Latest

सांगली : विधवा, घटस्फोटितांशी लग्न करण्यास तयार

सोनाली जाधव

सांगली : पुढारी वृत्तसेवा
विधवा, घटस्फोटित चालेल, पण संसार सुखाचा करणारी सहचारिणी हवी, अशी अपेक्षा व्यक्‍त करीत इच्छुक 20 वरांनी विवाह करण्याची तयारी दर्शवित पुढे आले.

मराठा समाज संस्थेच्यावतीने मराठा समाज सभागृहात सर्वधर्मिय, विधवा, विधूर, घटस्फोटित वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्यां लतादेवी बोराडे यांच्याहस्ते झाले. विधवा प्रथा बंदीचा निर्णय महाराष्ट्रात होत असताना सांगलीतील मराठा समाजाने मात्र गेल्या दहा वर्षा पूर्वीच विधवा, घटस्फोटितांचा विवाह करण्यासाठी वधू-वर मेळावे आयोजित करण्याचे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आजच्या मेळाव्यात विविध जात, धर्मातील वधू-वर उपस्थित होते. त्यातील 20 इच्छुक तरुणांनी पुढाकार घेत विधवा, घटस्फोटितांशी विवाह करण्याची इच्छा व्यक्‍त केली. तरुणांच्या या पुढाकारामुळे मराठा समाजाच्या मेळाव्यात तरुणांमधील क्रांतिकारक सामाजिक बदल जाणवला. या मेळाव्यास 600 जणांनी नोंदणी केली होती.

प्रमुख पाहुण्या लतादेवी बोराडे म्हणाले, पुरुष प्रधान संस्कृतीचे त्रास विधवेला सहन करावा लागतो. त्यामुळे आत्महत्येसारखे विचार येतात. सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांना डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्या, पुनर्विवाह करून आनंदी संसार करा. विधवांचा पुनर्विवाह झालाच पाहिजे. यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष ए. डी. पाटील यांनी ओळख करून दिली. प्रा. शशिकांत जाधव यांनी उमेदवारांची ओळख करून दिली. अ‍ॅड. विलासराव हिरुगडे – पवार यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे खजिनदार विकास मोहिते यांनी आभार मानले. माजी अध्यक्ष रघुनाथ पाटील, अशोक सावंत, सरचिटणीस प्रमोद शिंदे, कार्यकारणी सदस्य दत्तात्रय सावंत, बाबासाहेब भोसले उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT