Latest

सांगली जि.प. सदस्य संख्या ६८; राज्य सरकारची अधिसूचना

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 25 जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. त्यानुसार सांगली जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 60 वरून 68 होणार आहे, तर पंचायत समितीची सदस्य संख्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यामागे 2 या प्रमाणे 136 होणार आहे. त्याबाबतची अधिसूचना राज्याचे उपसचिव मनोज जाधव यांनी काढल्या आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढविण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या संदर्भातील विधेयक विधिमंडळ अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे.

कलम 9 च्या पोटकलम (1) च्या खंड (क) मध्ये निर्धारित केल्याप्रमाणे, कोणत्याही परिस्थितीत, निर्वाचक गटांची एकुण संख्या 85 सदस्यांपेक्षा अधिक असणार नाही, अशी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील जिल्ह्यात लोकसंख्या लक्षात घेऊन ही सदस्य संख्या ठरवण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे रायगड 66, रत्नागिरी 62, सिंधुदुर्ग 55, नाशिक 84, जळगाव 77, अहमदनगर 85, पुणे 83, सातारा 74, सोलापूर 77, कोल्हापूर 76, औरंगाबाद 70, जालना 63, परभणी 60, हिंगोली 57, बीड 69, नांदेड 73, उस्मानाबाद 61, लातूर 66, अमरावती 66 ,बुलढाणा 68, यवतमाळ 69, चंद्रपूर 62, वर्धा 57, गडचिरोली 57.

इच्छुकांची डोकेदुखी वाढणार

जिल्ह्यात कवठेमंकाळ आणि कडेगाव तालुका वगळता उर्वरित आठ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढणार आहेत. मतदारसंघ वाढणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीची तयारी करणार्‍यांची डोकेदुखी वाढणार आहे. सध्या असलेल्या गटातील गावांमध्ये बदल होणार आहे. काही गावे मतदारसंघातून बाहेर जातील, तर काही गावांचा मतदारसंघात समावेश होणार आहे.

SCROLL FOR NEXT