पद्धतीने रूढ केलेली आहे. मग पती जर मरण पावला तर स्त्रीला किंमत दिली जात नाही. त्यामुळे विधवा प्रथेचा प्रश्न हा कौटुंबिक आणि सांस्कृतिक आहे. कुंकू आणि पती निधनाचा काही संबंध नाही. कुंकू ऐवजी पती निधनानंतर स्त्रियांचे जे आर्थिक हक्क हिरावले जातात, ते मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. अनेकवेळा सैनिकांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीचे हाल ही काही नवीन गोष्ट नाही. त्यांच्या पेन्शनवरही कुटुंबीय हक्क गाजवत असतात. त्यांना पतीच्या संपतीत वाटा मिळण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
-डॉ. तारा भवाळकर, ज्येष्ठ साहित्यिक

शाहू महाराज यांच्या आदर्शाची अंमलबजावणी

विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय समाज प्रगतीसाठी मोलाचा आहे. अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करण्याचा आदर्श राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजाला घालून दिला होता. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी हा आदर्श पुढे चालवला. आज पुरोगामी महाराष्ट्रात प्रत्यक्षात या आदर्शाची अंमलबजावणी होत आहे. आर. आर. पाटील आबाही याच विचारावर चालणारे नेते होते. रुग्णालयात उपचार घेताना मी वाचलो नाही आणि माझ्यावर अग्नी देण्याची वेळ आलीच तर ती माझ्या मुलींनी द्यावी, अशी इच्छा आबांनी व्यक्त केली होती. अनिष्ट रूढी, परंपरा मोडीत काढून समाजाला नवी दिशा देण्यासाठी सुशिक्षित महिलांनी या निर्णयाचे स्वागत करून पुढे यावे.
– स्मिता आर. आर. पाटील

स्त्री मानसिकद़ृष्ट्या सक्षम होईल

विधवेचा सन्मान राखण्यासाठी हेरवाड गावाने जो निर्णय घेतला, तो अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील मैलाचा दगड ठरलेला आहे. स्त्रियांचे सौभाग्य, भाग्य यांची सांगड घालून पुरुषसत्ताक पद्धती कायम अबाधित ठेवण्याला, त्यांचे शोषण करण्याला या निर्णयाने खिंडार पडले आहे. त्यासाठी हेरवाड गावाचे अभिनंदन. शासनाच्या सहभागाने या निर्णयाचे लोण गावागावात पोहचावे यासाठी शासनाच्या सहकार्याने आम्ही प्रयत्न करू. या निर्णयामुळे स्त्रीचे मानसिक आरोग्य सुद़ृढ होण्याला मदत होणार आहे.
– डॉ. प्रदीप पाटील, अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते

क्रांतिकारी निर्णय

विधवा प्रथेविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील ग्रामसभेचा ठराव आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेले विधवा प्रथाबंदीसाठीच्या ठरावाचे परिपत्रक अतिशय स्वागतार्ह आहे. ते काळानुरूप गरजेचे देखील आहे. खरेतर पती निधनानंतर विधवेचे मानसिक खच्चीकरण होते. या प्रथा बंद होणे गरजेचे आहे. हळदी-कुंकू, ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रमातही विधवांना डावलले जाते. समाजात वावरताना त्यांचा आत्मविश्वास खचतो.
– प्राचार्य डॉ. गीतांजली शिंदे

SCROLL FOR NEXT