Latest

सांगली, मिरजेत 100 खाटांची दोन रुग्णालये

Shambhuraj Pachindre

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली व मिरजेत 100 खाटांची दोन रुग्णालये राज्य सरकारने मंजूर केली आहेत. एक जनरल रुग्णालय सांगलीच्या सिव्हिलच्या आवारात, तर दुसरे महिला व नवजात शिशूंसाठी मिरजेत 100 खाटांचे रुग्णालय होणार आहे. यासाठी 95 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. या दोन्ही रुग्णालयांची कामे लवकरच सुरू होतील, असे जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

ते म्हणाले, सांगली जिल्ह्याची गरज ओळखून जिल्हा प्रशासन व मी 2017 पासून या विषयांचा पाठपुरावा करीत आहे. यासाठी 110 कोटी रुपयांचा प्रस्ताव 2018 मध्ये पाठविला होता. आमदार सुधीर गाडगीळ यांनी त्यावेळी चांगले प्रयत्न केले होते; पण तो नाकारण्यात आला. पालकमंत्री जयंत पाटील तसेच राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सांगलीचे असल्याने त्यांच्याकडे जिल्हाधिकारी व मी आग्रह धरला. याची जिल्ह्यास किती नितांत गरज आहे, ते लक्षात आणू दिले. यासाठी वेगळ्या जागा न लागता सध्या उपलब्ध असणार्‍या जागेत ही दोन्ही रुग्णालये होणे शक्य असल्याचे त्यांना सांगितले. मंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याने आरोग्य व अर्थ खात्याने या दोन्ही रुग्णालयांसाठी 95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, यातील 100 खाटांचे जनरल रुग्णालय सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात होणार आहे. दुसरे महिला व नवजात शिशूंसाठी 100 खाटांचे रुग्णालय मिरजेतील किसान चौकातील महापालिकेच्या जागेत होणार आहे. ही दोन्ही रुग्णालये अत्यंत सुसज्ज असणार आहेत. सर्व अत्याधुनिक सुविधा या दोन्ही रुग्णालयांत दिल्या जाणार आहेत. लवकरच निविदा निघून काम सुरू होईल. दीड-दोन वर्षांत ही रुग्णालये रुग्णांच्या सेवेत असतील.

हळद, द्राक्षे, केळी, डॅ्रगन फ्रूट; शेतकर्‍यांना रोहयोचा फायदा

पूर्वी काही मोजक्या फळ पिकांचा रोजगार हमी योजनेत व फळबाग अनुदान लागवडीत समावेश होता. यामुळे ठरावीक शेतकर्‍यांचाच फायदा होत होता. परंतु, आज सरकारने हळद, द्राक्षे, केळी, डॅ्रगन फ्रूट या पिकांचा समावेश रोजगार हमी योजनेत केला आहे. यामुळे या पिकांच्या कामासाठी मजुरीवर येणार्‍या कामगारांना रोहयोतून वेतन मिळणार आहे. यातून शेतकर्‍यांची उत्पादन खर्चाची काही रक्कम वाचणार आहे.

'भू – विकास'च्या कर्जमाफीतून जिल्ह्यास 110 कोटी

राज्य सरकारने भू-विकास बँकेला कर्जमाफी जाहीर केली. यातून सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँकेची जवळपास 110 कोटींची वसुली होणार आहे. मुनगंटीवार समितीच्या शिफारसी सरकारने स्वीकारल्यानंतर 'भू-विकास'चे अस्तित्व संपले असे चित्र होते. पण बँकेची मालमत्ता शासनाकडे हस्तांतरित होणार की कसे याबाबत काहीच स्पष्ट झालेले नाही. सन 1995 नंतर बँकेच्या अडचणी वाढत गेल्या. तत्कालीन युती सरकारने या बँकेच्या कर्जाला नाबार्डकडे हमी देण्यास नकार दिला. नाबार्ड कर्ज देत नाही आणि नाबार्डकडून वित्त पुरवठा नाही म्हणून कर्जपुरवठा करता येत नाही, अशा दुष्टचक्रात बँक अडकत गेली. यातूनच या बँकेचे अर्थकारण ढासळले होते.

बुर्ली-खोलेवाडी पुलास 22 कोटी 80 लाख मंजूर

कुंडल : पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील बुर्ली-खोलेवाडीच्या पुलास मंजुरी मिळाली आहे. यासाठी आमदार अरुण लाड यांनी पाठपुरावा केला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी या पुलासाठी 22 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या पुलामुळे नागठाणे, बुर्ली, खोलेवाडी, पलूस, राजापूर, शिरगाव, विसापूर, हातनूर या पलूस तालुक्यातील गावांना फायदा होणार आहे. 2019 च्या पुराची पाणी पातळीवर विचारात घेऊन पुलाची उंची ठेवली जाणार आहे. त्यामुळे पुरावेळी नागरिकांना बाहेर पडण्यासाठी या पुलाचा उपयोग होणार आहे. पुलाच्या भूसंपदानासाठी सुमारे 1 कोटी 28 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

दोन लाख नियमित शेतकरी कर्जदारांना लाभ

सरकारने थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली होती. याचा जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना लाभ झाला होता; पण यामुळे नियमित कर्जदार शेतकर्‍यांत नाराजी होती. आज अर्थमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले. यामुळे महापूर व कोरोनाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख शेतकरी आहेत. यातील दीड लाख शेतकर्‍यांना जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा होतो. राष्ट्रीयीकृत बँकांकडून सुमारे एक ते सव्वा लाख शेतकर्‍यांना कर्ज दिले जाते. यातील नियमित परतफेड करणारे दोन लाख शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे.

इनाम धामणी-स्फूर्ती चौक रस्ता, खोतवाडी  ओढ्यावरील पुलास मंजुरी : पृथ्वीराज पाटील

मिरज तालुक्यातील इनाम धामणी ते स्फूर्ती चौक या रस्त्याच्या कामाला आजच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची मंजुरी मिळाली, अशी माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. ते म्हणाले, खोतवाडी येथील ओढ्यावरच्या पुलासाठीही 1 कोटी 75 लाखांची मंजुरी दिली आहे. ही कामे व्हावीत, यासाठी मी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. इनाम धामणी ते विश्रामबाग या रस्त्यावरील वाहतूक खूपच वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम करणे आवश्यक होते, तसेच निमणी, नागाव, खोतवाडी, बिसूर, बुधगाव या गावांना जोडणार्‍या खोतवाडी ओढ्यावरील पुलाचे बांधकाम तातडीने करणे आवश्यक होते.पावसाळ्यात या ठिकाणी पाणी येत असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटत होता. ही बाब मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली होती. या दोन्ही कामांची टेंडर लवकरच निघतील.

SCROLL FOR NEXT