Latest

सांगली : लिंगनूरमध्ये दोन गटांत सशस्त्र राडा; दोघे गंभीर जखमी, तिघांना अटक

अमृता चौगुले

मिरज; पुढारी वृत्तसेवा : लिंगनूर (ता. मिरज) येथे किरकोळ कारणातून झालेल्या वादावादीतून दोन गटांत तुफान सशस्त्र राडा झाला. कोयता, दगड आणि दांडक्याने झालेल्या मारामारीत दोघे गंभीर जखमी झाले असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मारामारीप्रकरणी अर्जुन अशोक नाईक आणि लोकेश रावसाहेब सुतार यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन नाईक याने लोकेश रावसाहेब सुतार, प्रवीण रावसाहेब सुतार, पपलेस नाईक आणि एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध तर लोकेश सुतार याने अर्जुन अशोक नाईक, राजू परसू नाईक आणि राजू पंडित नाईक यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लोकेश, अर्जुन आणि राजू या तिघांना अटक केली आहे.

लोकेश सुतार याच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सायंकाळी तो गावात शेती औषधे घेण्यासाठी आला होता. त्यावेळी अर्जुन आणि राजू हे दोघे बसस्थानकाजवळ गोंधळ घालत होते. त्यावेळी त्या ठिकाणी थांबलेल्या एका मित्राला लोकेश याने "काय चालले आहे" अशी विचारणा केली. त्यावेळी हा आपल्यालाच काहीतरी म्हणत आहे, अशा समजुतीतून अर्जुन आणि राजू याने लोकेश याला दगडाने मारहाण करून जखमी केले.

अर्जुन नाईक याच्या फिर्यादीनुसार, तो व त्याचा मामेभाऊ राजू नाईक हे दोघे बसस्थानकाजवळ असलेल्या एका चिकन सेंटरजवळ बसले होते. त्यावेळी लोकेश सुतार हा त्या ठिकाणी आला. त्याने "इथे का बसता" असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी व वादावादी करून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने दोन मोटारसायकलवरून लोकेश, त्याच भाऊ प्रवीण, पपलेश आणि एक अनोळखी असे चौघे आले. सर्वांनी "आज तुम्हाला सोडत नाही" असे म्हणून दमदाटी केली. त्यानंतर लोकेश आणि प्रवीण या दोघांनी अर्जुन व राजू या दोघांच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला. तर पपलेश आणि अन्य अनोळखी व्यक्तीने दांडक्याने दोघांना बेदम मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी भांडण सोडविण्यासाठी काही जणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चौघांनी ग्रामस्थांना कोयता दाखवून कोणी मध्यस्थी केली तर त्याला देखील मारहाण करण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली. तसेच कोणीही याबाबतीत पोलिसांना माहिती दिल्यास तुमची देखील अशीच अवस्था करण्याची चौघांनी धमकी दिली असल्याचे अर्जुन याने फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT