Latest

सांगली जिल्हा बँक : नवीन 290 कोटींच्या कर्जाचे वाटप

backup backup

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा बँकेने शनिवारी नवीन 290 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. बँकेने महिन्याभरात एक टक्का एनपीए कमी करण्यात यश मिळविले आहे. तसेच बड्या थकबाकीदारांसाठी ओटीएस योजना लवकरच लागू करणार आहे, अशी माहिती सांगली जिल्हा बँक अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजकीय सोय पाहून कोणालाही कर्जे वाटप केले जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, काही साखर कारखानदारांकडे सुमारे 500 कोटींपेक्षा जादा थकबाकी आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बँक चा एनपीए 16 टक्केच्या आसपास गेला आहे. विशेषत: जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात थकबाकीचे प्रमाण जादा आहे. त्यामुळे मुख्यालयातून एक प्रमुख वसुली अधिकारी नेमला आहे. तसेच वसुलीसाठी तालुकानिहाय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

या टीमने वसुली मोहीम जोरात सुरू केली आहे. जास्तीत-जास्त थकबाकी वसूल करून कर्ज खाती मोकळी केली जात आहेत. यामुळे थकबाकी कमी होऊ लागली आहे. यातून बँकेचे 16 टक्के असलेला एनपीए 15 टक्केपर्यंत आला आहे. तो कमी करण्यासाठी संचालक मंडळाने थकित वनटाईम सेटलमेंट योजना आणली आहे. दि. 19 मार्च रोजी ऑनलाईन सभा आयोजित केली आहे. या सभेत ओटीएसबाबत निर्णय होणार आहेत.

ते पुढे म्हणाले, कोणालाही राजकीय सोय पाहून कर्ज दिले जात नाही. बँकेकडे सध्या 1500 कोटी रुपये पडून आहेत. याचे व्यवसायात रुपांतर करण्याचे नियोजन सुरु आहे. नवीन चांगले ग्राहक शोधले जात आहेत. यातून राजारामबापू कारखान्यास 60 कोटी, बसवेश्वर शुगरला 37 कोटी, मोहनराव शिंदे कारखान्यास 55 कोटी, श्री श्री कारखान्यास 25 कोटी अशी सुमारे 177 कोटी रुपयांची नवीन कर्जे दिली आहेत.

याबरोबरच इतर सर्व प्रकारची 113 कोटींच्या कर्जाचे वाटप आज करण्यात आले आहे. संचालक पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड, अनिता सगरे, संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू, प्रभारी सरव्यवस्थापक काटे, जे.जे. पाटील उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT