Latest

सांगली : ‘ब्लॅक लिस्ट’च्या इशार्‍यांना ठेकेदार जुमानेनात

Arun Patil

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेच्या नगरसेवक निधीतील मंजूर कामे रखडली आहेत. 'ब्लॅक लिस्ट'च्या नुसत्या इशार्‍यांना ठेकेदार जुमानेना झाले आहेत. कामे रखडल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्याची दखल घेत मंगळवारी महानगरपालिकेत पदाधिकारी, नगरसेवक, अधिकार्‍यांची बैठक बोलवली आहे.

सर्व नगरसेवकांना वेळोवेळी महानगरपालिकेकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र या निधीतील बरीचशी कामे प्रलंबित आहेत. कार्यादेश देऊनही बरीच कामे सुरू नाहीत. काही कामांना कार्यादेश प्रदान करण्यासही विलंब झाला. पावसाळ्यापूर्वी कामे होणे गरजेचे होते. नागरिकांकडून कामासाठी नगरसेवकांवर सातत्याने दबाव येत असतानाही कामांना विलंब होत आहे. त्यामुळे नगरसेवकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी या प्रलंबित कामांच्या अनुषंगाने प्रशासनाला पत्र दिले आहे. कामे तातडीने सुरू होण्यासाठी कॅम्प आयोजित करण्याची मागणी केली.

आयुक्त कापडणीस यांनी रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी दि. 7 जून रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेत आढावा बैठक बोलवली आहे.

सभागृह नेते विनायक सिंहासने म्हणाले, मुरुमीकरण, गटारी, रस्ते आदी पायाभूत सुविधांसाठी नगरसेवकांनी कामे सूचवली. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही बरीच कामे रखडली आहेत. काही कामे रखडण्यास ठेकेदार जबाबदार आहेत, तर काही कामे रखडण्यास प्रशासनही जबाबदार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT