Latest

सांगली : कृष्णा नदीची पातळी ५२ फुटांवर जाणार

अमृता चौगुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 52 फुटापर्यंत जाण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. दिवसभर सुरू असलेला पाऊस आणि पाणी पातळीत सतत होत असलेली वाढ यामुळे सांगली चांगलीच धास्तावली आहे.

बायपास रस्ता पाण्याखाली आला आहे. बायपासकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. हरिपूर रस्त्यावरही पाणी आले आहे. ट्रक पार्किंगही पाण्यात आहे. शहराच्या नदीकाठाभोवती महापुराचा विळखा वाढत चालला आहे.

लष्कर तसेच 'एनडीआरफ'चे पथक शुक्रवारी रात्री सांगलीत दाखल होत आहे. लष्कराच्या पथकात 35 जवानांचा समावेश आहे, अशी माहिती सांगलीच्या अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांनी दिली.

पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवले

सांगलीत सायंकाळी 6 वाजता कृष्णा नदी पाण्याची पातळी 44 फूट 1 इंच इतकी होती. महापालिका क्षेत्रांमधील वार्ड क्रमांक 12 मधील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, काकानगर, दत्तनगर, कर्नाळरोड येथील नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आहे. गुरूवारी रात्री साडेबारापर्यंत या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हरवल्यानंतर शुक्रवारी सकाळी इतर भागातील पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, महापालिकेचे विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर यांनी पाहणी केली. पूरपट्ट्यातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. निवारा केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. व्यापार्‍यांनी दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्याचे आवाहन केले.

मिरजेत केली पाहणी

महापौर, जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी मिरज येथे भेट देऊन पूर परिस्थितीची माहिती घेतली. पूरबाधित नागरिकांनाही तेथून हलवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. पशुधनाला सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. उपमहापौर उमेश पाटील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर नगरसेवक संजय मेंढे, मालन हुलवान, योगेंद्र थोरात, संगीता हारगे तसेच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पूरस्थितीच्या पाहणीसाठी बोट

पूरपरिस्थिती पाहणी करण्यासाठी सज्ज केलेल्या बोटीचे पूजन आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते झाले. पृथ्वीराज पवार, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक युवराज बावडेकर, सुब्राव मद्रासी, उर्मिला बेलवलकर, दीपक माने उपस्थित होते. आमदार गाडगीळ यांनी पूरपट्ट्यात भेट देऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन केले.

'टीम विशाल' मैदानात

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टीम विशाल व सांगली फ्रेंडस् सर्कल धावून आली आहे. पूरग्रस्तांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. औषधोपचारासाठी वैद्यकीय पथके तयार ठेवले आहे. वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक मनोज सरगर यांच्या सांगली फ्रेंडस् सर्कलने ही व्यवस्था केली आहे. स्थलांतरीत पूरग्रस्तांसाठी महापालिकेने आठ निवारा केंद्रे सुरू केली आहेत.

पाणीपातळी 50 फुटांवर गेल्यास पाणीपुरवठा बंद

सांगली, कुपवाड शहरातील पाणीपुरवठा सध्या सुरळित सुरू आहे. मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी 50 फुटावर गेल्यास व्हॅक्युम सर्किट ब्रेकर (व्हीसीबी) रुममध्ये पाणी शिरते. त्यामुळे यंत्रणा बंद ठेवावी लागते. पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल.

'बायपास'वर तोबा गर्दी; ट्रॅफिक जाम

कर्नाळ रोड, जुना बुधगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने व आयर्विन पुलावरून अवजड वाहतुकीस मज्जाव असल्याने शुक्रवारी बायपास रस्त्यावर वाहनांची तोबा गर्दी झाली होती, ट्रॅफिक जाम झाले. सायंकाळच्या दरम्यान बायपास रस्त्यावरही पाणी आले. मोठ्या वाहनांची ये-जा सुरू होती. रात्री वाहतूक बंद केली.

  • 1006 पूरग्रस्तांचे स्थलांतर
  • हरिपूर रस्त्यावर पाणी
  • माई घाट, सरकारी घाटावरील मंदिरे पाण्यात
  • 'अमरधाम'मध्ये पाणी
  • बाजारपेठेत साहित्य, वस्तू सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात
  • गावभाग, पेठभाग, हरिपूर रोड येथील दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था मालू हायस्कूलमध्ये
  • महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी 'ऑन फिल्ड'
  • आमदारांकडून पाहणी, बोटी केल्या सुसज्ज
SCROLL FOR NEXT