Latest

सांगली : न्यायालयाच्या आदेशानुसारच नागपंचमी साजरी करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

Arun Patil

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना कालावधीनंतर नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच नागपंचमी सणाचे आयोजन होईल यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे. नियोजनात प्रत्येक बाबींची सूक्ष्म पद्धतीने आखणी करावी. त्यासाठी आवश्यक नोडल अधिकारी, कर्मचारी यांची तातडीने नियुक्ती करावी. वनविभाग, पोलिस यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांनी हा सण शांततेत व सुरळीत पार पडेल याबाबतची सर्वोतोपरी दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नागपंचमी सण आयोजनाबाबत बैठकीत ते बोलत होते. उपवनसंरक्षक नीता कट्टे, अपर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, सहायक वनसंरक्षक (वनीकरण) डॉ. अजित साजणे, वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र होरा, अंबामाता मंदिराचे अध्यक्ष संभाजी गायकवाड उपस्थित होते.

डॉ. दयानिधी म्हणाले, शिराळा नगरपंचायतीने तातडीने साफसफाई करण्यावर भर द्यावा. साथरोग पसरू नये याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. येणार्‍या भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होईल याचे नियोजन करावे. अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांची उपलब्धता ठेवावी. आवश्यकता भासल्यास ही अत्यावश्यक वाहने येण्या-जाण्यासाठी रस्ते मोकळे राहतील याचेही नियोजन करावे.

गर्दीमध्ये ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे जाणवतील अशांसाठी कोरोना तपासणी पथक तैनात ठेवावे. त्याचबरोबर आवश्यक औषधांचा साठा, सर्पदंशाची लस उपलब्ध ठेवावी. नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने 125 अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये 10 गस्ती पथके तयार केली असून या पथकात 8 जणांची नियुक्ती केली आहे.

7 तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. शिराळा नगरपंचायतीतील 32 गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष राहणार आहे. आरोग्य विभागाच्यावतीने तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. अत्यावश्यक बाबींसाठी उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांची तपासणी करून त्या अद्ययावत ठेवण्यात येणार आहेत. पोलिस विभागाच्या माध्यमातून 500 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT