Latest

सांगली : लम्पीचे दीड लाख डोस खरेदी करणार

Arun Patil

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : लम्पीस्कीनच्या लसीकरण आणि उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील 10 लाख रुपयांतून 1 लाख 58 हजार लसीचे डोस आणि 10 लाख रुपयांमधून औषधे खरेदी करणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली. तसेच पशुपालकांनी न घाबरता जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, राज्यातील इतर जिल्ह्याचा तुलनेत सांगली जिल्ह्यात जनावरांना संसर्ग झाल्याचे प्रमाण कमी आहे. वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील ठराविक गावे वगळता सुदैवाने जिल्ह्यात कोठेही प्रादुर्भाव झालेला नाही. लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जनावरांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे.

बाधित झालेल्या जनावरांच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या अंतरावरील जनावरांना लस टोचण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 21 हजार जनावरांना लस टोचली आहे. उर्वरित लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून 10 लाख रुपयांचे 1 लाख 58 हजार लसीचे डोस खरेदी करणार आहे. तसेच 10 लाख रुपयांतून लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव झाल्यानंतर करावयाच्या औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. लसीकरण आणि उपचारासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना केली आहे. पुढील चार – पाच दिवसांत लस प्राप्त झाल्यानंतर तातडीने लसीकरण करण्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, पशुपालकांनी घाबरून जावू नये. मात्र आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येणार्‍या सूचनाचे पालन करावे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 38 जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली आहे. यातील 20 जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. तर 18 जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांची भरती ः कृषीची घेणार मदत

जिल्ह्यात एका बाजूला लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसर्‍या बाजूला पशुसंवर्धन विभागात असणार्‍या रिक्त पदामुळे अनेक अडचणी येत आहेत. याबाबत सीईओ डुडी यांना विचारले असता ते म्हणाले, पशुसंवर्धनच्या मदतीसाठी येत्या काही दिवसांत कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांची भरती करणार आहे. तसेच कृषी विभागाचे काही कर्मचारीही यासाठी मदतीसाठी घेण्यात येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT