Latest

सांगली : बनावट बियाणे, खते लिकिंगचे आव्हान!

Arun Patil

सांगली ; विवेक दाभोळे : आता लवकरच खरिपाचा पेरा सुरू होईल. मात्र, 'नेमेची येतो पावसाळा…' या नुसार ऐन हंगामाची संधी साधून बनावट बियाणे, खतांचे लिकिंग यातून शेतकरीवर्गाची लुट सुरू झाली आहे. यामुळे शेतकरीवर्गात अस्वस्थता पसरली आहे. याची जिल्हा कृषी विभागाने दखल घेऊन अशा भेसळबहाद्दर आणि खतांचे लिकिंग करणार्‍या प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

अपवाद वगळता ऐन हंगामात शेतकरीवर्गाची होणारी लूट नवीन राहिलेली नाही. चार दिवसांपूर्वी इस्लामपूर येथे सोयाबीनचे बनावट बियाणे विक्रीस आणणार्‍या रॅकेटचा संबंधित विभागाने पर्दाफाश केला. यावरुन याला पुष्टीच मिळते.

खरिपासाठी दक्षतेची गरज

आधीच खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे. आता शेतकरीवर्ग शिवारात खरिपासाठी सज्ज झाला आहे. मात्र सोयाबीन, भुईमूग बियाणाचे वाढलेले दर त्याची चिंता वाढवू लागले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन तसेच भुईमूग या तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

सर्वाधिक पेरा होणार सोयाबीनचा

सोयाबीनला गेल्या हंगामात सर्वाधिक म्हणजे 10 हजार रुपयांहून अधिक क्विंटल दर मिळाला. मात्र त्याला महागड्या आणि बनावट बियाणाचा सामना करावा लागण्याची धास्ती राहिली आहे. वाळवा, शिराळा, मिरज, कडेगाव तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीनखाली आहे. याच टापूत इस्लामपूर येथे सोयाबीनच्या बनावट बियाणाचा पर्दाफाश झाला आहे.

बियाणांचे दर महागले

या हंगामादरम्यान, प्रथमच विविध पिकांच्या बियाणांचे दर कमालीचे महागले आहेत. सोयाबीनला गेल्या तीन- चार हंगामात उच्चांकी दर मिळत राहिला आहे. याचाच परिणाम म्हणून की काय आता विविध कंपन्यांनी बियाणांचे दर देखील वेगाने वाढविले आहेत. गत हंगामात सोयाबीन बियाणाची 30 किलोेची पिशवी 2250 रु. ते 2700 रुपयांना मिळत होती. मात्र यावेळी तीन किलोची पिशवी चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या घरात गेली आहे. भाताचे बियाणे महागले आहे. 40 ते 45 रु. किलो असलेले बियाणे 50 ते 55 रु. किलो झाले आहे. बियाणे महाग झाले आहेच, पण अपवाद वगळता त्याच्या शुद्धतेबाबत शेतकर्‍यांना शंकाच आहे. कृषी विभागाने जागरूकता मोहीम सुरू करण्याची गरज आहे.

चौसष्ट हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

कृषी विभागाने जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचा सुलभ व सुरळीतपणे पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. जिल्ह्यात निव्वळ पिकाखालील क्षेत्र 5 लाख 76 हजार 903 हेक्टर आहे. पैकी खरीप क्षेत्र 3 लाख 56 हजार 754 हेक्टर आहे. त्याचप्रमाणे खरीप बियाणांसाठी देखील नियोजन करण्यात आले आहे. पीकनिहाय उपलब्ध करण्यात आलेले बियाणे (क्विंटलमध्ये) पुढीलप्रमाणे : भात 6 हजार 732, ज्वारी 6 हजार 665, बाजरी 2 हजार 20, तूर 621 , मूग 327, भुईमूग 1 हजार 468, सूर्यफूल 15 क्विंटल, मका 6 हजार 698, कापूस 8, सोयाबीन 39 हजार 470. एकूण 64 हजार 24 क्विंटल.

दीड लाख टन खते, पण विक्रेत्यांची मनमानी 

शेतकर्‍यांना लागणार्‍या खतांचा पुरवठा सहजासहजी व्हावा यासाठी याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी युरिया 47 हजार 469 टन, डीएपी 17 हजार 919 टन, एमओपी 21 हजार 581 टन, एसएसपी 20 हजार 561 टन, एनपीके 44 हजार टन असे तब्बल 1 लाख 51 हजार 530 टन खत उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे कृृषी विभागाकडील आकडेवारी सांगते. मात्र, प्रत्यक्षात खतांची खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गेलेल्या शेतकर्‍यांना अनेक ठिकाणी उलट अनुभव येत आहे. हे खत हवे असेल तर ते घ्यावेच लागेल, अशी सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे गरज नसताना शेतकर्‍यांना अशी खते घ्यावी लागत आहेत. यामुळे शेतकर्‍यांची चांगलीच आर्थिक कोंडी होऊ लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT