Latest

सांगली : रेवनाळमध्ये आजोबा, नातवाचा बुडून मृत्यू

Arun Patil

जत शहर, पुढारी व्रतसेवा : रेवनाळ (ता. जत) येथे शेळ्या राखण्यासाठी गेलेल्या आजोबा व नातवाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. आबासाहेब काडाप्पा कुलाळ (वय 70) व कार्तिक बिरूदेव कुलाळ (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

आबासाहेब कुळाळ यांची गावालगतच शेती आहे. दुपारी ते नातू कार्तिक याला घेऊन शेळ्या राखण्यासाठी गेले होते. राहत्या घरापासून 50 फूट अंतरावर असलेल्या विहिरीजवळ नातू कार्तिक खेळत बसला होता. अचानक त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. जवळच असलेले आबासाहेब यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी नातवाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. त्यावेळी जवळपास कोणीही नसल्याने त्यांच्या मदतीला कोणी आले नाही. दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला.

घटनेनंतर काही वेळाने आबासाहेब कुळाळ यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला, तर रात्री उशिरा कार्तिकचा मृतदेह हाती लागला. कार्तिकचे वडील शेतमजूर आहेत. ते कामासाठी येळवी येथे गेले होते. कार्तिक हा आजोळी कोसारी येथे होता. दसर्‍यासाठी त्याला रेवनाळला आणले होते. याबाबत जत पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जत पोलिस करीत आहेत.

SCROLL FOR NEXT